Tuesday, March 25, 2025
Homeनगरयेणारा काळ राष्ट्रवादीचा असला पाहिजे

येणारा काळ राष्ट्रवादीचा असला पाहिजे

योग्य नियोजन करा, पालिका, झेडपी निवडणुकीत फायदा होईल

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

येणारा काळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असला पाहिजे, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे, असे सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी केले. योग्य नियोजन केले तर येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्याला नक्कीच फायदा होईल असेही सांगण्यास ते विसरले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसाच्या नवसंकल्प शिबिराची सांगता रविवारी झाली. यावेळी मार्गदर्शन करताना अजित पवार यांनी पक्षाला कशा पध्दतीने पुढे न्यायचे आहे याचा कानमंत्र देतानाच इकडेतिकडे करणार्‍या पदाधिकार्‍यांना खडेबोल सुनावले.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्व धर्माचा आदर करणारा आहे हे कृतीतून दिसले पाहिजे. नेत्यांपेक्षा हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे हेही स्पष्ट झाले पाहिजे. नेत्यांसोबत फिरण्यापेक्षा लोकांमध्ये जा. हा पक्ष लोकांचा वाटला पाहिजे यासाठी काम करा, असा आदेशही अजित पवार यांनी आजच्या शिबिरात दिला. शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा ही आपली आहे आणि ती कायम राहील. यासाठी तुमची साथ मला हवी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एक जबाबदार कार्यकर्ता तयार करून त्याच्यावर 25 कार्यकर्त्यांची जबाबदारी सोपवा. प्रभागात 50 कार्यकर्ते तयार करा. त्यातून 20 हजार कार्यकर्त्यांची फळी उभी राहील.

राज्यातील प्रत्येक महानगरपालिकांमध्ये अशी यंत्रणा तयार केली तर निवडणुकीत पक्षाला फायदा निश्चित होणार आहे. साईबाबांच्या कर्मभूमीत आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मभूमीतून विकासाची दिशा आणि पुरोगामी विचाराची वाटचाल आपण नवसंकल्प शिबीरातून करत आहोत. येणारा काळ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा असला पाहिजे. प्रत्येक गावात राष्ट्रवादीचा फलक आणि झेंडा कसा लागेल असा प्रयत्न सर्वांनी करा. हा महाराष्ट्र आहे. एकतेचा आणि समतेचा विचार इथे रुजलेला आहे. जातीपातीचे राजकारण जास्त दिवस चालत नाही. पण सध्या तशा पध्दतीने सध्या जातीपातीचे राजकारण सुरू आहे याबद्दल नाराजीही अजित पवार यांनी व्यक्त केली. महायुतीला बहुमत प्रचंड मिळाले असून जनतेने आपली जबाबदारी पार पाडली आहे. आता आपल्याला ती जबाबदारी पार पाडायची आहे. माझी लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत चालू ठेवायची आणि त्याचा लाभ गरजू महिलेला मिळाला पाहिजे याचा वेगळा विचार सध्या सरकार करत आहे. विधानसभेत जे अभूतपूर्व यश पक्षाला मिळाले आहे.

हे यश माझ्या एकट्याचे नसून माझ्या सर्व कार्यकर्त्यांचे, पदाधिकार्‍यांचे असल्याची स्पष्ट कबुली त्यांनी दिली. ज्यांची जनमानसात प्रतिमा खराब आहे त्या पदाधिकार्‍याला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घ्यायचे नाही असे स्पष्ट करतानाच पक्षात कुणाशीही गैरवर्तन होईल असे काम करणार्‍या व्यक्तीची तात्काळ हकालपट्टी करण्यात येईल. दर मंगळवारी देवगिरी बंगल्यावर पक्षाच्या आमदारांची बैठक होणार आहे. याशिवाय या बैठकीला महिन्यातील एक दिवस ठरवून सर्व जिल्हाध्यक्षांना बोलावण्यात येईल. आज अजित पवार यांनी आपल्या भाषणात वैद्यकीय सहाय्यता कक्ष सेल आणि वचनपूर्ती सेल या दोन सेलची घोषणा केली. वैद्यकीय सहाय्यता सेल हा उपमुख्यमंत्री कार्यालयातून राबवला जाईल तर वचनपूर्ती हा सेल उपमुख्यमंत्री कार्यालय आणि प्रदेश कार्यालयात सुरू करण्यात येणार आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले.
यावेळी सुनिल तटकरे म्हणाले, पक्षाला विधानसभेत जो स्ट्राईक रेट दिलात त्यापेक्षा जास्त आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळवून द्यायचा आहे.

आता संघर्षाचे दिवस संपले असून आपल्याला उद्याच्या 25 वर्षाचा पक्षाचा भक्कम पाया या शिबिरातून घेऊन जायचा आहे. इथला विचार चांद्यापासून बांद्यापर्यंत पोचवला जाईल आणि वेगवेगळे कार्यक्रम दिले जातील. महाराष्ट्रात दादांच्या रुपाने आपल्या पक्षाला चेहरा मिळाला आहे. मुंबईमध्ये दादांचा हाच चेहरा मनपा निवडणुकीत पुढे आणायचा आहे. मुंबई शहरात 25 वर्षात जितके कधी यश मिळाले नाही ते यश दादांच्या नेतृत्वाखाली शंभर टक्के मिळेल आणि आगामी काळात मनपात स्वतःच्या बळावर उभे राहण्याचा नक्की प्रयत्न केला जाणार आहे. सदस्य नोंदणी अभियान आपण सुरु केले आहे. नोंदणीत जो चांगलं काम करेल त्याचा पक्ष नक्कीच विचार करेल. शिबीरात संविधानावर आधारित चित्रफीत दाखवण्यात आली. त्यानंतर शिव – शाहू – फुले – आंबेडकर पुरोगामी विचारधारा या विषयावर लहू कानडे यांनी विचार व्यक्त केले. ज्येष्ठ नेत्या सुरेखाताई ठाकरे, अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनीही आपले विचार मांडले.

या शिबीराला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. प्रफुल पटेल, ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, नवाब मलिक, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, खा. सुनेत्रा पवार, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, ना. मकरंद पाटील, ना. बाबासाहेब पाटील, ना. आदिती तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरज शर्मा, राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक, पक्षाचे कोषाध्यक्ष आ. शिवाजीराव गर्जे, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण आदींसह पक्षाचे विद्यमान आमदार, खासदार, माजी आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...