पुणे | Pune
विधानसभा निवडणूक काळातील आदर्श आचारसंहितेदरम्यान राज्यातील विविध भागांत कोट्यवधी रुपये जप्त केले जात आहेत. आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करत वाहनांची तपासणी केली जात आहे. राज्यात आत्तापर्यंत कोट्यावधींचे रुपये जप्त करण्यात आले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही आचारसंहिता काळातील आर्थिक देवाण घेवाणीकडे लक्ष वेधले.
संजय राऊत यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे नेते शरद पवार यांनी जोरदार टीका केली आहे. ‘या सरकारचे वैशिष्ट्य आहे. विमानाने एबी फॅार्म पाठवले. पोलिस दलाच्या गाड्यातून महायुतीच्या उमेदवारांना रसद पुरवली जात आहे.’असा गंभीर आरोप शरद पवार यांनी केला आहे. तसंच, ‘मी जाहीर पणे सांगणार होतो. मात्र, माहिती देणाऱ्या आधिकाऱ्यांनी त्यांचे नाव जाहीर करु नये अशी गळ घातली आहे.’ असे देखील पवारांनी सांगितले. बारामतीमध्ये दिवाळी पाडव्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्नेहमिलन कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
फडणवीसांच्या सुरक्षेबाबत शरद पवार म्हणाले
केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून आलेल्या सतर्कतेच्या इशाऱ्यानंतर ‘फोर्स वन’चे १२ जवान हे देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत तैनात करण्यात आले आहेत. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, राज्याचे गृहमंत्री आहेत. त्यांना आधीची सुरक्षा आहे. त्यात आणखीन केंद्र सरकारची सुरक्षा देत असेल तर राज्याच्या दृष्टीने ही गंभीर बाब आहे.
पवार कुटुंबात फूट पडल्याने साजरे होणारे सण समारंभ देखील काही सदस्यांविना होऊ लागले आहेत. रक्षाबंधन-दिवाळी पाडव्याला पवार कुटुंबातील सारे जण एकत्र जमून सण साजरा करतात. मात्र यंदा पाडव्याला अजित पवार यांनी मूळगावी काटेवाडीत पाडवा साजरा करण्याचा निर्णय घेतला. पक्षाचे अनेक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी काटेवाडीत उपस्थिती लावून दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.
तसेच, ‘प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आजचा दिवस आनंदाचा असतो. महाराष्ट्रातील जनतेला चांगले दिवस यावेत, त्यांच्या जीवनात स्थिरता यावी, हेच मागणे आहे. महाराष्ट्रातील आजच्या स्थितीची चिंता वाटते, परिस्थिती हाताळण्यास आजच्या सरकारला अपयश आले आहे. केंद्र सरकारच्या रँकिंगमध्ये महाराष्ट्र पहिल्याच पाच राज्यात नाही. उत्पादनात महाराष्ट्र मागे गेला आहे.’, असे देखील त्यांनी सांगितले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा