मुंबई | Mumbai
‘हर हर महादेव’ आणि महेश मांजरेकर दिग्दर्शित आगामी चित्रपट ‘वेडात वीर दौडले सात’ या चित्रपटांमध्ये सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा विपर्यास करण्यात आल्याचा आरोप होत आहे. त्यामुळं वातावरण तापलं आहे.
शिवरायांचे वंशज व माजी खासदार संभाजीराजे भोसले यांनी याबाबत तीव्र आक्षेप नोंदवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी समर्थन दिलं. त्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही या भूमिकेला पाठिंबा देत इशारा दिलाय.
‘राष्ट्रवादी काँग्रेस हा कायमच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने उभा असलेला पक्ष आहे. मात्र, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी मोडतोड कदापि सहन केली जाऊ शकत नाही. चित्रपट निर्मात्यांनी चित्रपट तयार करताना छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित पुरावे उपलब्ध असलेली तथ्ये जशीच्या तशी दाखवावीत, कुठेही इतिहासाशी छेडछाड करू,’ नये असेही जयंत पाटील यांनी स्पष्टपणे बजावले आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत म्हटलंय की, ‘महाराष्ट्रात शिवाजी महराजांचा चुकीचा, खोटा, इतिहास मांडण्याची परंपरा पुरंदरे ह्यानी सुरु केली. जाणता राजा हे महानाट्य हे त्याचं एक रुप, कारण त्यांचं लिखित पुस्तक होतंच तीच परंपरा आता चित्रपटसृष्टीत काही जण करत आहेत. आम्ही विरोध करुच, पण संभाजीराजे ह्यांच्या रुपाने एक आवाज मिळाला’, अशी भूमिका मांडताना जितेंद्र आव्हाड यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर टीका केलीये.
संभाजीराजे यांनी काय म्हटलं?
‘आज छत्रपती शिवाजी महाराजांची पुस्तकं आपण वाचत नाही, ही आपली देखील चूक आहे. त्यामुळे हे लोक इतिहासाची मोडतोड करुन आपल्यासमोर मांडतात. माझी केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला विनंती आहे की, सेन्सॉर बोर्डात ऐतिहासिक चित्रपटांसाठी समिती असावी. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटात दाखविण्यात आलेले मावळे हे कोणत्या दृष्टीने मावळे वाटतात? चित्रपटात ड्रामाटायझेशन आवडते म्हणून काहीही बदल करायचा का? पोस्टरमध्ये मावळ्यांची पगडी काढण्यात आली आहे. पगडी काढणे म्हणजे एक प्रकारचा शोक आहे”, असे संभाजी राजे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.
याशिवाय, ‘इतिहासाचा गाभा धरून राहावा ना. यातील काही मावळ्यांनी पगडी घातली नसून, तो शोक संदेश आहे. जर, यापुढे प्रोड्यूसर आणि दिग्दर्शकांनी असेच चित्रपट काढले तर, गाठ संभाजी छत्रपतीशी आहे’, असा इशाराही त्यांनी दिला.