अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार गट) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी अहिल्यानगर (दक्षिण) जिल्हाध्यक्ष म्हणून माजी आ. दादाभाऊ कळमकर यांची नियुक्ती केली आहे. प्रदेशाध्यक्ष शिंदे यांनी मंगळवारी (4 नोव्हेंबर) त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. यावेळी आ. रोहित पवार उपस्थित होते. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वीच राजेंद्र फाळके यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते.
गेल्या सात वर्षांपासून राजेंद्र फाळके यांच्याकडे जिल्हाध्यक्षपद होते. ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर हे पद रिक्त झाले होते. या पदी कोणाची वर्ण लागणार याची चर्चा होती. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा देखील झाली असून निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला नवीन जिल्हाध्यक्ष मिळाले आहेत.
समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पक्षाची ध्येय-धोरणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे विचार सर्वदूर पोहोचविण्याचे कार्य दादाभाऊ कळमकर यांनी करावे, अशी अपेक्षा प्रदेशाध्यक्ष शिंदे यांनी व्यक्त केली आहे. या नियुक्तीबद्दल पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दादाभाऊ कळमकर यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर (दक्षिण) जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.





