Saturday, May 4, 2024
Homeराजकीयउद्या मलाही ED नोटीस पाठवेल; रोहित पवारांनी साधला भाजपावर निशाणा

उद्या मलाही ED नोटीस पाठवेल; रोहित पवारांनी साधला भाजपावर निशाणा

मुंबई । Mumbai

भाजपमधून नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले एकनाथ खडसे, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक व त्यांच्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीनं समन्स बजावलं आहे. वेगवेगळ्या प्रकरणाशी संबंधित ईडी या नेत्यांची चौकशी करत आहे. या साऱ्यामागे भाजप असल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांचं म्हणणं आहे. रोहित पवार यांनीही आज भाजपावर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

रोहित पवार पहाटे चार वाजता नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये पोहोचले होते. यावेळी त्यांनी माथाडी कामगार तसंच व्यापाऱ्यांशी चर्चा करत त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. रोहित पवार प्रसारमाध्यमांशी बोलतांना म्हणाले, ‘ईडीच्या माध्यमातून भाजपकडून विरोधकांना लक्ष्य केलं जात आहे. उद्या कदाचित मलाही नोटीस येईल,’ अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.

“हे मार्केटच पहाटे चार वाजता उघडतं त्यामुळे येथे आलो. सहा वाजता भाजी मार्केट आणि नंतर इतर मार्केट सुरु होतात. हे मार्केट कसं चालतं, याच्यात काय अडचणी आहेत तसंच शेतकरी, व्यापारी, माथाडी कामागर यांच्याबाबतीत असणारे विषय समजून घेण्यासाठी आपण येथे आलो आहोत,” अशी माहिती रोहित पवार यांनी यावेळी दिली. रोहित पवार यांच्यासोबत यावेळी पदाधिकारी उपस्थित होते. “आम्ही लोकप्रतिनिधी असतो तेव्हा शेतकरी फोन करत असतात. तीन महिने झाले व्यापाऱ्याकडून पैसे नाही आले, हा व्यापारी दर कमी देत आहे वैगेरे तक्रार करतात. तेव्हा आम्ही त्या एपीएमसी मार्केटच्या प्रमुखांशी बोलून विषय सुटतो का यासाठी प्रयत्न करत असतो,” असं रोहित पवार यांनी सांगितलं.

“महानगरपालिकांमध्ये महाविकास आघाडी समीरकरण योग्य पद्धतीने बसू शकते. पण शेवटी तो वाटाघाटीचा भाग असतो. पण काही प्रमाणात तुम्ही पदवीधर आणि विधान परिषद निवडणुका पाहिल्या तर एका ठराविक विचारधारेच्या विरोधात लोकंही आहेत आणि महाविकास आघाडी सरकारही आहे. एकत्रित ताकद मोठी आहे हे नुकत्याच झालेल्या निवडणुकीत दाखवून दिलं. त्यामुळे येथेही भाजपाच्या विचारधारेला रोखण्यासाठी महाविकास आघाडी एकत्रित लढेल. पण शेवटी हे नेते ठरवतील,” असं रोहित पवार यांनी म्हटलं.

- Advertisment -

ताज्या बातम्या