Saturday, April 4, 2026
HomeराजकीयNCP Sharadchandra Pawar : ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका,...

NCP Sharadchandra Pawar : ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, बड्या नेत्याचा राजीनामा, कारण काय?

पुणे । Pune

राज्यातील आगामी २९ महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर पुणे शहराच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपल्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. सोमवारी त्यांनी आपला राजीनामा खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे सुपूर्द केला असून, त्यांच्या या निर्णयामुळे पुण्यात शरद पवार गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

- Advertisement -

पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट (शरद पवार आणि अजित पवार गट) एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या संभाव्य युतीला प्रशांत जगताप यांचा सुरुवातीपासूनच तीव्र विरोध होता. दोन्ही पक्षांमधील समन्वय साधण्यासाठी शरद पवार यांच्या पक्षाकडून नुकतीच एक समन्वय समिती स्थापन करण्यात आली. या समितीत माजी खासदार वंदना चव्हाण, प्रवक्ते अंकुश काकडे आणि विशाल तांबे यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, शहराध्यक्ष असूनही जगताप यांना या प्रक्रियेतून आणि समितीतून पूर्णपणे वगळण्यात आले, ज्यामुळे ते कमालीचे नाराज होते.

समितीतून डावलले जाणे आणि ज्यांच्याशी राजकीय संघर्ष केला, त्यांच्याशीच आता युती करण्याची वेळ आल्याने जगताप यांनी पक्षाला रामराम ठोकण्याचे ठरवले. राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी सोमवारी आपल्या समर्थक आणि कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली. या बैठकीत कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतर त्यांनी सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन आपला राजीनामा सोपवला. गेल्या अनेक वर्षांपासून शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिलेल्या नेत्यांपैकी जगताप एक होते. मात्र, बदललेल्या राजकीय समीकरणामुळे त्यांनी ही भूमिका घेतल्याचे समजते.

प्रशांत जगताप आता पुढे काय करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांनी अद्याप आपली पुढील भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र, राजकीय वर्तुळात अशा चर्चा रंगल्या आहेत की ते लवकरच काँग्रेस पक्षात प्रवेश करू शकतात. “दोन दिवसांत मी माझ्या भविष्यातील निर्णयाबाबत अधिकृत घोषणा करेन,” असे सूचक विधान त्यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे. पुणे महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता असली, तरी जगताप यांच्या जाण्याने मैदानी स्तरावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील दोन दिवसांत प्रशांत जगताप कोणती नवी राजकीय दिशा पकडणार, याकडे पुणेकरांचे डोळे लागले आहेत.

ताज्या बातम्या

Fake Milk : धसाळने तयार केलेले बनावट दूध शेटे-म्हसेच्या डेअरीला; एलसीबीच्या...

0
अहिल्यानगर (प्रतिनिधी) घातक क्रिमपासून बनावट दूध तयार करून ते आरडगाव (ता. राहुरी) येथील डेअरीमध्ये पुरवले आला जात असल्याचा धक्कादायक प्रकार स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासातून उघडकीस...