Sunday, June 23, 2024
Homeजळगावनवरात्रोत्सव विशेष : देश प्रगत तरीही ग्रामिण भागात मुलींसाठी उच्च शिक्षणाच्या...

नवरात्रोत्सव विशेष : देश प्रगत तरीही ग्रामिण भागात मुलींसाठी उच्च शिक्षणाच्या सुविधांचा अभावच

जळगाव : jalgaon

- Advertisement -

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असतांना देशाच्या प्रगतीचा आलेख मांडला गेला. विविध क्षेत्रात भारताने खरोखरच कौतुकास्पद प्रगती केलेली असली अजुनही ग्रामिण भागातील महिलांसाठी उच्च शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत. शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे. जो शिक्षण घेईल तो प्रगती करेल. असे सांगण्यात येत असले तरी उच्च शिक्षणासाठी आपले गाव सोडावे लागते. तर उच्च शिक्षणाचा खर्चही तेवढाच उच्च आहे. त्यामुळे हा खर्च पेलवला जाणार नसल्याने अनेक मुली शिक्षण अर्धवट सोडतात. यासोबतच समाजात मुली व महिलांबाबत असलेले असुरिक्षततेचे वातावरण. यामुळेही पालक मुलींना उच्च शिक्षणासाठी बाहेर गावी पाठवण्यास तयार नसतात. त्यामुळे मुलींसाठी उच्च शिक्षणाच्या सुविधा ग्रामिण भागात आणि तेही योग्य खर्चात झाल्यास देश 100 टक्के साक्षर होत महाप्रजासत्ताक होईल यात शंका नाही. असा सूर महिलांनी दिलेल्या प्रतिक्रियांतून निघाला.

स्त्रियांच्या सबलीकरणानेच भारत होईल महाप्रजासत्ताक

आजची स्त्री घरकाम आणि नोकरी अशा दोन्ही आघाड्या सांभाळत असतांना तीला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.. हे करत असतांना तीच्यावर अत्याचारही होत आहेत हेही दूर्लक्ष्ाून चालणार नाही. आजच्या आधुनिक युगात महिला अबला राहीली नाही. तीने प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तृत्व सिध्द केले आहे. भारताला सक्षम आणि महाप्रजासत्ताक होण्यासाठी महिलांना योग्य संधी आणि सुरक्षितता देणे गरजेच आहे. प्रत्येक स्त्री ही आर्थिक, सामाजिक रित्या सुरक्षित व स्वतंत्र असावी. जेेव्हा एखादी स्त्री विविध कारणांमुळे घराबाहेर पडते तेव्हा तीचा योग्य तो सन्मान करावा. तीच्यावर अत्याचाराच्या मानसिकतेपेक्षा तीच्या संरक्षणाची व सुरक्षिततेच्या मानसिकतेचा जागर व्हावा. सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांनी स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळवून दिला. मात्र आपल्या समाजामध्ये वावरतांना आपल्याला सामाजिक रचनेनुसार व व्यवस्थेनुसार रहावे लागते. समाजातील रूढी परंपरेने बंधनांना धरून चालावे लागते. असे असतांना येथे पुरूष व स्त्री यांच्यात व्यक्ती विभाजनाची किड वाढत आहे. स्त्रियांचे हक्क, पुरूषांचे हक्क यांच्यात भेदभाव होत आहे. यात स्त्रियांच्या स्वातंत्र्याकडे व हक्कांकडे दूर्लक्ष होत आहे. याबाबत जागर व्हावा.

