दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? प्रफुल्ल पटेल म्हणाले, “असे महत्त्वाचे निर्णय हे…”
मुंबई । Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रिकरणाच्या चर्चांना सध्या वेग आला असून, या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी सूचक विधान करत राजकीय वर्तुळात चर्चेला नवा आयाम दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी आणि अजित पवार यांच्या गटाच्या संभाव्य एकत्रिकरणाबाबत चर्चा रंगल्या आहेत. दोन्ही गटातील अनेक नेत्यांनी देखील या संधीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
गोंदिया दौऱ्यावर असताना प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटलं, “अशा महत्त्वाच्या निर्णयांवर चर्चा ही प्रेससमोर होत नाही.” त्यांच्या या विधानामुळे एकत्रिकरणाची शक्यता अजूनच चर्चेत आली आहे.
पटेल यांनी यावेळी राष्ट्रीय सुरक्षेच्या पार्श्वभूमीवरही महत्त्वपूर्ण मत व्यक्त केलं. “सध्या देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे विषय सुरू आहेत. भारत आणि पाकिस्तानदरम्यान तणावाची परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी एकत्रित करण्याचा मुद्दा गौण ठरतो. सध्या देशहितासाठी सर्वांनी एकत्र येणं अधिक आवश्यक आहे,” असं मत त्यांनी मांडलं.
दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर सरकारने माघार का घेतली, असा सवाल उपस्थित केला होता. यावर प्रत्युत्तर देताना प्रफुल्ल पटेल यांनी राऊतांवर जोरदार टीका केली. “ज्यांना आंतरराष्ट्रीय राजकारणाची जाण नाही, आणि देशाचं भलं कशात आहे हेही माहिती नाही, अशा चिल्लर लोकांविषयी बोलणं योग्य नाही. चिल्लर राजकारण करणाऱ्यांबद्दल मी काही बोलणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी राऊतांना टोला लगावला.
प्रफुल्ल पटेल यांच्या या विधानामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या पुढील वाटचालीबाबत उत्सुकता वाढली आहे. एकीकडे एकत्रिकरणावर थेट बोलणं टाळलं जात असलं, तरी त्यांच्या सूचक प्रतिक्रियेतून राजकीय संकेत मिळत आहेत.