Wednesday, June 11, 2025
Homeब्रेकिंग न्यूजSupriya Sule: पक्षाच्या वर्धापनदिनी सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य; अजित पवार गटासोबत जाण्याबद्दल...

Supriya Sule: पक्षाच्या वर्धापनदिनी सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य; अजित पवार गटासोबत जाण्याबद्दल म्हणाल्या…

पुणे | Pune
आज राष्ट्रवादी काँग्रेसचा २६ वा वर्धापनदिन आहे. अजित पवार आणि शरद पवार गटाकडून आज पुण्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वर्धापन दिनाचा सोहळा साजरा केला जातोय. तसेच, काही दिवसांपूर्वी अजित पवारांसोबत जाणार का? असे विचारले असता शरद पवार यांनी सुप्रिया सुळे पुण्यात आल्यावर निर्णय घेऊ असे म्हटले होते. अशात वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होण्याआधीच शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठे वक्तव्य केल्याने चर्चांना उधाण आले आहे.

- Advertisement -

आमच्या गटातल्या काही लोकांना सत्तेत जावे वाटते, असे वक्तव्य शरद पवारांनी काही दिवसांपुर्वी केले होते. त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार गट एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर दोन्ही गटाच्या नेत्यांनी देखील याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या होत्या. तसेच अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी देखील वर्धापन दिनापर्यंत थांबा, पांडुरंगाच्या मनात जे असेल तेच होईल, असे वक्तव्य केले होते. आता ऐन वर्धापन दिनाच्या दिवशीच सुप्रिया सुळेंनी अजित पवारांसोबत जाण्याबाबत सूचक वक्तव्य केल्याचे म्हंटले जात आहे.

सुप्रिया सुळेंनी काय स्टेटस ठेवले?
वर्धापन दिनी खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी एक व्हॉट्स ऍप स्टेट्‍स ठेवले. या स्टेटसमध्ये “आईला सगळेच माहिती असते, माझे पालक क्वचितच मला सल्ला देतात. आईने मला जो सल्ला दिला, तिच गोष्ट मी रोज स्वतःला सांगते सहन करायला शिक.” तसेच, “आपल्या डोळ्यासमोर अन्याय होत असतो, आपण प्रयत्न करत राहायचे. त्यावर आपली बाजू कितीही खरी असली तरी अन्याय होत असतो. आपण काहीही करु शकत नाही. परिस्थिती आपल्या हातात नसते, तेव्हा घट्ट व्हायचे आणि सहन करायचे. कर्तव्य करत राहायचे. आपले संस्कार कधीही विसरायचे नाही.” त्यांच्या या व्हॉट्स ऍप स्टेटसची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणाकडे आहे? असा सवाल उपस्थित होत आहे.

दरम्यान,पक्षाच्या मेळाव्यासाठी बालगंधर्व रंगमंदिर परिसरात दाखल झालेल्या सुप्रिया सुळे यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसबद्दल विचारल्यावर त्या म्हणाल्या, “मी त्या स्टेटसमध्ये केवळ माझ्या आईचा संदर्भ दिला आहे. आपल्या देशात लोकशाही आहे. लोकशाहीत लेखकाला लिहायचा अधिकार आहे”. शरद पवारांनी मला राष्ट्रवादी काँग्रेसबाबत निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. तसेच अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा नाही, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. सुप्रिया सुळेंच्या या वक्तव्यानंतर त्याही अजित पवारांसोबत जाण्यास राजी आहेत का? असा प्रश्न विचारला जातोय.

त्याची काही निश्चित वेळ ठरलेली नाही
काही महिन्यांपूर्वी शरद पवार म्हणाले होते की पक्षाबाबतचे निर्णय आता सुप्रिया सुळे घेतील. सध्या राजकीय वर्तुळात ज्या चर्चा चालू आहेत त्यासंदर्भात सुप्रिया सुळे यांनी काही निर्णय घेतले आहेत का? असा प्रश्न विचारल्यावर खासदार म्हणाल्या, “त्याची काही निश्चित वेळ ठरलेली नाही. माझ्यासाठी कार्यकर्त्यांच्या भावना सर्वात महत्त्वाच्या आहेत”. यावेळी त्यांना पक्षाच्या विलीनीकरणाच्या चर्चेवर प्रश्न विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, “मी आत्ताच भारतात आले आहे. १४ दिवस परदेशात होते. त्यानंतर दोन दिवस दिल्लीत होते. त्यामुळे माझ्यापर्यंत अशी कुठलीही चर्चा आलेली नाही”.

अमोल मिटकरी काय म्हणाले होते?
अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र येतील का? असा प्रश्न विचारला असता अमोल मिटकरी म्हणाले होते की, “पांडुरंगाची इच्छा असेल तर आषाढी एकादशीपर्यंत ताई दादा एकत्र येतील. अजून तसा काही प्रस्ताव आल्याचे कळले नाही. पण दहा तारखेला पक्षाचा मेळावा पुण्याला होतोय. त्यामुळे दहा तारखेपर्यंत आपण वाट पाहावी. दोघांनी एकत्र येण्यासाठी कुणाचा विरोध असण्याचे काहीही कारण नाही. शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. ते आमचे मार्गदर्शक आहेत. पवारसाहेब, दादा आम्हाला जो काही आदेश देतील, तो आदेश अंतिम मानून आम्ही पुढे जाऊ. पांडुरंगाच्या मनात जे असेल तेच होईल. आषाढी एकादशीचा कशाला, कुठलाही मुहूर्त असू शकतो, पण तूर्तास तसा प्रस्ताव नाही.”

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

पडसाद … अखेर प्राधिकरणास मुहूर्त लागला

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - सल्लागार संपादक अखेर सिंहस्थासाठी प्राधिकरण नियुक्तीला मुहूर्त सापडला. राज्य सरकारने खास अधिसूचना काढून हे बहुप्रतिक्षित व बहुचर्चित प्राधिकरण अस्तित्वात आणले....