सौ. प्रिती राजेश इंगळे. (देशमुख) जळगाव

निसर्गाच्या रक्षणातच मानवाचे रक्षण

आपल्या पूर्वकालीन पिढीतील लोकांनी ज्या चालीरीतील लिहून ठेवले आहे त्याच्यामागे नक्कीच शास्त्रीय कारण आहे. ठीक आहे त्या काही काही गोष्टींना धार्मिकतेची जोड देऊन त्याचे अवडंबन करण्यात आले. काळानुसार काही चालीरीती बदलणे काळाची गरज झाली आहे. कोणतीही मूर्ती आपण नदीत विसर्जन करतो निर्माल्य टाकतो त्याच्यामुळे पाणी प्रदूषित होते. मुर्ती पाण्यात विरघळली नाही तीचे अवयव काठावर येतात. ही एक प्रकारे आपल्या भावनांचा अपमान आहे. या चालीरीतींमध्ये थोडा बदल करणे खूप गरजेचं आहे. मूर्ती पाण्यात बुडवून पूजन करून परत ती नीट ठेवून देत परत पुढच्या वर्षी तिथेच पूजन केलं तर काही बिघडत नाही, प्रत्येकाने आपल्या परीने प्रयत्न केला तर नक्कीच आपली पृथ्वीचे संरक्षण करता येईल. शेवटी नशिबातील भोग, प्रारब्ध हे ज्याच्या त्याच्या नशिबी असेल तेच भोगावेच लागते. देवाचे नामस्मरण हे सुद्धा पुरेसं होतं. शेवटी सगळे नियम माणसाने निर्माण केले आहे. निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गाचे नियम समजून घेतले तर आपला आयुष्य निरोगी आणि दीर्घायुष्य नक्कीच होईल. पण त्याच्या मागची जी मूलभूत कारण आहे ती जर नव्या पिढीने समजून घेऊन त्याचे आचरण केले तर नक्कीच आपल्याला त्याचा आनंद घेता येईल. आपली संस्कृती व परंपरा जपता येईल व आपला हिंदू धर्म सर्वश्रेष्ठ आहे हे सिद्ध करता येईल. सौ. अनघा खारूल. जळगााव

जागर स्त्री शक्तीचा, तिच्या सन्मानाचा!

नवरात्र सुरू झाली की देवीच्या नऊ रूपाची पूजा केली जाते. आपण जर आजूबाजूला शोधले तर ही देवीची नऊ रूपे आपल्या घरातच सापडतात. यात पहिली माळ ही मातृदेवतेची असते. दुसरी माळ ही आजी नामक मायेच्या सागराची असते. तिसरी माळ ही माय मरो, मावशी जगो या उक्तीला जी जागते त्या मावशीची असते. चौथी माळ ही लहानपणी आपल्याला कडेवर घेऊन फिरवते त्या आत्याची. पाचवी माळ मायेच्या बहिणीची. सहावी माळ असते लग्नानंतर मिळालेल्या मैत्रिणीची अर्थात नणंदेची.आपल्याला आलेल्या छोट्या-मोठ्या अडचणींचे निवारण करणारी. लग्नानंतर नवीन घरात नवखेपणा जाणवू न देता,अलगद बहिणीची माया देणारी.सातवी माळ असते ‘अहो’ च्या मातृदेवतेची. सासुबाईंची.सासरच्या पद्धती, रिती-रिवाज, आवडी-निवडी शिकविणारी.ते सारं अंगवळणी पडेपर्यत सांभाळून घेणारी. आठवी माळ असते जीवाला जीव देणार्‍या जिवलग सखीची.नववी माळ आहे आपल्या लाडक्या लेकीची. जिच्या जन्मामुळे झालेल्या आपल्या मातृत्वाच्या सार्थकतेची. शेवटचा दसरा जो कामवाल्या बाईबरोबर होतो हसरा. आपला उजवा हातच जणू.जिच्या न येण्याने वेळापत्रक कोलमडतं.वेळप्रसंगी ताई तुम्ही थकलात, मी करते, बसा तुम्ही,असं म्हणून आपला क्षीण घालविणारी. रोजच्या जीवनातील देवींची ही वेगवेगळी रूपे त्यांना शतशः नमन ! सौ. मेघना मनिष पिंगळे. जळगाव

महिलांना द्या सन्मान,देश बनेल महान

आपल्या संस्कृतीत जिथे नारीची पूजा होते, तिथे प्रत्यक्ष भगवंताचा वास असतो असे म्हटले जाते. याप्रमाणे तिची पूजा केली की आपोआपच सर्व देवतांचे सान्निध्यही प्राप्त होतं. या स्त्री शक्तीचा आदर व सत्कार करणे म्हणजेच तिची पूजा करणे होय. समाजाचा पन्नास टक्के हिस्सा असलेल्या स्त्रियांच्या प्रगती शिवाय कोणत्याही समाजाची प्रगती होणार नाही हे लक्षात घेतले पाहिजे. मुला मुलींमध्ये समानता, मुलींचा सन्मान व त्यांना आत्मबळ या महिला सक्षमीकरणांच्या पायर्‍यांचा अवलंब केला पाहिजे. स्त्रियांचा सन्मान घरात झाला तरच समाजामध्ये होईल हे समजून घेतले पाहिजे. स्रीच्या असण्याने जग समृद्ध आहे. स्री ही आदिमाता आहे. जननी आहे. आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या सर्वच क्षेत्रात नाव कमवत आहे. चूल आणि मूल या चौकटीतून स्वतःला बाहेर काढून घराबरोबरच स्वतःची ओळख जपणारी स्री ही आजच्या काळातील खरी स्वयंसिध्दा आहे.

