Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्याराष्ट्रवादी काँग्रेसची वाटचाल शिवसेनेच्या मार्गावर?

राष्ट्रवादी काँग्रेसची वाटचाल शिवसेनेच्या मार्गावर?

नाशिक । फारुक पठाण Nashik

2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात अभूतपूर्व राजकीय गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत आहे. त्यातच 2 मे 2023 रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आतापर्यंतचा सर्वात मोठा राजकीय बॉम्बफ फोडून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यांनी पक्षाध्यक्ष पदावरून दूर होण्याचा निर्णय जाहीर करताच पक्षात उभी फूट पडल्याचे दिसून आले. ज्येष्ठ नेते तथा पवारांचे पुतणे अजित पवार यांचा सूर लगेच बदलला. त्यात इतर काही नेत्यांचाही सूर वेगळा दिसला. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी जी अवस्था शिवसेनेची झाली त्या दिशेने राष्ट्रवादी काँग्रेसची वाटचाल सुरू झाली आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

- Advertisement -

पुरोगामी विचारसरणीचे शरद पवार हे देशातील सर्वात मोठे नेते मानले जातात. दिल्लीपासून गल्लीपर्यंत त्यांचा दबदबा बोलतो. राजकीय क्षेत्रात पवारांना चाणक्य देखील म्हटले जाते. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार यांनीच महाविकास आघाडीची मुहूर्तमेढ रोवली व भारतीय जनता पक्षाच्या तोंडाशी आलेला सत्तेचा घास त्यांनी हिरावून घेतला होता. त्यामुळे शरद पवार विरुद्ध भारतीय जनता पक्ष असा नवा संघर्ष देखील पाहायला मिळाला. पवारांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत असलेले चांगले संबंध जगजाहीर आहे.

मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस व पवार यांचे जमत नसल्याचे अनेक वेळा सिद्ध झाले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी निर्माण करून भारतीय जनता पक्षाचे सुमारे 25 वर्ष युतीत असलेल्या शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देऊन भाजपला पवारांनी एकाकी पाडले होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या काळात महाराष्ट्र सारख्या राज्यात भारतीय जनता पक्षाला सत्ता एकप्रकारे येऊन देखील त्याचा उपयोग झाला नाही, हे खटकले होते. त्यामुळे जून 2022 मध्ये राज्यात मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी होऊन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत 40 आमदारांसह थेट भाजपला पाठिंबा देऊन महाविकास आघाडीचे सरकार पाडून आपले सरकार स्थापन केले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

यानंतर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली व बंड करणार्‍यांना अपात्र ठरविण्या संदर्भात मागणी केली. या प्रकरणाची सुप्रीम कोर्टात सुनावणी पूर्ण झाली असून आता फक्त निकालाची प्रतीक्षा आहे. सर्वोच्च निकालाची प्रत्येकाला प्रतीक्षा असताना निकाल जर आपल्या बाजूने आला नाही तर राज्यातील सरकार टिकवायचे कसे असा प्रश्न भाजपच्या गोटात निर्माण झाला असावा म्हणून त्यांनी मप्लॅन बीफ म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांना तयार ठेवल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील ऑन कॅमेरा याला दुजोरा दिल्याचे दिसून आले आहे.

मध्यंतरी गृहमंत्री अमित शहा यांचे महाराष्ट्रात अनेक दौरे झाले. त्या काळात राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांच्या बैठका देखील यांच्यासोबत झाल्याचे माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले आहे. त्यामुळे अजित पवार यांचे मुख्यमंत्री होण्याबाबतचे जे फलक लागले होते त्याला यामुळे दुजोरा मिळत आहे. दरम्यान, या सगळ्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचे जाहीर केल्यामुळे पक्षात उभी फूट पडल्याचे दिसत आहे. पक्षप्रमुख पक्षाचे धोरण ठरवत असतो.

पवार हे पुरोगामी विचारांचे असल्यामुळे ते भाजप सोबत कधीही जाणार नाही, असे जाणकारांचे म्हणणे आहे तर दुसरीकडे अजित पवार व त्यांचे समर्थकांनी सत्तेत जाण्यासाठी पवारांवर दबाव टाकल्याचे देखील बोलले जात आहे. त्यामुळे आपण अध्यक्षपद सोडून नव्या अध्यक्षाला संधी द्यावी, असा विचार शरद पवारांच्या मनात आला असावा असे देखील काहींचे म्हणणे आहे. मात्र अध्यक्षपदावरून शरद पवार दूर झाल्यावर पक्षात दोन गट निर्माण होऊन एक सत्तेत भारतीय जनता सोबत जाणार व दुसरा गट पक्ष संघटना मजबूत करून महाविकास आघाडीत राहणार असे देखील बोलले जात आहे.

सुप्रिया सुळे किंवा नवीन चेहरा?

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे जाहीर केले, मात्र कार्यकर्त्यांनी ते मान्य केले नाही. अजित पवारसह काही नेत्यांचे म्हणणे आहे की नवीन अध्यक्ष मिळावा. मात्र अधिक तर नेते व कार्यकर्ते पवारांनी राजीनामा मागे घ्यावा, अशीच मागणी करीत आहे. त्यामुळे अजून दोन दिवसांत हा निर्णय होण्याची संकेत मिळत आहे. जर पवार राजीनाम्यावर ठाम राहिले तर दिल्लीत चांगले वजन निर्माण केलेल्या तसेच पवारांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांना अध्यक्ष पद मिळू शकते, मात्र सुळे अध्यक्ष झाले नाही तर नवीन चेहर्‍याला संधी मिळणार अशी देखील शक्यता आहे . दुसरीकडे अजित पवार हे राज्याच्या राजकारणातच राहणार असे देखील बोलले जात आहे. दरम्यान, आज दुपारी शरद पवारांनी वाय बी चव्हाण सेंटरच्या बाहेर आंदोलन करणार्‍या कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला व दोन दिवसानंतर तुम्हाला येथे आंदोलन करायची वेळ येणार नाही, असे सूचक वक्तव्य केले. यामुळे शरद पवार आपल्या निर्णयावर फेरविचार करणार का? असा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या