अकोले |प्रतिनिधी| Akole
जी मुले व मुली आई-वडिलांना सांभाळतात त्यांनाच पित्याच्या वडिलोपार्जित संपत्तीचे वारस म्हणून हक्क मिळतील असा महत्त्वपूर्ण व क्रांतिकारी ठराव अकोलेजवळील नवलेवाडी ग्रामपंचायतीने काल बुधवारी झालेल्या ग्रामसभेत टाळ्यांच्या गजरात एकमताने संमत केला.या क्रांतिकारी ठरावाचे सर्वत्र कौतुक होत आहे.अन्य ग्रामपंचायतींपुढे नवलेवाडी या क्रांतिकारी गावाने आदर्श निर्माण केला आहे. असा धाडसी निर्णय घेणारी महाराष्ट्रात बहुदा ही पहिलीच ग्रामपंचायत असावी.
नवलेवाडीचे सरपंच प्रा. विकास नवले यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा उत्साही वातावरणात काल बुधवारी पार पडली. या सभेतील हा महत्त्वाचा ठराव राज्य शासनाच्या महसूल विभाग व ग्रामविकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांना पाठवून आजच्या ग्रामसभेत संमत झालेल्या ठरावानुसार महसूल विभागाला वारस ठरविताना ग्रामपंचायतीकडून संमती घेऊनच वारस प्रकरणे मंजूर करता येतील. शासकीय सुविधा अगर विविध योजनेचा लाभ आई-वडिलांना मिळेलच पण जी मुले आई-वडिलांना सांभाळत नसतील त्यांना कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ देण्यात येणार नाही.
दिल्यास आई-वडिलांची जबाबदारी सर्वस्वी शासनाकडे राहील असा ठराव ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले यांनी मांडला. त्यास अॅड.आनंदराव नवले यांनी अनुमोदन दिले.यावेळी उपस्थित सर्वच नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात या ठरावास आपला पाठींबा दर्शविला. यापूर्वी सैन्य दलातील विविध जवानांची घटपट्टी व पाणीपट्टी माफ करण्याचा निर्णयही नवलेवाडी ग्रामपंचायतने घेतलेला आहे.
जलजीवन योजनेअंतर्गत गावातील पिण्याच्या पाण्याची नवी योजना व विशेष उंचीवरील नवीन आरसीसी स्टोअर टँक या कामाच्या मंजुरी बाबतचे तपशील या ग्रामसभेत जिल्हा बँकेचे संचालक व गावचे मार्गदर्शक मधुकरराव नवले यांनी सविस्तर समजावून दिले. ग्रामपंचायत कामाचाही आढावा घेण्यात आला.
सामाजिक पातळीवर मानवी जीवनाला काळीमा फासणार्या व कौटुंबिक जीवनात आई-वडिलांना न सांभाळता त्यांचीच वारस मुले-मुली आपल्या स्वतःच्या जीवनात मश्गुल असतात. विशेष म्हणजे वडिलोपार्जित प्रॉपर्टी हिचा उपभोक्त ते घेत असतात. पण आई-वडिलांना मात्र घरातून काढून देऊन म्हातारपणी त्यांच्या पालनपोषणाकडे पूर्णतः दुर्लक्ष करून आजारपणामध्ये ही आर्थिक जबाबदारी न घेता त्यांच्याशी आपल्या जणू काही नातच नाही अशा प्रकारे आई-वडिलांना बाजूला ठेवून त्यांचे वारस आज सर्व प्रकारच्या भौतिक सुविधा उपभोगतात. परिणामी म्हातारपण हा शाप ठरला असून म्हातारपणातील वयात आई-वडिलांना जगणे मात्र मुश्किल झाले असल्याने कालच्या सभेत हा महत्वपूर्ण ठराव एकमताने संमत करण्यात आला. या ग्रामसभेस आरोग्य कर्मचारी, कृषी अधिकारी, वीज अधिकारी, तलाठी उपस्थित होते.
दरम्यान, नवलेवाडी हे गाव महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील ऐतिहासिक वारसा असलेले गाव आहे. भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात येथील लोकांचे योगदान महत्त्वाचे होते.