स्नेहल सतीश सरोदे,उपशिक्षिका, जे.टी.महाजन इंग्लिश मेडियम स्कूल. फैजपूर

नवरात्री म्हणजे स्त्री शक्तीचा अविष्कार

सध्या आपल्या संपूर्ण देशात स्त्री शक्ती दैवत नवरात्र उत्सव सुरू आहे.मोठ्या भक्ती भावाने व मंगलमय वातावरणात साजरा होत आहे.या नवरात्र उत्सवात अदभुत शक्तीचा जागर होत असतो.स्त्रीला न्याय व त्यांचे अधिकार मिळवून तिच्या दैवी शक्ती म्हणून बघण्याची परंपरा आहे. मुला मुलींना जन्म देण्यापासून तर त्यांचे संगोपन करून योग्य संस्कृती वातावरणात संरक्षणात वाढविण्याची जबाबदारी हि स्त्री वर असते. हिच स्त्री शक्तीचा जागर असतो आजच्या युगात पुरुषांप्रमाणेच खांद्याला खांदा लावून घराचा संसार हाकत असते.सकाळी उठल्या पासून तर रात्री झोपी पर्यंत स्त्री घरातील कामे कुठलेही त्रास न दर्शविता करीत असते. यातच स्त्री शक्तीचा जागर दिसत असतो. नवरात्री म्हणजे स्त्री शक्तीचा अविष्कार आणि स्त्री सन्मानाचा जागर…एकीकडे नवरात्र उत्सवातील भक्ती तर एकीकडे स्त्रीची शक्ती…नवरात्र उत्सवाच्या सर्व महिला भगिनींना,युवतींना व तमाम सर्व नागरिक बंधूंना खूप खूप मंगलमय शुभेच्छा !

सौ. अनिता जगदीश कवडीवाले, यावल.

स्त्रियांनी आत्मनिर्भर व्हावे

नवरात्रीचे उत्साहाचे आणि चैतन्यदायी पर्व सध्या सुरू आहे. संपूर्ण देशात स्री शक्तीचा जागर वेगवेगळ्या माध्यमातून होत आहे. असे असताना स्त्रीने आज सारी क्षेत्रे पादाक्रांत केले आहेत. शिक्षणाशिवाय हे शक्य झालं नसतं. म्हणून मुलींना स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल तर आधी शिक्षण घेतले पाहिजे. शिक्षण हेच सर्वांगीण सुधारण्याचे प्रवेशद्वार आहे. शिकलेल्या मुली विविध व्यवसाय निर्माण करू शकतात आणि व्यवसाय सांभाळून देखील शकतात. आमच्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींना शिक्षणाची गोडी लावून शिक्षणाच्या माध्यमातून त्या आत्मनिर्भर होतील. यासाठी माझा मनापासूनचा प्रयत्न असतो. वाचन आणि सुप्त कला गुण यातूनच मुलींचे व्यक्तिमत्व आकाराला येऊ शकते. त्या पद्धतीने त्यांचा प्रवास झाला पाहिजे. जळगाव शहराच्या आजूबाजूला खेड्यापाड्यावरून येणार्‍या विद्यार्थिनींनीच्या डोळ्यांमध्ये आत्मनिर्भार होण्याची आणि उमेदीने काहीतरी शिकण्याची जिद्द मी नेहमी पाहत असते. जोपर्यंत शहरांच्या मुलींपर्यंत खेड्यापाड्यातल्या मुली पोहोचत नाही, तोपर्यंत स्री शक्तीचे सबलीकरण झाले असं म्हणता येणार नाही. म्हणून त्या दिशेने प्रयत्न करण्यासाठी शिक्षण क्षेत्रानेच खरा पुढाकार घेतला पाहिजे. यासाठी ग्रामिण भागातही उच्च शिक्षणाच्या सुविधा पोहचणे गरजेचे आहे. असे माझे ठाम मत आहे.

