मुंबई | Mumbai
महायुतीमधील घटक पक्षाचे नेते आणि शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली. ज्यामुळे महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटले आहे. शरद पवार यांचे पुतणे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही हे वक्तव्य रुचलं नसून त्यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर कडाडून टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फुटली असली , अजित पवार आणि इतर पवार कुटुंबात मतभेद झाले असले, अजित दादा गट महायुतीत सामील असला तरी शरद पवार यांच्यावरील वैयक्तिक पातळीवरील ही टीका मात्र अजित पवार यांना आवडलेली नाही.
काय म्हणाले अजित पवार?
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत राजकाण कसे करायचे असते, सुसंस्कृतपणे कसे बोलायचे असते, कंबरेखालचे वार कसे करायचे नसतात, यांच उदाहरण घालून दिलेले. काही आरोप-प्रत्यारोप होत असतात. परंतु ते मांडण्याची एक पद्धत असते. तेच आपल्याला त्यांनी शिकवलेले आहे. तीच पद्धत पुढे वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, पवार साहेब, विलासराव देशमुख अशा अनेक मान्यवरांनी पुढे तीच पद्धत चालू ठेवली. पण सदाभाऊ खोत यांनी काल जे काही वक्तव्य केले, ते निषेधार्ह आहे. त्याचा तीव्र शब्दांत मी कालच निषेध केला आहे. मी फक्त एवढ्यावरच थांबलेलो नाही. मी खोत यांना फोनही केला होता. तुमचे हे स्टेटमेंट आम्हाला अजिबात आवडलेले नाही. हे तुम्ही बंद करा, असे मी त्यांना सांगितले. अशा पद्धतीने वैयक्तिक पातळीवर बोलणे, हे चुकीचे आहे.
अजित पवारांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट केली आहे. ते म्हणाले, ‘ ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेब यांच्या विषयी सदाभाऊ खोत यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत चुकीचे व निंदनीय आहे. अशा पद्धतीने खालच्या पातळीवर पवार साहेबांवर वैयक्तिक टीका करणे आम्हास पूर्णपणे अमान्य आहे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व वैयक्तिकरित्या मी या विधानाचा तीव्र शब्दात निषेध करतो. यापुढे पवार साहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन कोणी वैयक्तिक टीका केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खपवून घेणार नाही’ अशा शब्दांत अजित पवार यांनी थेट इशाराच दिला आहे.
काय म्हणाले होते खोत?
जतमध्ये गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारसभेत बोलताना सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलायचाय असे जाहीर सभांमधून सांगतोय. तुझ्या चेहऱ्यासारखा महाराष्ट्र करायचाय का अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी टीका केली होती. शरद पवार यांच्या आजारावर केलेल्या या वक्तव्यानंतर सदाभाऊ खोत यांच्याविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा