Monday, November 18, 2024
HomeUncategorizedनवरंग स्त्री मनातले : रंग कृतज्ञशिलतेचा

नवरंग स्त्री मनातले : रंग कृतज्ञशिलतेचा

आदिशक्ती कुष्मांडा मातेच्या स्मित हास्याने
निर्मिले तिने ब्रह्मांड
ज्ञान उत्साह अन् समृद्धीच्या साहाय्याने
होईल प्रगती सर्वांची अखंड  
या नवदुर्गेच्या चौथ्या रुपाला सहस्त्र वंदन.
 जसे नवरात्र सुरू झाले तसे अनुभवातून माणसाच्या आयुष्यातल्या रंगाची वेगवेगळे रंग अनुभवायला मिळाले. असाच हा एक रंग.
 
  

मी रोज सकाळी 10 वाजता शाळेला जायचे. जाताना रेल्वेच्या दादरवरून पलिकडे जायला लागायचे. एक दिवस जाताना मला एक लोभसपण शरीराने जराशी मलीन, अस्ताव्यस्त, फाटक्या कपड्यातली मुलगी दिसली. ही मुलगी खूप आतुरतेने पण केविलवाण्या नजरेने माझ्याकडे पाहत होती. माझं तिच्याकडे लक्ष गेलं पण मला उशीर होत असल्याने मी तशीच निघून गेले. आणि शाळेत गेल्यावर तर विसरूनही गेले. पण जेव्हा संध्याकाळी घरी येत होते तेव्हा मात्र ते सर्व आठवलं. इकडे तिकडे शोधलं पण ती काही दिसली नाही. अर्थात घरी आल्यावर पुन्हा विसरले. दुसर्‍या तिसर्‍या दिवशीही तेच. मग मात्र चौथ्या दिवशी मी मुद्दामहून तिथे थांबले. तिच्याकडे पाहिलं. तिच्या सुकलेल्या चेहर्‍यावरचे डोळे चमकले. मी म्हणाले, काय गं? ती म्हणाली, काय नाही.!

- Advertisement -

मग रोज काय पाहतेस. इथे काय करतेस? असा प्रश्नांचा भडीमार केला. तिच्याकडून उत्तराची अपेक्षा नव्हतीच जणू त्यामुळे मी तशीच निघून गेले. आज मात्र शाळेत तो निस्तेज चेहरा, चमकदार डोळे नजरेसमोरून हटेना. संध्याकाळी येताना माझी नजर तिला शोधू लागली. पण बहुधा संध्याकाळी ती दुसरीकडे जात असावी. आज मनात मात्र मनात हुरहुर कायम. दुसर्‍या दिवशी मी लवकर काम आटोपून निघाले. हेतू हाच की तिच्याशी बोलायचं. कारण तिने मला वेड लावलं होतं. आणि ती भेटली. मला आणि तिलाही आनंद झाला. पुन्हा तेच काय गं?  इथं काय करतेस? काय पाहतेस? तेच ते प्रश्न. इथे उभे राहून भीक मागते.  कुणासाठी गं? माझ्या मित्रांसाठी, मित्रांसाठी?  कुठे आहेत तुझे मित्र? त्यांना बाजूच्या टपरीमागे झोपवून आले. असा आमच्यातला संवाद. मला तिचा राग आला. स्वतःला खायला मिळेना आणि मित्रांसाठी भीक मागते. मी तिला विचारले, अग काय हे? तुझ्या घरचे कुठे आहेत. आई, वडील, बहिण, भाऊ, मावशी मला कोणीच नाही. फक्त हे दोन मित्र आहेत. आणि मी त्यांच्यासाठी जगतेय. बरं बरं ठीक आहे. आता हे चॉकलेट घे. उद्या तुझ्या मित्रांना घेऊन ये मला भेटायचे त्यांना असे सांगून मी तिथून निघून गेले. दुसर्‍या दिवशी ती मुलगी आणि तिच्या मांडीवर जवळजवळ दोन छोटी छोटी कुत्र्यांची पिल्लं. मी मात्र तिच्या मित्रांना शोधत होते. बाजूला कोणीच नव्हतं. काय गं कुठे आहेत तुझे मित्र? दोन्ही पिल्लांना गोंजारत ती म्हणाली, हे काय. आता मला आश्चर्य वाटलं, रागही आला. मी तिच्यावर रागावणार तेवढ्यात तीच म्हणाली, मावशी (ती मावशी म्हणताच माझा राग थोडासा निवळला) रागावू नकोस गं. अगं या पिल्लांमुळेच मी आज तुझ्यासमोर उभी आहे. हेच माझे पाठीराखे. अगं दोन-तीन महिने आधी कोरोनामुळे माझी आई, वडील, दोन भाऊ,  एका रात्रीत मला सोडून निघून गेले. मी मात्र वाचले. पण मावशी ते कोरोनामुळे गेले. म्हणून लोकांनी मला हाकलून दिले. आमची झोपडी जाळली. आणि मग मी मरायचं ठरवलं. आणि जीव द्यायला विहिरीकडे गेले. मी उडी टाकणार तेवढ्यात ही दोन पिल्ल मला आडवी आली, भुंकू लागली. माझ्या पायात घोटाळू लागली. माझे कपडे धरून ओढू लागली. शेवटी मी परत मागे फिरले.
त्या रात्री ती पिलं माझ्याबरोबर एका झाडाखाली झोपली. दुसर्‍या दिवशी तेच घडले आणि मग मी ठरवलं की आता नाही मरायचं. जगायचं या पिल्लांसाठी, प्रेम द्यायचं त्यांना  एवढेच नाही तर त्यांनी त्या दिवशी रात्री शेजारच्या एका लग्नाच्या मांडवा बाहेरून उष्टावळीतली पत्रावळी ओढीत आणून मला झोपेतून जागं करून जणू मला ते खायला भाग पाडत होते. त्यांचे ते प्रेम पाहून मी जगायचं आणि त्यांना जगवायचं ठरवलं. या गोष्टीला आता दोन महिने झाले. मी जमेल तसे थोडेसे काम करते, भीक मागते, आलेल्या पैशातून, भिकेतून जे मिळेल ते खाते त्यांनाही खाऊ घालते. जीव जडला गं त्यांच्यावर असं म्हणून ती त्यांना गोंजारत होती.  ते लडिवाळपणे तिच्या मांडीवर उड्या मारत होते. आता मात्र डोळ्यातून टिपं गाळायची माझी पाळी असावी. टप टप करून डोळ्यातील पाणी गळत होतं. इतके दिवस तिची कीव येत असूनही तिच्या अवतारामुळे कधीही तिला जवळ घेतलं नाही. पण आज मात्र पटकन तिला मी तिला जवळ घेतलं. तिचे हात हातात घेऊन मी तिला दिलासा दिला. काळजी करू नकोस, आता मी आहे तुमची सर्वांची मावशी.
 पुढे रोज मी तिच्यासाठी जमेल तसे काहीतरी खायला घेऊन जायला लागले. आणि आज सकाळी  त्या मुलीने माझ्यासमोर ओंजळ उघडली. त्या ओंजळीत एक छोटासा गजरा. अगं हे काय? आणि कुठून आणला.  असं मी विचारताच ती म्हणाली की, आमच्या तिघांकडून तुला भेट. मी आजूबाजूला पाहिलं तर जाई जुईच्या चार-पाच फांद्या तिथे पडलेल्या दिसल्या आणि सगळं  लक्षात आलं. या पिल्लांनी या फांद्या तोडून आणल्या. त्यांची फुले काढून तिने गजरा केला. तो मला देण्यासाठी.
किती ही कृतज्ञता आणि या नवरात्रीच्या नऊ रंगातल्या अशाही एका रंगाची. उधळण पाहून मन जसं गहिवरले त्याहून जास्त आनंदले. आणि वाटलं हाच तर आजचा रंग कृतज्ञशिलतेचा.

– सौ. अनिता अनिल व्यवहारे, श्रीरामपूर.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या