प्रा.शीतल चौधरी, डॉ.अण्णसाहेब बेंडाळे कनिष्ठ महाविद्यालय, जळगाव.

आदीशक्तीच्या स्त्री रूपावर

समाजात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कामे करणारी नारी शक्ती आजही समाजात वावरत आहेत. अशा नारी शक्ती पुरूषांसोबत आपल्या संसाराचा गाडा ओढत आहेत. अशा जोडीदाराच्या सोबत कामे करणारी नारी शक्ती देखील आजच्या युगात आदिशक्तीचं दुसरं रूपच आहे. जी नारी आयुष्यभर आपल्या जीवनसाथी जोडीदाराच्या सुख आणि दुःखात नेहमी सहभागी होत असते व घरात अठरा विश्व दारीद्र असतांना देखील आयुष्यात नेहमी कष्टाचे जीवन जगत आपल्या जोडीदाराला आयुष्याशी लढा देण्याची ताकद देते, त्याला जीवनाच्या घसरलेल्या रस्त्यांवरून रूळावर आणण्याचे काम करते. जीवन हरपलेला असतांना त्याला जगण्याची उमेद तयार करून, कोणत्याही परिस्थितीत न डगमगता आपल्या जीवनसाथीला आयुष्यभर साथ देत असते. अशा आयुष्यभराच्या जोडीदाराला साथ देणार्‍या नारी शक्तीला देखील आजच्या युगात आदिशक्तीचं दुसरं रूपच मानले जाते. असे असतांना याच स्त्रीवर आजच्या आधुनिक व प्रगत समजत असलेल्या समाजातील काही अपप्रवृतींकडून अत्याचार होत असतात. हे दूर्देवी म्हणावे लागेल. निर्भया सारखे प्रकार दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत होत असतांना हा समाज व कायदा केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचेही चित्र दिसत आहे. हे कधीच योग्य नाही.

सौ.सुमित्रा अनिल सोळुंके, सरपंच चिंचोली. ता.यावल.

महिला आरक्षणाचा बागुलबुवाच..!

स्मार्टफोनच्या युगात स्त्री आधुनिक झाली आहे. मात्र, अद्यापही काही क्षेत्रात तिला झेरॉक्स म्हणूनच काम करावे लागत आहे. अनेकवेळा स्त्रियांना आम्ही आरक्षण दिले आहे, असे मिरविणार्‍यांकडूनच त्यांची अवहेलना केली जात असते. महिला आरक्षणाचा नुसता बागुलबुवाच दिसू येत आहे. सामाजिक जीवनात अजूनही पुरुषांपुढे महिलेला दुय्यम स्थान दिले जात असल्याने तिची कुचंबणा होते. तिला तिचा हक्क मिळवून देण्यासाठी झगडावे लागत असल्याने केंद्रातील सरकारने महिला व बालविकास विभागांतर्गत महिलांसाठी एक ठोस योजना सुरू करायला हवी. जेणेकरून महिलांची होणारी कुचंबणा थांबेल. ग्रामीण भागात अद्यापही विद्यार्थिनींना स्वच्छतागृहे नाहीत. त्यांच्या अनेक समस्यांची सोडवणूक करायला एखादी महिला शिक्षिका नेमल्यास तिचे जीवन सुकर होईल. अनेक ठिकाणी आशा सेविकांकडून चांगले कार्य होत असले तरी, बर्‍याच ठिकाणी तरुणींच्या आणि विवाहित महिलांच्या आरोग्यसंबंधीच्या समस्यांची गुंतागुंत कायम आहे. याबाबत केंद्र आणि राज्य सरकारने आवश्यक त्या उपाययोजना करायला हव्यात. विशेष म्हणजे, त्या केवळ कागदावरच न राहता त्यांची तात्काळ अंमलबजावणी केली गेली पाहिजे. महिलांसाठी अनेक योजना असून त्यांचा लाभ घेण्यासाठीच्या किचकट अटी व नियमांमुळे, सरकारी अनास्थेमुळे त्या केवळ कागदांवरच राहत आहेत.

