इतिहासात भोपळा, कलेत मात्र १००…; मार्कशीट व्हायरल करत राष्ट्रवादीनं कोश्यारींना डिवचलं

jalgaon-digital
2 Min Read

मुंबई | Mumbai

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) आज देहरादूनकडे (Dehradun) प्रस्थान करणार आहेत. आज त्यांना निरोप देण्यात आला. राजभवनावर त्यांना नौदलाकडून मानवंदना देण्यात आली.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यानी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्याबाबत सतत वादग्रस्त वक्तव्ये केली होती. त्यामुळे त्यांच्या उचलबांगडीसाठी विरोधकांनीही रान उठवले होते. त्यांना हटवण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीने महामोर्चा काढला होता. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौरयादरम्यान कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली होती. ती मान्य करून त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला होता.

दरम्यान भगतसिंह कोश्यारी यांना जाता जाता राष्ट्रवादी काँग्रेसनं डिवचलं. भगतसिंह कोश्यारी यांची एक उपहासात्मक मार्कशीट तयार करण्यात आली आहे. व्हॉट्सअप विद्यालयाची ही मार्कशीट असल्याचं त्यात दाखवण्यात आलंय. राष्ट्रवादी काँग्रेसने ट्विट केलेली मार्कशीट, त्याला प्रगती पुस्तक न म्हणता अधोगती पुस्तक म्हटलंय. त्यात विविध विषयांवरील त्यांची मार्क दाखवण्यात आले आहेत. तसेच एक पत्रदेखील लिहिण्यात आले आहे.

पत्रात नेमकं काय?

प्रति,

मुख्याध्यापक,

पत्रास कारण की, आमच्या शाळेतील भगतसिंह श्यारी नामक विद्यार्थ्याला तात्काळ शाळेतून कमी करण्यात आले आहे. सदरहू विद्यार्थ्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्यामुळे तसेच विद्यार्थ्याने सुधारणेचे कोणतेही चिन्ह न दाखवल्याने अखेर त्याची गच्छंती करण्यात येत आहे. सदरहू विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता अगदीच तोकडी असून मनोरंजनपर विषयात गती असली तरी बाकी विषयांचा अभ्यास फार कच्चा आहे. आपली जबाबदारी ओळखण्याऐवजी इतर विद्यार्थ्यांविषयी चुकीची माहिती पसरवण्याचे काम विद्यार्थ्यांने केले आहे.

तसेच खोडसाळपणा, नियमांचे उल्लंघन, शाळेतील शांततेचा भंग करणे आणि वाद निर्माण करणे अशी कृत्ये विद्यार्थी सातत्याने करत असतो. या वृत्तीमुळे तुमच्या शाळेतील इतर विद्यार्थ्यांवरही संगतीचा वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सदर विद्यार्थ्यास शाळेत प्रवेश देण्याचा विचार असल्यास वरील सर्व बाबींची गंभीर नोंद घ्यावी ही विनंती.

आपला नम्र मुख्याध्यापक

व्हॉटस्अॅप विद्यालय


Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *