Saturday, April 26, 2025
HomeUncategorizedबुर्‍हाणनगरची तुळजाभवानी माता

बुर्‍हाणनगरची तुळजाभवानी माता

अहमदनगर जिल्ह्यातील देवीमातेचे प्रसिद्ध ठिकाणे या विशेष मालिकेत आपल्याला ओळख करून देणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील बुर्‍हाणनगर येथील तुळजाभवानी माता.

जेव्हा जेव्हा पृथ्वीवर संकट आली तेव्हा तेव्हा आदिशक्तीला आवाहन केलं गेलं. देवांनी आणि मानवांनी; मग ते महिशासूररूपी संकट असो अथवा नैसर्गिक आपत्ती असो तिच्या अनुपम रूपांचे गोडवे नेहमीच गायिले गेलेे. कधी ती सौम्य रूपात कधी उग्र रूपात पण नेहमीचं आपल्या भक्तासांठी ती धावून आलेली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचे बुर्‍हानगर (अहमदनगर) हे माहेर, तर तुळजापूर हे सासर समजण्यात येते. यामागचे मुख्य कारण दसर्‍याच्या दिवशी मूर्ती नगरहून आणलेल्या पालखीतून सीमोल्लंघन करते आणि येथून आणलेल्या नवीन पलंगावर पाच दिवस निद्रा घेते. तब्बल पाचशे वर्षाची परंपरा लाभलेल्या या सासर-माहेरच्या नात्याची नाळ आजही तुटलेली नाही, हे विषेश!

पैठणच्या शालिवाहन राजघराण्याला उतरती कळा लागल्यानंतर राजा शंभूराव यांनी देवीची मूर्ती व सिंहासन बुर्‍हानगरला आणून ठेवले. त्यावेळी या ठिकाणचे नाव अंधेरी नगरी होते. याठिकाणी तेलंगा नावाचा राजा होता. देवीची मूर्ती तब्बल 300 ते 400 वर्षे याठिकाणी होती. हे राजघराणे प्रथम देवकर व नंतर भगत आडनावाने ओळखले जाऊ लागले. आज या घराण्याचे वंशज अर्जुन किसन भगत हे आहेत. तेलंगा राजा कर्नाटकवर स्वारी करण्यास गेल्यानंतर मूर्ती बरोबर घेऊन गेले. डोंगराळ परिसर असलेल्या चिंचपूर(तुळजापुर) मध्ये मूर्ती सुरक्षेसाठी ठेवली. लढाई चालू असताना तेलंगा राजाचा अंत झाला. आज श्री तुळजा भवानी मातेच्या डाव्या बाजूच्या टेकडीवर तेलंगा राजाची समाधी आहे. त्यानंतर बहामनी राजवट सुरु झाल्यावर मूर्ती पुन्हा बुर्‍हानगरला आणली.

अहमदनगरला निजामाचा त्रास होऊ लागल्यावर मूर्ती पुन्हा तुळजापूरला नेण्यात आली. निजामच्या नजरेपासून मूर्तीचे संरक्षण करण्यासाठी जानकोजी देवकर भगत यांनी अपार कष्ट घेतले. निजामाची करडी नजर चुकवत मूर्ती परत नगरला नेली आणि निजाम राजवट संपुष्टात येताच तुळजापुरला आणली गेली. जानकोजी हे देवीचे निस्सीम भक्त होते. त्यांची देवीवर अपार श्रध्दा होती. देवीने त्यांना एकदा मुलीच्या रुपात दर्शन दिले. त्यांनी तिचे नाव कौतुकाने अंबिका ठेवले. या अंबिकाने जानकोजीच्या तेलाच्या व्यवसायात त्यांना सर्वार्थाने मदत केली.