भाग्यश्री श्रीकांत पाटील, गृहिणी. लासूर

स्त्री शिक्षणातच राष्ट्र विकास

एखाद्या राष्ट्राचा विकास घडवून आणायचा असेल तर त्या राष्ट्रातील प्रत्येक स्त्री शैक्षणिक दृष्ट्या सक्षम झाली पाहिजे. शिक्षण हे वाघीणीचे दूध आहे, जो ते प्राशन करील, तो समाजावर होणार्‍या अन्याय, अत्याचाराविरुद्ध बंड करून उठल्याशिवाय राहणार नाही असे डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते. बाबासाहेबांचे हे वक्तव्य शिक्षणाचे महत्त्व विशद करणारे आहे. शिकणार्‍याला शिकवावे लागत नाही तो स्वतःहुन शिकतो, पण आपल्या राष्ट्रावर पुरुष प्रधान संस्कृतीचा अजूनही खुप मोठा पगडा आहे, हे वर्चस्व कमी करून, स्त्रीला राष्ट्राच्या विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. म्हणजेच जेथे स्त्रियांचा आदर होतो तेथेच देव – देवतांचा निवास असतो. निती, न्यायाची व सदाचाराची शिकवण माताच बालकाला देत असते. स्त्रियांचा मान सन्मान राखणे हे समाजाचे कर्तव्य आहे, ज्या देशात स्त्रिया सुसंस्कृत, सदाचारी असतात ते राष्ट्र प्रगतीपथावर असते, असे महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी म्हटले आहे. म्हणून समाजाने परिवर्तनाचा वारसा जपला पाहिजे व शिक्षणाची दालने स्त्रियांसाठी खुली केली पाहिजे. यासाठी ग्रामिण भागात उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. अनेकवेळा महिलांना शिक्षणाची आवड असूनही केवळ उच्च शिक्षणाच्या सुविधा जवळ नसल्याने त्या शिकत नाहीत.

कल्पना तुळशीराम खेडकर, गृहिणी जळगाव.

स्त्रीच्या जडणघडणीत वडिलांची भूमिका महत्त्वाची!!

मेरी पहचान आप से पापा, क्या कहूं,आप मेरे लिए क्या हो,

रहने को है पैरों के नीचे ये जमीं, पर मेरे लिए तो मेरा आसमान आप हो कोणत्याही स्त्रीच्या जडणघडणीत पुरुषाचं स्थान असेल तर ते असतं वडिलांचं. वडिलांकडून प्रत्येक स्त्री काही न काही स्फूर्ती आयुष्यात घेत असतेच. वडीलच असतात जे आयुष्याच्या वाटेवर सगळ्यात पहिला आधार बनतात. त्यामुळे अनेकदा स्त्रीच्या आयुष्याला कलाटणी देण्याची आणि तिच्या आयुष्यात आमूलाग्र बदल करण्याची ताकद वडिलांकडे असते. जेव्हा वडील बनून एक पुरुष आपल्या मुलीतील दुर्गाशक्तीचं अस्तित्व समजून घेतो तेव्हा त्या शक्तीचा सगळ्यांत जास्ती सन्मान होतो.आपल्या वडिलांच्या रूपाने जेव्हा स्त्रीला असे प्रोत्साहन मिळते, तेव्हा तिच्यातील दुर्गाशक्ती असं काही मिळवते ज्याचा विचार करणेही कदाचित तिला एकटीला शक्य झाले नसते. कोणत्याही स्त्रीसाठी तिचे वडील हे पहिले आदर्श असतात. मुलगा असला म्हणजे तो वडिलांच्या कार्याची महती पुढे नेऊ शकतो हा समज मुलींनी खोटा ठरवला आहे. त्या देखील स्वत:च्या कर्तृत्वाने स्वत:चे पंख आकाशाच्या दिशेने विस्तारून मोठी झेप घेऊन दुर्गा शक्ती चे एक रूप होऊ शकतात. यासाठी आपले वडीलच आपले प्रेरणास्थान आहेत.

