नाऊर |वार्ताहर| Naur
श्रीरामपूर तालुक्यातील गोदापट्ट्यातील नाऊर, रामपूर व जाफराबाद येथील ग्रामपंचायत निवडणूका होत असून तीनही गावात गुप्त बैठकांना वेग आला आहे. तालुका पातळीवर दोन्हीही पार्टीच्या गाव पुढार्यांकडून संभाव्य उमेदवाराची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. गाव तिथे दोन गट अशी प्रत्येक ग्रामीण भागाची स्थिती नेहमीच असते. गोदापट्टयातील या तीनही गावांनी पुर्वी तालुका पातळीवर मुरकुटे, ससाणे, आदिक आणि विखे असा संघर्ष अनुभवला होता. यावेळी मात्र, विद्यमान आमदार लहु कानडे यांनी आमदार निधीतून केलेल्या विकास कामाच्या जोरावर स्थानिक स्वराज्य संस्थेत सवतासुभा उभा केल्याने तिन्ही ग्रामपंचायत निवडणुका रंगतदार होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
नाऊर ग्रामपंचायत मध्ये 9 सदस्य संख्या असून 10 वे सदस्य सरपंचपद हे आदिवासी महिलेसाठी आरक्षित झाल्याने सर्वसाधारण गटातील इच्छुक असलेल्या व गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या अनेकांचा हिरमोड झाला आहे. मात्र, सरपंचपदासह पार्टी निवडून आणण्यासाठी गावपातळीवरील दोन्ही गटाकडून दावे-प्रतिदावे सुरु झाले आहे.
यापुर्वीचे माजी लोकनियुक्त सरपंच सोन्याबापू शिंदे हे प्रतापराव देसाई यांच्या विरोधात 14 मतांनी विजयी झाले होते. दोन सदस्य वगळता सोन्याबापू शिंदे यांची 7 सदस्यासह एकहाती सत्ता होती. या निवडणूकीला सामोरे जातांना त्यांनी गावात केलेली विकासकामे घेऊनच ते लढणार आहेत. तर विरोधी गट गावासाठी नवीन बदल व नवीन चेहरे देत असल्याचा प्रचाराचा प्रमुख मुद्दा असल्याची शक्यता आहे. यावेळी गावातील अनेकांचे हेवे-दावे, रुसवे फुगवे काढण्यातच जास्त वेळ दोन्हीही गटाचा जात असल्याचे चित्र आहे.
जाफराबाद ग्रामपंचायत मध्ये एकूण 7 सदस्य संख्या असून 8 वे सदस्य सरपंच म्हणून सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झालेले आहे. माजी लोकनियुक्त सरपंच संदिप शेलार यांनी मागील कालावधीत पदाला न्याय देत परिसरात नव्हे असे पुरस्कार गावाला मिळवुन दिले. यामध्ये प्रामुख्याने जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कार, ओ.डी.एफ. पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळवून गावाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे. यावेळी होणार्या ग्रामपंचायत निवडणूक बहुतांशी ग्रामस्थांनी एकत्र येत बिनविरोध होण्याच्या हालचाली सुरू आहेत.
रामपूर ग्रामपंचायत मध्ये 7 सदस्य संख्या असून 8 वे सदस्य म्हणून सरपंच पद आहे. येथील मतदार संख्या 730 इतकी आहे. मा. सरपंच आशाताई सुरेश भडांगे या मागील निवडणूकीत गोदावरी पट्टयात सर्वाधिक सुमारे 149 मताधिक्याने सरपंचपदी विराजमान झाल्या होत्या. त्यांनी गावासाठी परिसरातील एकमेक शुद्ध थंड अॅरो चिलर प्लॅन्ट सुरु केला होता. यावेळी मात्र, सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन गावकरी मंडळ स्थापन करण्यात आले असून उमेदवाराची चाचपणी जवळपास पूर्ण झाली आहे. यामुळे यावर्षी येथील निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे.