Monday, October 14, 2024
Homeअग्रलेखआणखी एक राजकीय भूकंप

आणखी एक राजकीय भूकंप

काँग्रेससह देशातील प्रमुख विरोधी पक्षांची राष्ट्रीय पातळीवर भाजपविरोधात एकजूट होत असताना कालचा रविवार महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक नवा महाभूकंप घेऊन आला. राज्यात झालेला हा चौथा राजकीय भूकंप आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आपल्या अनेक समर्थक आमदारांसह राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यासोबत ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ यांच्यासह नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. शिवसेनेतील बंडखोरी होऊन स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारची वर्षपूर्ती होत असताना काल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली.

चाळीसहून जास्त आमदार अजित पवार यांच्यासोबत असल्याचा दावा केला जात आहे. शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबतच महाविकास आघाडीसाठीसुद्धा हा मोठा धक्का मानला जात आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांची महाआघाडी उभी करण्याचे प्रयत्न वेगात सुरू झाले आहेत. पाटण्यातील बैठकीनंतर विरोधी पक्षांची दुसरी बैठक बंगळुरू येथे होणार आहे. विरोधकांच्या एकजुटीची शरद पवार यांची भूमिका महत्वपूर्ण मानली जात असताना पवार यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच फूट पाडण्याची मोठी खेळी भाजपने केली आहे. आधी भाजपसोबत, नंतर महाविकास आघाडीत आणि आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आहेत. पवार यांनी एकाच पंचवार्षिकमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची हॅट्ट्रिक केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील सोळा आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे. आमदाराच्या पात्रतेबद्दलचा निर्णय नजीकच्या काळात येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. अशावेळी अजित पवारांसह त्यांचे समर्थक आमदार सरकारमध्ये सहभागी झाल्याने त्या शक्यतेला बळ मिळाले आहे. शिंदे गटातील अनेक आमदार मंत्रिपदासाठी उत्सूक असताना त्यापैकी एकाही आमदाराला मंत्रिपदाची शपथ दिली गेली नाही ही बाबही सूचक आहे. अजित पवार यांनी संपूर्ण पक्ष आपल्यासोबत असल्याचे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसवरच दावा ठोकला आहे. एकनाथ शिंदे यांच्याच मार्गाने अजित पवार निघाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत सरकार स्थापन करताना पाहिल्या शपथविधीवेळी अडीच दिवसाचे उपमुख्यमंत्रीपद भूषवले होते. आता पुन्हा एकदा नव्या दमाने ते उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. 2019 मध्ये विधानसभा निवडणूक झाल्यानंतर राज्यात सुरू झालेले राजकीय अस्थिरतेचे वातावरण अजूनही कायमच असल्याचे कालच्या घडामोडीवरून स्पष्ट होते. भाजपला शह देण्यासाठी महाविकास आघाडी समर्थपणे उभी ठाकली आहे, पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीने महाविकास आघाडीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या वर्षभरापासून अतिवृष्टी, चक्रीवादळ आणि अवकाळी पाऊस अशा नैसर्गिक संकटांनी राज्यातील शेतकरी हैराण झाले आहेत. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक भरपाईची प्रतीक्षा करीत असले तरी त्यांना अजूनही भरपाई मिळू शकलेली नाही, पण पक्ष फोडाफोडी आणि सत्तेच्या राजकारणाला मात्र ऊत आला आहे. राज्यातील जनतेसाठी हे चित्र निराशाजनक आहे. अजित पवार त्यांच्या समर्थकांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर सर्वसामान्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्याच्या राजकारणाचा झालेला चिखल पाहता पुढील काळात होणार्‍या निवडणुकांमध्ये मतदान का करायचे? अशा उद्विग्न प्रतिक्रिया समाज माध्यमांवर उमटल्या आहेत. त्या जास्त बोलक्या म्हटल्या पाहिजेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या