मुंबई | Mumbai
अक्षय कुमारने मंगळवारी मुंबईत ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या पहिल्या मराठी सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली. महेश मांजरेकर दिग्दर्शित हा एक ऐतिहासिक सिनेमा आहे. यात अक्षय छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे.
मुंबईत सिनेमाचं पहिलं शेड्यूल सुरू होत असताना त्याने शिवरायांच्या वेशभूषेत एक नवीन व्हिडिओ शेअर केला. यावरुन त्याला ट्रोल केले जात आहे. नुकतंच या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे इतिहासकालीन फोटो शेअर करत संताप व्यक्त केला आहे.
“जर्मनी,पॅरिस, अमेरिका येथे संग्रहालयात असलेली ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिवकालीन चित्र आहेत. त्यावरुन शिवाजी महाराजांची साधारणत: आपल्याला कल्पना येते. चित्रपट येतोय. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ त्यामधील शिवाजी महाराज बघितल्यावर महाराष्ट्राला “वेड्यात” काढले जातये असे वाटते,” असे आव्हाड यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे. शिवाजी महाराज आणि अक्षयकुमार यांची देहयष्टी यासह भूमिकेवरही बोट ठेवले आहे.
‘वेडात मराठी वीर दौडले सात’ हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कथा पराग कुलकर्णी यांची असून पटकथा महेश मांजरेकर, पराग कुलकर्णी यांची आहे. तर संवाद संजय पवार यांनी लिहिले आहेत. या चित्रपटात दिग्दर्शक अभिनेता प्रवीण तरडे, प्रतापराव गुजर यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. तर महेश मांजरेकरांचा मुलगा सत्य मांजरेकर, बिग बॉस फेम उत्कर्ष शिंदे, जय दुधाणे, विशाल निकम आणि अभिनेता हार्दिक जोशीही चित्रपटात झळकणार आहे.