मुंबई | Mumbai
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. यामुळे उमेदवारांत धाकधुक वाढली आहे. तर दुसरीकडे उद्या कोण विजयाचा गुलाल उधळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शनिवारी निवडणुकीचे निकाल लागणार आहे, त्यापूर्वी शरद पवार गटाच्या उमेदवारांची ऑनलाईन बैठक पार पडली. या बैठकीत मतमोजणी विषयी उमेदवारांना मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती मिळतेय.
राज्यात विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरु आहे. बुधवारी २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात मतदान पार पडले. यानंतर आता २३ नोव्हेंबरला राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणूक निकालाची उत्कंठा राजकीय नेते, कार्यकर्त्यांनाच नाही तर सर्वसामान्यांनाही लागली आहे. यंदाच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकासआघाडी या दोघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. त्यातच आता शरद पवारांनी एक महत्त्वाची बैठक घेतली. सोबतच महाविकास आघाडीला किती जागांवर यश मिळणार याबाबतची उमेदवारांना सांगितल्याची माहिती आहे.
काय सुचना केल्या शरद पवारांनी?
या बैठकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मार्गदर्शन केले. बैठकीत विधानसभा क्षेत्रात किती मतदान झाले, हरकती कशा प्रकारे नोंदवायला हव्यात, मतमोजणी संपताना सी-१७ फॉर्म वरील माहिती काय होती आणि मतमोजणी वेळी आपल्या समोर काय माहिती मांडली जात आहे हे तपासण्याच्या सूचना देण्यात आल्या. सकाळी ९ वाजता ही बैठक ऑनलाईन पद्धतीने पार पडली. निकालाचे प्रमाणपत्र घ्या आणि थेट मुंबई गाठा असे या ऑनलाईन बैठकीत उमेदवारांना सांगण्यात आले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा