Saturday, May 25, 2024
HomeUncategorizedनवरंग स्त्री मनातले : रंग त्यागाचा

नवरंग स्त्री मनातले : रंग त्यागाचा

 आज करूया जागर देवी सिद्धीदात्री देवीचा,
देईल देवी आशीर्वाद सुखी जीवनाचा.

प्रेम अडीच अक्षरी शब्द. पण या शब्दातली जादू संपूर्ण चराचराला भुरळ घालते. प्रेमाशिवाय जीवन अशक्य. पण प्रेम म्हणजे काय? तर प्रेम म्हणजे आपल्या माणसांसाठी केलेला त्याग आणि असा प्रेमाचा रंग प्रेमाने निभावते ती स्त्री. काल खूप वर्षांनी माझी मैत्रीण भेटली. शालेय जीवनापासून कॉलेजपर्यंत काकूबाई असणारी ही प्राजक्ता. आज अगदीच मॉर्डन लुकमध्ये पाहिली. सुरुवातीला मी तिला ओळखलं नाही. पण तिने मला चटकन ओळखलं. इकडच्या-तिकडच्या गप्पा झाल्यावर मला म्हणाली, चल खूप बोलायचं तुझ्याशी म्हणून कॉफी घेण्यासाठी मला घेऊन गेली. अगोदर माझी चौकशी केली. मी म्हणाले तुझं सांग, तुझे मिस्टर काय करतात? तुला मुलं किती? वगैरे वगैरे. आता मात्र चेहर्‍यावरचा आनंद मावळला, डोळे पाण्याने भरून आले, मी तिला धीर देत बोलतं केलं. तशी ती सांगू लागली. अगं आपण ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर आपल्यातल्या काही मैत्रिणीचे लग्न झालं. मला मात्र पुढील शिक्षणाची खूप इच्छा होती आणि माझ्या बाबांचीही तशी इच्छा असल्यामुळे त्यांनी मला एम. एस. सी साठी शहरात पाठवलं. तिथल्या वातावरणात मी पूर्ण बदलून गेले. त्या काळातच मला समीर नावाचा एक मित्र भेटला आणि दोस्ती प्यार में बदल गयी.

- Advertisement -

आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करू लागलो. स्वभावाने शांत, सालस आणि संस्कारी होता तो.आम्ही एकमेकांशी लग्न करायचं ठरवलं. पण तुला माहित आहे की माझे बाबा अतिशय कडक शिस्तीचे त्यांना प्रेम विवाह वगैरे मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी या सर्व गोष्टीला विरोध केला आणि जोपर्यंत माझ्या घरून होकार येत नव्हता तोपर्यंत समीरनं त्याच्या घरी हे सांगितलं नव्हतं. त्याचं म्हणणं असं होतं की,  घरच्यांना मान्य असेल तरच लग्न करायचं. पण हे शक्य नव्हतं. त्यामुळे मी त्याला पळून जाऊन लग्न करायचा आग्रह करत होते पण त्याचं मन मात्र याबाबतीत तयार होत नव्हतं  आणि अशातच त्याची आई खूप आजारी पडली. आईच्या आग्रहाखातर त्याच्या वडिलांनी त्याचं लग्न परस्पर ठरवून टाकलं. तो आई-वडिलांच्या शब्दाबाहेर जाणार नव्हता. शिवाय माझ्या आई-वडिलांचा या लग्नाला विरोध असल्यामुळे तोही तिकडे तयार झाला. त्याची परिस्थिती बेताचीच. तिकडे त्याचं लग्न झालं परंतू यापूर्वीच आमच्या दोघात नको त्या गोष्टी घडून गेलेल्या. त्यातून मी प्रेग्नेंट राहिले. आई-वडिलांनी समजावलं तरी मी ऍबॉर्शन करायला तयार नव्हते. त्यामुळे माझ्या आई-बाबांनी बदनामी नको म्हणून  मला आणखी लांब पाठवले. मला एक मुलगी झाली. माझ्या आई-बाबांनी माझ्या सांगण्यावरुन तिला आश्रमात पाठवली. मी तिला भेटायचं नाही तरच आम्ही तिला चांगल्या शाळेत घालू, तिचं पूर्ण शिक्षण चांगल्या शाळेत करून तिचा सर्व खर्च करु, असं सांगून माझ्या मनाची समजुत काढली व माझे एका मुलाशी लग्न लावून दिलं. पुढे माझा संसार सुरळीत चालला. सहा-सात वर्षातच प्रयत्न करूनही आम्हांला मुल झालं नाही. मी समीरच्या मुलीला घरी आणते असं बाबांना वारंवार विनवून त्यांनी माझं ऐकलं नाही. माझ्या नवर्‍याला याची अजिबात कल्पना नव्हती. पुढे मात्र माझ्या पतीचे निधन झाले. मी एकटी पडले. दुसरं लग्न त्या काळी मान्य नव्हतं. मुलीला घरी आणण्याचा निर्णय घेतला पण तेवढ्यात योगायोगाने दहा वर्षानंतर मला समीर भेटला. त्याला ही मूलबाळ नव्हते. मग मी निर्णय घेतला की त्याची मुलगी त्याला देऊन टाकायची.त्याला आणि तिलाही बाप लेकाचं प्रेम मिळेल. तो नाईलाजाने या गोष्टीला तयार झाला. त्याला मुलगी दत्तक दिल्यानंतर मी पुन्हा ते शहर सोडलं. त्याला कधीच न भेटण्यासाठी. आजही तो मजेत आहे. त्याच्या आयुष्यात आनंदी आनंद झाला. मुलगी खूप शिकली, डॉक्टर झाली. तिला दोन छोट्या मुली आहेत. एकंदरीत समीर त्याच्या आयुष्यात सुखी आहे.

