Tuesday, November 5, 2024
HomeUncategorizedनवरंग स्त्री मनातले : रंग समजुतदारपणाचा

नवरंग स्त्री मनातले : रंग समजुतदारपणाचा

नवरात्रीच्या नवरंगातल्या नवदुर्गेचे निरुपम दिसे रूप,

रंग दुसरा श्वेत वस्त्र परिधान करून आली ब्रम्हचारिणीच्या रूपात,

- Advertisement -

प्रेम उत्साह अन् मांगल्य नांदो घराघरात,

वंदन तुजला माते नवचैतन्य दे तू जीवनात.

रंग दुसरा समजुतदारपणाचा योगायोगाने नवरात्रीचे दिवस होते. दुसरा दिवस, दुसरी माळ खिचडी साबुदाण्याची लहान मुलांच्या आवडीची. त्यामुळे त्यावर यथेच्छ ताव मारून माझ्या नाती ओसरीवर खेळत होत्या. त्यांच्या खेळातल्या सगळ्या खेळण्या चटईवर पसरून त्यांचा खेळ चाललेला. तेवढ्यात एक दहा-बारा वर्षाची मुलगी आणि तिच्या कडेवर तीन वर्षाचं पोरं. त्या मुलीने त्या छोट्या बाळासाठी माझ्या नातीकडे ए दिदी, आम्हांला खायला दे ना काहीतरी म्हणून मागितलं. माझी मोठी नात तशी समजुतदार. लगेच आजी-आजी ओरडत घरात पळत आली आणि मला सांगू लागली. अगं आजी बाहेर एक मुलगी आली. तिच्या कडेवर छोटसं बाळ आहे. त्यांना खूप भूक लागली काहीतरी खायला दे ना. मीही लगेच पोळी-भाजी काढली तिला द्यायला. आणि नातीला म्हणाले, चल तिने गालातल्या गालात हसत माझ्याकडे पाहिलं आणि गोड हसून, डोळे मिचकावत म्हणाली, आज्जी थोडीशी खिचडी.! तिच्या मनातले भाव समजले. तशी मी ताटात खिचडीही ठेवली. ती आनंदली. आम्ही दोघी त्या मुलीला जेवण देण्यासाठी बाहेर आलो. आणि समोरच दृश्य पाहून दोघी अवाक झालो.

एरव्ही आपल्या खेळणीला कोणालाही हात न लावू देणारी, कुणी लावलाच तर घर डोक्यावर घेणारी माझी नात चक्क त्यातलं बरचं खेळणं त्या बाळाला देत होती. मी म्हणाले, अगं हे गं काय? इतकी सारी खेळणी दिलीस त्याला.अगं आजी… जाऊ..दे..गं. तो खेळणी पाहून रडत होता. त्याच्या दिदीकडे खेळणी मागत होता. म्हणून मी दिली. तसं पण मी मोठ्ठी झालेय आता. शिवाय शाळेतल्या अभ्यासामुळे मला कुठे खेळायला वेळ मिळतो. तिच्याही चेहर्‍यावर एक सात्विक आनंदाची लहर पाहून मी आनंदून गेले. आणि स्त्री मनातल्या या दुसर्‍या रंगाची छटा मनाला प्रसन्न करून गेली.

हा मी अनुभवलेला स्त्रीतल्या समजुतदार मनाचा दुसरा रंग.!

– सौ. अनिता अनिल व्यवहारे, श्रीरामपूर

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या