प्रिंयका प्रकाश पाटोळे, राष्ट्रीयस्तरावर सुवर्ण पदक विजेती (वेटलिफ्टिंग महिला खेळाडू) उंबरखेड. ता. चाळीसगाव

वाईट प्रवृत्तींचा नाश व्हावा

नवरात्रोत्सव म्हणजे आदीशक्तीचा जागर करून वाईट प्रवृत्तीचा, महिषासुराचा नाश करण्यासाठी अठरा भुजी रूप धारण केलेल्या आदीमाया महिषासुर मर्दिनीची कामना करण्याचा उत्सव. सर्व मंगल मांगल्ये म्हणून केलेल्या पूजाविधीमुळे पावित्र्य व आनंदी आनंद प्रसन्न वातावरणात, कुलाचार पाळून देविमातेचा उत्सव साजरा केला जातो. मात्र असे असतांनाही 21 व्या शतकातली वीस वर्षे संपत आली असतानाही परिस्थितीत बदल झालेला नाही आणि पुरोगामित्वाचा डांगोरा पिटणारे आम्ही सुधरायला तयार नाही. म्हणून माझ्या भगिनींची पीडा थांबव हीच प्रार्थना मी आदिशक्तीला हात जोडून करते. ग्रामिण भागातील असो वा शहरी भागातील वा मेट्रो सिटीतील. तीच्यावर होणार्‍या अत्याचारांच्या घटना कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच आहे. बदलेली जीवनशैली आणि चंगळवादामुळे आपण आपल्या मूळ भारतीय संस्कृतीला विसरून पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करत आहोत. जे की चुकीचे व घातक आहे. त्याचे वाईट परिणाम दिसत आहे. त्यामुळेच नवरात्रीच्या नऊ दिवस स्त्रीचा जागर करीत सुख, शांती, समृद्धी व पशुपालकांचा जिवाभावाचे पशुधनावर आलेल्या लंम्पिचा कायमचा नाश करून पशुधनासह पशुपालक, शेतकरी राजाला सुगीचे दिवस मिळू दे म्हणून प्रार्थना करते.

कविता प्रफुल्ल पवार. प. स. सदस्य कळमसरे गण. ता. अमळनेर.

देवीच्या ‘स्त्री’ रूपावर अत्याचार का?

बुद्धिमत्ता, सौंदर्य, सहनशीलता, सोशिकता, शालिनता, कुशलता इ. चे प्रतीक असलेली नारी ही परमेश्वराची अदभूत लाभलेली देणगी आहे. सामान्य स्त्री पासून तर देवीचे स्वरूप हे महिलेला प्राप्त झाले. मनुष्याची जननी पासून तर विशव निर्मात्री म्हणून तिची ओळख झाली. परंतु स्त्री गर्भातील स्त्री भ्रूण हत्ये पासूनचा प्रवास जेव्हा तिला वृद्धाश्रमापर्यंतचा रस्ता दाखवितो, तेव्हा मात्र मन विदीर्ण होते. जिची नवरात्री मध्ये सर्व लहान थोर, स्त्री -पुरुष मंडळी तिची पूजा करतात, उपवास -व्रत करतात, तेव्हा याच देवीचे रूप, पीडित महिले मध्ये समाजाला दिसत नाही का? भुकेली, निराधार म्हणून तिला रस्त्यावर फिरतांना पाहून नवरात्रीत केलेल्या पूजेची आठवण येत नाही का? समाजात हुंडाबली साठी याच देवी चा छळ मांडला जात नाही का? उच्च शिक्षणा च्या संधी मुलगी आहे म्हणून नाकारल्या जात नाही का? नवरात्री मधील देवींची विविध रूपे ही स्त्री मध्ये दिसून येतात, देवीची उपासना करणे म्हणजे प्रत्येक स्त्री चा आदर करणे, देवीचे उपवास करणे म्हणजे स्त्री विषयी असलेल्या अनैतिक विचारांचा त्याग करणे, देवीची आराधना म्हणजे तिला उचित मान, सन्मान देणे. एवढे जरी प्रत्येकाने केले तरी देवी प्रसन्न झाल्या शिवाय राहणार नाही.

सौ. मनीषाताई संदीप देशमुख. सरपंच. पुरनाड ता. मुक्ताईनगर.

