Saturday, October 12, 2024
HomeUncategorizedनवरंग स्त्री मनातले : रंग माणुसकीचा

नवरंग स्त्री मनातले : रंग माणुसकीचा

दुर्गेचे रूप तिसरे चंद्रघंटा मातेचे,
अंध:कराचे करून निर्मूलन,
रक्षण करी ती धर्माचे,
प्रतिक ती असत्यावर सत्याचा विजयाचे,
नवरात्रोत्सवातील रंग लाल देईल बळ साहसाचे.

- Advertisement -

रंग तिसरा माणुसकीचा. मागच्या वर्षीच्या नवरात्रीच्या दिवसात मी अनुभवलेला एक रंग. माझे मिस्टर आजारी म्हणून त्यांना दवाखान्यात अ‍ॅडमिट केलेलं. तिथेच एक मध्यमवर्गीय स्त्री अ‍ॅडमिट केलेली होती. सुरुवातीला दोन दिवस तिच्याकडे कोणीतरी येऊन जायचे पण थोड बरं वाटायला लागल्यावर मात्र तिच्याकडे कोणीच यायचं नाही. दिवसभर ती एकटीच असायची. एक दिवस सहज तिला हे असं का? विचारावं म्हणून मी तिच्याजवळ गेले. म्हणाले, मावशी बरं वाटतंय का? तर आनंदाने त्या म्हणाल्या, हो ना ताई तिचा आनंदी चेहरा पाहून मी म्हटलं का हो, तुमच्याकडे तर कोणीच येत नाही. अशी कशी ही घरची माणसं?  एवढा पण वेळ नाही का? ती लगेच म्हणाली, ताई ती घरची माणसं नाहीत. ती माझ्यासाठी  देव माणसं आहेत. मला आश्चर्य वाटलं. मग ती सांगू लागली. ताई मला एक मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे  आहेत. पण त्यांनी मला वेगळं काढून दिलयं. गेले तीन-चार वर्षांपासून मी एकटीच राहते. चार घरची काम करते. या देव माणसांच्या घरी मी दोन वर्षापासून कामाला येते पण तेव्हापासून मला देवाकडे जगण्यासाठी म्हणा की, कशासाठी काहीच मागायची वेळ आली नाही.

आता मी आजारी पडले तर मला दवाखान्यात या दादा-वहिनींनीच अ‍ॅडमिट केलं. स्वतःच्या बहिणीसारखी माझी काळजी घेतात. त्या वहिनी, त्यांची मुलं अगदी सगळेच बिचारे सकाळी घरातील सर्व काम करून मला डबा, माझी औषध आणून देतात. एरव्ही घरात कोणत्याच कामाला हात न लावणार्‍या वहिनी घरातली सगळी काम करून माझ्यासाठी एवढं करतात, यालाच तर माणुसकी म्हणायचं ना. तर असा हा रंग आपल्यातल्या माणुसकीचा तिसरा रंग. असे अनेक रंग मी पाहत आले, अनुभवत आले. आपल्या नवरात्रीतल्या नवरंगाचे पावित्र्य अन् सौंदर्य या रंगात अनुभवायला मिळतात. आणि मग त्यांचा उत्सव होऊन जातो आयुष्यात. कलियुगात माणुसकी संपली असतानाही बराच वेळा हे माणुसकीचे रंग आपल्याला पाहायला मिळतात आणि देवाकडे प्रार्थना करावीशी वाटते. माणसाने माणसाशी माणसासम वागणे हीच आमची प्रार्थना अन् हेच आमचे मागणे. नवदुर्गा चंद्रघंटा माता की जय.

– सौ. अनिता अनिल व्यवहारे, श्रीरामपूर

- Advertisment -

ताज्या बातम्या