माझे आई-बाबा गेले. बहीण भावांनी केव्हाच संबंध तोडले. तुझ्या सारख्या मैत्रिणी मिळाल्यात. त्यांच्या सहवासामुळे थोडंसं मनाला बरं वाटतं. पण आता हे सगळं असह्य होतंय गं.. मुलीला एकदा डोळे भरून पहावं वाटलं खूप वेळा. आणि अजूनही पण नाही भेटणार कधीच.
त्यांच्या सुखात माझं सुख आहे. पैसा आहे गं… बाकी. हे सगळं ऐकून मलाही खूप वाईट वाटलं. मी तिला म्हणाले, अगं पण तू तेव्हा समीरकडे राहायचं ना, त्याला सांगायचं ना, त्यावर ती म्हणाली, अगं त्याची बायको खूप छान होती. त्यांचा संसार सुखाचा होता. मुलगी मिळाल्यावर तर ती खूप आनंदी झाली. त्यांच्या सुखात मी कशाला विरजण घालू. आणि माझं अजूनही समीरवर तितकंच प्रेम आहे. मग त्याला  सुखात असलेलं पाहून मला आजही आनंद मिळतोय. मी कोठे आहे हे मात्र मी त्याला कळू दिलेलं नाही. त्याच्या हृदयात जाऊ दे पण, त्याच्या आयुष्यात मला जागा आहे का? हेही मी जाणून घेतलं नाही आणि आता तर काय?  पण मी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्यावर प्रेम करील गं.. म्हणतं ओलावलेल्या डोळ्यांच्या कडा पुसत मला म्हणाली, चल आता उशीर झालाय भेटू पुन्हा. उशीर तर झालेला होताच. मी तिच्यासाठी काही करू शकत नव्हते. पण तिने प्रेमासाठी केलेला त्याग पाहून धन्य वाटले. आजच्या नवरंगातला रंग प्रेमाचा नव्हे, तो आंम्हा स्त्री मनाच्या त्यागाचा रंग….! भाव खाऊन गेला. असं वाटलं त्याग या एका भावनेनचं हा रंग पुरुषांपेक्षा आमच्यावर खुलून दिसत असावा.

सौ.अनिता अनिल व्यवहारे, श्रीरामपूर.

- Advertisment -

ताज्या बातम्या