सहकार क्षेत्रात स्त्रियांचा सहभाग आवश्यक

ग्रामीण भागाला खर्‍या अर्थाने सहकार क्षेत्रामुळेच बळकटी मिळाल्याने शेतकर्‍यांच्या विकासात सहकारी संस्थाचे मोठे योगदान असल्याने शेतकर्‍यांच्या पाठीमागे ग्रामीण भागातील विकास सोसायटीचे मोठे पाठबळ मिळत आहे. म्हणून अशा संस्था ग्रामीण भागातून उभ्या राहुन बळकट, सक्षम आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्या मजबूत झाल्या पाहिजेे. या सहकार संस्थाच्या माध्यमातून सहकार तत्वावर महिलासाठी ग्रामीण व शहरी भागात छोटे मोठे गृह,कटीर उद्योग सुरू करून यात महिलांना व बचत गटांना देखील सहभागी करून व्यवसाय उद्योगासाठी संधी,प्रशिक्षण देऊन अत्यल्प दराचा कर्जपुरवठा देऊन हातभार लावून उभे करण्यासाठी सहकार कायदयात बदल व आर्थिक तरतूदकरून महिला स्वत:च्या पायावर उभा रहिल्या पाहिजे. अशा योजना निर्माण करून स्त्रियांच्या हाताला काम देऊन त्यांना स्वावलंबी,सक्षम करण्याची मोठी गरज निर्माण झाली आहे. यासाठी सहकार कायदयात बदल परिवर्तन करणे आवश्यक आहे. म्हणून सहकार क्षेत्रात स्त्रियांचा सहभाग वाढला तर निश्चितच गैरव्यवहार, भष्टाचार सारख्या वाईट प्रवत्तीला आळा बसेल म्हणून सहकारी संस्थावर देखील महिलांनी नेतृत्व करण्यासाठी पुढे आले पाहिजे. ती संधी शोधून स्त्रीयांनी आता पुढे आले पाहिजे व येण्याची गरज मोठी आहे.

गं.भा.द्रोपदाबाई एकनाथ महाजन. गुढे.ता.भडगांव

मूळ संस्कृतीतील बदल धोकेदायकच..

भारतीय संस्कृती ही मुळात धार्मिक प्रवृत्तीची आहे. आपण सर्वजण वेगवेगळे धार्मिक विधी व सोहळे साजरे करत असतो. त्यापैकीच नवरात्री हा सोहळा संपूर्ण भारतात साजरा केला जातो. आई दुर्गा भवानीची महती आपल्या सर्वांनाच माहिती आहे, म्हणून आनंदी व उत्साही वातावरणात आपण देवीचे व्रत करतो. स्त्री असो वा पुरुष, सर्वांनी देवीचे व्रत घेऊन पूजा केली पाहिजे, जर काही कारणास्तव आपण स्वतः करू शकत नसलो तर आपल्या घरातील सज्ञान व्यक्तींनी किंवा ब्राह्मणाकडून ते करून घ्यावे. नवरात्र म्हणजे नऊ दिवसांचा उत्सव घटस्थापना व दीप प्रज्वलन या गोष्टींचे महत्व आहे, यामुळे घरातील वातावरण व मनातील भाव सुद्धा निर्मळ राहतो. तसे पाहिले तर प्रत्येक सणांमागे वैज्ञानिक व धार्मिक असे कारण आणि महत्त्व आहे. त्यामुळे ही पंरपरा किंवा रूढी अनेक वर्षांपासून चालत आलेल्या आहेत. यातील काही लिखीत किंवा अलिखीत असल्या तरी त्यांची रूजूवात बालपणापासून आपल्यावर परिवारातील ज्येष्ठांकडून वेळोवेळी होत असते. त्यामुळेच या संस्कृतीचा वारसा युगानू युगे चालू आहे. सणवारांनिमित्ताने परिवारातील सर्व सदस्य नोकरी व्यवसाय सांभाळून एक दोन दिवस सुटी काढून एकत्र येतात. सणउत्सव एकत्रितपणे साजरे केले जात असले तरी आज त्यांचे स्वरूप बदलत आहे. की जे चुकीचे ठरत आहे. मूळ संस्कृतीचे हे बदलेले रूप घातक ठरत आहे. याबाबत जागर व्हावा.

प्रा.हेमलता बर्‍हाटे. डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय, जळगाव

- Advertisment -

ताज्या बातम्या