मुंबई । Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपल्या संघटनात्मक संरचनेत महत्त्वाचे फेरबदल करत प्रदेश प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर केली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही यादी प्रसिद्ध केली असून, यात काही नवीन चेहऱ्यांना प्रवक्तेपदाची संधी देण्यात आली आहे. तर काही चर्चेत असलेल्या आणि पक्षाच्या भूमिकांवर सातत्याने भाष्य करणाऱ्या नेत्यांना या यादीबाहेर ठेवण्यात आले आहे. या बदलांकडे पक्षाच्या अंतर्गत घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विशेष लक्ष वेधले जात आहे.
या नव्या यादीतील सर्वात लक्षवेधी बदल म्हणजे पक्षाच्या प्रवक्त्यांपदावरून रुपाली ठोंबरे पाटील यांची हकालपट्टी. मागील काही दिवसांपासून ठोंबरे यांच्या काही वक्तव्यांमुळे तसेच पक्षातील महिलांच्या नेतृत्वावर त्यांनी केलेल्या अप्रत्यक्ष टीकेमुळे पक्षात नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याचे वृत्त आहे. विशेषतः महिला प्रदेशाध्यक्षा आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याविरोधात त्यांनी व्यक्त केलेल्या भूमिकेमुळे त्यांच्यावर लक्ष केंद्रीत झाले होते.
यातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काही दिवसांपूर्वीच रुपाली ठोंबरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर त्यांच्या भूमिकेबाबत राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले होते. अखेर पक्षाने ठोस कारवाई करत त्यांना यादीतून पूर्णपणे वगळले आहे. प्रवक्तेपदाच्या नव्या यादीतून आमदार अमोल मिटकरी यांचे नावही गायब आहे. मागील काही महिन्यांत त्यांच्या धडाकेबाज आणि कधी कधी वादग्रस्त ठरलेल्या विधानांमुळे ते सतत चर्चेत राहिले होते. पक्षाच्या अधिकृत भूमिकेबाहेर जाऊन काही मुद्यांवर त्यांनी भाष्य केल्याचा आरोप वेळोवेळी झाला होता. अखेर या पार्श्वभूमीवर त्यांना प्रवक्त्यांच्या यादीतून वगळण्यात आल्याचे पाहिले जात आहे.
प्रदेशाध्यक्षांनी जाहीर केलेल्या नव्या यादीत पक्षातील विविध जिल्ह्यांमधून आणि घटक संघटनांतून येणाऱ्या अनेक चेहऱ्यांना जागा मिळाली आहे. यामध्ये खालील नेत्यांचा समावेश आहे:
- अनिल पाटील
- चेतन तुपे
- सना मलिक
- हेमलता पाटील
- राजीव साबळे
- सायली दळवी
- रुपाली चाकणकर
- आनंद परांजपे
- राजलक्ष्मी भोसले
- प्रतिमा शिंदे
- प्रशांत पवार
- शशिकांत तरंगे
- ब्रिजमोहन श्रीवास्तव
- अविनाश आदिक
- सूरज चव्हाण
- विकास पासेलकर
- श्याम सनेर
या नव्या पथकात अनुभवी नेत्यांसोबतच तरुण नेतृत्वाचाही समतोल साधण्यात आल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या संदेशवहन आणि प्रचारमोहीमेत या प्रवक्त्यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे.
या यादीतून काही जुन्या नेत्यांना बाजूला करण्यात आले आहे. यात वैशाली नागवडे आणि संजय तटकरे यांचाही समावेश आहे. मात्र संजय तटकरे यांची प्रवक्त्यांच्या यादीतून वगळून कार्यालयीन चिटणीस म्हणून पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. या बदलांकडे पाहताना असे स्पष्ट होते की, पक्षाने संघटना शिस्तबद्ध ठेवण्यावर आणि निवडणूक पूर्व तयारीवर लक्ष केंद्रित केले आहे. विवादास्पद वक्तव्य करणाऱ्यांना बाजूला करून, संदेशवहनाची जबाबदारी विश्वासार्ह आणि पक्षाच्या भूमिका स्पष्टपणे मांडणाऱ्या चेहऱ्यांकडे सोपवण्याचा हा प्रयत्न आहे. नवीन प्रवक्त्यांची ही फळी पुढील काळात पक्षाचे धोरण, भूमिका आणि भुमिका जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडणार आहे. आता या नव्या संघटनेचा प्रभाव आगामी राजकीय घडामोडींमध्ये किती दिसून येतो, याकडे राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे.




