Saturday, July 27, 2024
HomeUncategorizedनवरंग स्त्री मनातले : रंग भावनिकतेचा

नवरंग स्त्री मनातले : रंग भावनिकतेचा

नवरंगातलल्या पाचव्या माळेला,
स्कंदमातेच्या करुनी पूजा मिळवूया ऊर्जा,
तिच्या आशीर्वादाने मिटतील सार्‍या चिंता,
नवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा.
जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा,
एक आईचा आईचा एक ताईचा.

आज सकाळपासून याच ओळी आठवत होत्या. आज पाचवी माळ. नवदुर्गेचा, स्त्री  शक्तीचा उत्सव. मागच्या वर्षीचा घडलेला तो प्रसंग आठवला. आम्ही दहा-बारा मैत्रिणी मिळून वैष्णव देवीला निघालेलो. रेल्वेचा प्रवास होता. सगळ्याजणी खूप आनंदात होतो. दोन दिवसाचा तो रेल्वेचा प्रवास नेहमीप्रमाणे आमच्यासाठी आनंदाची पर्वणी घेऊन येणारा असाच होता. योगायोगाने आमच्या डब्यात एक अनोळखी बाई, तिच्या दोन मुली आणि एक मुलगाही होता. सकाळपासून आमच्याबरोबर एकाच डब्यात असूनही ती बाई आमच्याशी आम्ही बोलू तेवढेच सहभागी होत होती. तिची मुलंही फारसी आनंदी वाटत नव्हते. माझी एक मैत्रीण माधुरी अतिशय अवखळ, विनोदी, निखालस व्यक्तिमत्व असलेली स्वतःच्या भाव विश्वात डोकावण्याऐवजी दुसर्‍यांच्या भाव विश्वात डोकावणारी. आम्ही तिला याबाबत  नेहमी छेडायचो. पण तिचा स्वभाव काही बदलत नव्हता. आताही ती तेच करत होती. पण तरीही समोरची बाई मात्र आमच्याशी तथास्तुच होती. आम्ही त्या चौघांचे दिवसभराचे वागणे पाहत होतो. मला दोन मुली आणि हा एकुलता एकच मुलगा हे तिने आम्हांला दोन चार वेळा ऐकवले होते. हे सांगताना मात्र ती त्या मुलाला प्रेमाने कुरवाळायची. जणू त्याच्याबद्दल तिच्या मनात खूप अभिमान होता. रेल्वेत भेळ वाला, कुल्फीवाला आला. तेव्हा त्या मुलींनी दोनदा आईला भेळीसाठी आग्रह केला. पण आईने प्रत्येकवेळी भूक लागली तर  डबा काढून देते. तो खा असेच सांगितले. पण तिसर्‍या वेळी जेव्हा पुन्हा कुल्फीवाला आला तेव्हा मात्र तिने मुलाला मात्र दोन कुल्फ्या आणि मुलींसाठी मात्र एकच कुल्फी घेऊन दिली. त्यानंतरही पुन्हा असा एकदा असाच प्रसंग. छोट्या मुलीने जेवायला मागितले तर थांब थोडं करीत वेळ मारून नेली. पण मुलाला मात्र तीन तीनदा विचारत राहिली. आम्ही दिवसभर हे सर्व पाहत होतो. बाकीच्यांनी फारसं मनावर घेतलं नव्हतं. पण माधुरीचं मात्र पूर्ण लक्ष होतं.
 

- Advertisement -

तिचे विचारचक्र चालूच होते. जेव्हा सर्व झोपेच्या आधीन झाले तेव्हा तिच्या दोन्ही मुली डोक्याखाली आधाराला हाताची उशी करून झोपी गेल्या होत्या. मुलाला मात्र तिने बॅग मधल्या कपड्याच्या घड्या देऊन अंगावर शालही दिली होती. तरी त्याला मात्र झोप येत नव्हती. त्या निरागस चेहर्‍याच्या कोमेजलेल्या कळ्या मात्र निद्रादेवीच्या आधीन झाल्या होत्या. तेव्हा माधुरीने त्या बाईशी बोलायचं ठरवलं. माधुरीने तिला बोलतं केलं. इकडचं तिकडचं विचारत जेव्हा तिला बोलत केलं. तेव्हा कळलं की, हिला चार मुलांच्या पाठीवर हा मुलगा झालाय. तिला तीन नणंदा होत्या. त्यामुळे सासूपासूनच. मुलगा या वर्तुळाभोवती त्यांचे कौतुक हे विशेष होतं.
 माधुरी तिला म्हणाली, अगं बाई आहेस कुठे तू? थोडीफार शिकली सवरलीस ना! मग मुलगा, मुलगी हा भेदभाव का करतेस? जग बघ किती पुढे चाललय. अगं हल्ली मुलांपेक्षा मुलीच कर्तृत्ववान आहेत. जरी त्या लग्न करून सासरी जाणार असल्या, परक्याचं धन असल्या तरी त्या दुरून का होईना वेळप्रसंगी त्या आई-बापाची सेवा करतात. आपण मुलगा-मुलगा म्हणून यांचे लाड करतो, त्यांच्यावर गाढवी प्रेम करतो. कारण हे असतात ना वंशाचा दिवा. अगं हे वंशाचा दिवा नाही. तर हे दिवटेच निपजतात (अर्थात  सर्वच नाही पण) आणि जेव्हा आपण त्यांच्यासमोर असा  सर्वांना दिसणारा, जाणवणारा भेदभाव करतो ना.. तेव्हा त्यांच्या मनावर तेच बिंबलं जातं. आणि ती अती लाडाने बिघडत जातात वगैरे.  तिने खूप समजावून सांगितलं. हे सर्व तो मुलगा ऐकत होता. आता डब्यात शांतता झालेली. माधुरीच्या वरच्या सीटवर मी आणि शेजारच्या शीटवर त्या बाईचा मुलगा आम्ही दोघही मात्र त्यांच्यातला तो संवाद ऐकत होतो. माधुरी खूप बोलत होती. अखेर शेवटी बोलून थकली भावुक झाली असावी.
 बघ बाई.. तुझं तू ठरव, पण तुझ्या लेकरांना आनंदी ठेवायचं असेल, त्यांचा उत्कर्ष करायचा असेल तर सोडून दे हा मुलगा, मुलगी भेदभाव मी तुझ्या पाया पडते. आणि बरच काही बोलून नंतर ती झोपी गेली. निम्मी रात्र उलटून गेली होती. आता सर्वच झोपेच्या अधीन झाले. तो मुलगा मात्र अजूनही जागा होता. तो हळूच उठून आईजवळ गेला.  त्यानंतर मात्र मलाही झोप लागली होती. पण पहाटे जेव्हा मला जाग आली. अचानक रात्रीचा तो प्रसंग आठवला. म्हणून सहज तिकडे डोकावले. तर काय आश्चर्य! ती बाई तिच्या एका मुलीच्या सीटवर तिच्या उशाशी आणि मुलगा दुसर्‍या मुलीच्या उशाशी बसलेला. आई हळुवार हाताने मुलीला थोपटत होती. मुलगाही बहिणीच्या डोक्यावर हात ठेवून बसला होता. दोघींचेही डोक्या खालचे आधाराचे हात आता आई आणि भावाच्या हातात होते. कारण आता आधारासाठी जणू त्यांना आई आणि भावाच्या मांडीचा आधार मिळालेला होता. अजून डब्यात कोणीच जागे झाले नव्हते. मी हळूच माधुरी जवळ गेले, तिला उठवलं, ती हलकेच उठली. समोरचे दृश्य बघून माझ्या इतकीच ती अवाक् झाली आणि त्याचवेळी मला जाणवलं. अरे हाच का तो पाचव्या माळेचा स्त्री मनातला, नवरात्रीच्या नऊ रंगातला  रंग..

माझी मैत्रिणी माधुरीच्या मनातला तो भावनिकतेचा रंग. असेच रंग आपल्या सर्वांच्या मनात मिसळत राहो. जगदंबा, स्कंदमाता यांचे आपल्याला शुभाशीर्वाद लाभो.

– सौ. अनिता अनिल व्यवहारे, श्रीरामपूर

- Advertisment -

ताज्या बातम्या