पुणे | Pune
राज्यात आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधु एकत्र येण्याच्या चर्चा घडत असताना दुसरीकडे पवार कुटुंबीयांनी एकत्र आले पाहिजे, अशी भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू तर, शरद पवार आणि अजित पवार हे पवार कुटुंबातील काका-पुतण्या एकत्र येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सूचक वक्तव्य केले आहे. पुण्यातील खेड राजगुरुनगर ते पत्रकारांशी बोलत होते.
राज्यातील महायुती सरकार २०२९ च्या लोकसभेपर्यंत टिकेल पण विधानसभा निवडणुकांवेळी मात्र महायुती तुटेल, असे भाकीत रोहित पवार यांनी केले आहे. रोहित पवारांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीत नेमके काय चाललेय, असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. कारण, उद्धव ठाकरे अन राज ठाकरे आधी एकत्र तर येऊ द्या, मग काय करायचे ते ठरवू, असे सूचक विधानही रोहित पवार यांनी केले आहे.
एकीकडे भाजपने संघटन पर्वच्या माध्यमातून पक्षबळकटी सुरू केली आहे. २०२९ च्या निवडणुकीत एकहाती सत्ता खेचण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे यापूर्वीच त्यांच्या नेत्यांनी बोलून दाखवले आहे. त्यामुळे रोहित पवारांचे हे वक्तव्य राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.
राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळलेली
राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळलेली आहे. एकट्या पुण्यात वर्षभरात 650 बलात्काराच्या तर 850 विनयभंगाच्या घटना घडल्यात. जिल्ह्यात रोज 20 महिला बेपत्ता होत आहेत. त्यातून महिला किती असुरक्षित आहेत, हे अधोरेखित होतं. याबाबत ठोस काहीच होत नाही, उलट राजकीय नेतेचं गुन्हेगारांना सोबत बाळगून चुकीची प्रवृत्ती निर्माण करत आहेत. हे पाहता महाराष्ट्राचा यूपी-बिहार झालाय, असं म्हणण्यास हरकत नसल्याचं रोहित पवार म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





