मुंबई
राष्ट्रवादीचे आमदार भाजपात जाणार ही केवळ अफवा विरोधक पसरवत आहे. उलट भाजपामध्ये गेलेले राष्ट्रवादीचे आमदारच राष्ट्रवादीत परत येण्यास इच्छुक आहेत, असेही राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी सांगितले. नवाब मलिक यांनी ट्विट करत राष्ट्रवादीचे आमदार भाजपात जाणार असल्याचे वृत्त फेटाळून लावले.
कर्नाटक त्यानंतर मध्यप्रदेश आणि आता राजस्थानमध्ये भारतीय जनता पक्ष सत्तापालट करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, राजस्थानमध्ये भाजपचा डाव फसला. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. पण, सरकार स्थापन झाल्यापासून भाजपकडून ठाकरे सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे 12 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगली आहे. त्यावर नवाब मलिक यांनी ट्वीट करून या प्रकारावर खुलासा केला आहे. “ गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार या बातम्या पेरल्या जात आहे. पण, ही अफवा आहे. राष्ट्रवादीचे कोणतेही आमदार भाजपच्या गळाला लागलेले नाही”