या व्यवसायामुळे सावकाराच्या देण्यातून जानकोजी मुक्त झाले. ते श्रीमंत होऊन पंचक्रोशीत प्रसिध्द व्यापारी म्हणून परिचित झाले. बुर्‍हानगरच्या बादशहाची अंबिकेच्या सौंदर्यावर नजर गेली. बादशहाने अंबिकेला आणण्यासाठी सैन्य धाडले. मात्र तिला स्पर्श करण्याचे धाडस कुणाचेच झाले नाही. त्यावेळी अंबिकेने शाप दिला की बुर्‍हानगर निर्मनुष्य होईल. त्यामुळे गावात रोगराई वाढली. अनेक जण गाव सोडून गेले. मात्र जे ख्ररे देवीभक्त होते; ते तेथेच राहिले. त्यानंतर देवीने जाणकोजींना खरे रुप दाखविले व ती लुप्त पावली.

जानकोजी देवीविना वेडेपिसे झाले. ते फिरत तुळजापूरला आले. देवीची करुणा भाकू लागले व ते जीव देणार इतक्यात अंबिका प्रकट झाली. त्यावेळी जानकोजी देवीला म्हणाले, मी जशी तुझी सेवा केली तशी माझ्या पिढ्यानपिढ्यांना ही सेवा लाभावी. त्यावर देवी म्हणाली, तू पाठविलेल्या पालखीतून मी सीमोल्लंघन करीन व पलंगावर पाच दिवस निद्रा करीन. तेव्हापासून आजतागायत या पलंग पालखीच्या सोहळ्यात खंड पडलेला नाही. अहमदनगर पासून 5 कि.मी. अंतरावर असलेल्या बुर्‍हानगरात भगत (देवकर) घराण्यातील मंडळींनी शेतजमीन विकून स्वखर्चाने देवीचे मंदिर बांधले.

दरवर्षी नवीन राहुरीमध्ये बनविली जात आहे. गणेशोत्सवातील अष्टमीपर्यंत पालखी तयार केली जाते. पितृ पौर्णिमेच्या दुसर्‍या दिवशी पालखी राहुरीतून निघते. ही पालखी राहुरी, पारनेर व नगर तालुका फिरुन घटस्थापनेला हिंगणगावात येते. नंतर दुसर्‍या दिवशी नगर, भिंगार कँप तिसर्‍या माळेला बुर्‍हानगरच्या यात्रेदिवशी दुपारी 12 वाजेपासून ते सायंकाळी 5 पर्यंत पालखीच्या प्रदक्षिणा घातल्या जातात. हजारो भक्तांची हजेरी या सोहळ्यास असते.

पाच-सहा तास पालखी खेळविली जाते. पालखीला सर्व अठरा पगड जातीचे लोक हात लावतात. ही प्रथा चारशे ते पाचशे वर्षापासून सुरु आहे. नागरदेवळे गावी पालखी गेल्यावर पुढच्या शिडीस सर्व हरीजन लोक धरतात व मागच्या शिडीस माळी व इतर समाज बांधव धरतात. भिंगार कॅपच्या हद्दीत पालखी गेल्यावर प्रथम ती हरीजन वस्तीवर नेण्यात येते. त्यानंतर भिंगार वेशीच्या आत ब्राम्हण गल्लीतून पालखीच्या ओट्यावर विसावते. दरम्यान त्याच वेळेस पलंग भिंगार मारुती मंदिरात येतो. त्यावेळी पलंग पालखीची भेट होते. या दिवशी भिंगारला मोठी यात्रा भरते.

तब्बल पाचशे वर्षाचा इतिहास प्राप्त असलेली पलंग पालखीची मिरवणूक आजही तुळजापुरकरांसाठी एक आनंददायी आणि सदाबहार सोहळा आहे. या पालखीचे मानकरी येथील पुजारी यांच्या घरी आठ दिवस मुक्कमी असतात.

तर उद्या आपण भेटूया अहमदनगरच्या केडगाव येथील स्वयंभू रेणुका मातेच्या माहितीसह …

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : २६ एप्रिल २०२५ – मैत्रीतील मंदी परवडणारी नाही

0
मैत्रीचे नाते सर्वांना कायमच भुरळ घालते. तिचे वर्णन करताना साहित्यिकांच्या शब्दांना धुमारे फुटतात. कवींना कविता स्फुरतात. जिवलग मित्रांच्या भेटीच्या अनेक कथा, गोष्टी आणि कविता...