मुंबई | Mumbai
पहलगाम बैसरन घाटीमध्ये पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला जो संदेश दिला आहे, तो योग्यच आहे. अशा निर्णयात सर्वपक्षीयांनी सरकार सोबत राहिले पाहिजे. पण सरकारने एखादा निर्णय घेतना त्याचा भारतावरच उलटा परिणाम होणार नाही? याची दक्षता घेतली पाहिजे असे मत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी मांडले.
शरद पवार म्हणाले की, काश्मीरमध्ये जे झाले त्या प्रश्नाकडे सगळ्या देशवासीयांनी एका विचाराने सरकारसोबत राहिले पाहिजे, इथे राजकारण आणायचे नाही. अतिरेक्यांनी जी अॅक्शन घेतली ती भारताच्या विरोधी घेतली आहे. देशाच्या विरुद्ध असे कोणी निर्णय घेते तिथे राजकारण करायचे नसते. त्या दृष्टीने आम्ही लक्ष घातले. सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली. त्यामध्ये आमच्या पक्षाच्या वतीने सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.
शरद पवार यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पहलगाममध्ये केंद्र सरकारकडून सुरक्षा यंत्रणेत चूक झाल्याचे मान्य केल्याबद्दल प्रतिक्रिया दिली. सर्व राजकीय पक्षांनी या प्रश्नावर केंद्र सरकारला सहकार्य करण्याची भूमिका घेतली याचा आनंद आहे. माझी विनंती आहे की, जे काही निर्णय घेतले जातील त्यात आम्ही सरकार सोबत आहोत. पण सरकारने हे अधिक गांभीर्याने पाहिले पाहिजे”, असे शरद पवार म्हणाले.
“आम्ही दहशतवाद संपवला, आता काही चिंता नाही असे सांगितले जात होते. पण ठिक आहे, असे काही होत असेल तर आनंद आहे. पण उदाहरण पाहिले आपण याचा अर्थ कुठे ना कुठे तरी अजूनही कमतरता आहे. ती कमतरता घालवली पाहिजे. देशावर हल्ला झाला असेल, सरकार गांभीर्याने निर्णय घेत असेल आणि कमतरता आहे असे मान्य करत असेल तर तातडीने ती कमतरता काढली पाहिजे. त्याही कामात आम्हा लोकांचे सरकारला सहकार्य राहील”, असेही शरद पवारांनी सांगितले.
शरद पवार पुढे म्हणाले की, इंटेलिजन्स फेल्युअर आहे हे सरळ दिसत आहे. पहलगाम हे त्यातल्या त्यात अधिक सुरक्षित आहे. दोन-तीन महिन्यापूर्वीच मी तिथे जाऊन आलो. सातत्याने आपले लोक तिथे जातात. दहशतवाद्यांनी आपले उद्दिष्ट साध्य केले, हा जो निष्कर्ष काढला जातो, तो अधिक सावधान करणारा आहे. आपण काळजी घ्यायला पाहिजे, असे त्यांनी म्हटले. तर पर्यटकांना हिंदू आहेत म्हणून गोळ्या घातल्या यामध्ये काय सत्य आहे? याबाबत मला माहिती नाही. पण तिथे जी लोक होते, त्यातील स्त्रियांना सोडले असे दिसते आहे. मी एका भगिनीच्या घरी गेलो होतो, त्यावेळी त्यांनी सांगितले आम्हा महिलांना हात लावले नाही. त्यांनी फक्त आमच्या पुरुषांना हात लावला, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
हल्ल्यानंतर केंद्र सरकारकडून पाकिस्तानवर काही निर्बंध लादण्यात आले आहेत, पण हे निर्बंध लादत असताना सरकारने थोडासा विचार केला पाहिजे. भारताची विमानसेवा जर पाकिस्तानातून जात असताना बंद केली तर त्याचा परिणाम भारतावरच होईल असे अनेक निर्णय आहेत. पण यातून पाकिस्तानला ही एक संदेश जाईल असेही पवार म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा