Sunday, November 24, 2024
Homeअग्रलेखस्वच्छता फक्त बसस्थानकांची गरज?

स्वच्छता फक्त बसस्थानकांची गरज?

राज्यातील तीनशेपेक्षा जास्त बसस्थानके अस्वच्छ असल्याचा निष्कर्ष एसटी महामंडळाच्या अहवालात नमूद आहे. याबाबतचे वृत्त माध्यमात प्रसिद्ध झाले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाअंतर्गत राज्यातील ५६० बसस्थानकांचे पहिल्या टप्प्यातील सर्वेक्षण नुकतेच पूर्ण करण्यात आले. त्यापैकी केवळ ३० बसस्थानके स्वच्छ तर काही स्थानकांची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचे आढळले. अस्वच्छ बसस्थानके ही तर प्रवाशांची नेहमीची डोकेदुखी आहे.

या सर्वेक्षणात प्रवाशांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असत्या तर अस्वच्छतेबाबतचे चित्र अधिक स्पष्ट झाले असते. लोकांच्या एसटीकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत त्यादेखील कदाचित समजू शकल्या असत्या. बसस्थानक म्हटले की, प्रवाशांच्या डोळ्यांसमोर ठराविक चित्र उभे राहते. ठिकठिकाणी साचलेला कचरा, उडणारी धूळ, धुळीने माखलेली बाके आणि स्वच्छतागृहांची दुर्गंधी! अनेक बसस्थानकांमध्ये वेळापत्रकाचे फलक तरी अद्ययावत असतात का? प्रवासाचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तरीही हजारो प्रवासी आजदेखील एसटी बसलाच पसंती देतात. विशेषतः ग्रामीण भागातील लोक एसटी बसला प्राधान्य देतात. ‘रस्ता तिथे एसटी’ असे अभिमानाने सांगितले जायचे. एसटी बस आणि समाजाच्या भावनिक बंधाच्या अनेक आठवणी ज्येष्ठ प्रवासी सांगतात. राज्याच्या काही गावांत एसटी बस पहिल्यांदाच येते. त्या गावांनी एसटी बसचे स्वागत ढोलताशाच्या गजरात केल्याच्या बातम्या वाचायला मिळतात.

- Advertisement -

बदलत्या काळाबरोबर प्रवासाची अनेक साधने उपलब्ध होत आहेत. त्या पर्यायांना प्रवाशांची पसंती का वाढत असावी? प्रसंगी चार पैसे जास्त खर्च करून प्रवासी अन्य पर्यायांकडे का वळतात? त्याची अनेक कारणे सांगितली जातात. तथापि अस्वच्छ बसस्थानके हे त्यातील प्रमुख कारण असावे. अनेक बसस्थानकांमध्ये खड्डेच जास्त असतात. पावसाळ्यात त्यात पाणी साठते आणि प्रवाशांच्या गैरसोयीत वाढ होते. रात्रीच्या वेळी अनेक बसस्थानकांत वातावरण अंधारलेले असते. तेथे रात्री व्यसनी लोकांचा वावर आढळतो. महिला प्रवाशांसाठी ही परिस्थिती गैरसोयीची ठरते. त्यात बदल करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. सर्वेक्षणात जी बसस्थानके स्वच्छ आणि चांगली आढळली त्यांनी कोणते उपाय योजले ते जाहीर करायला हवे. इतर बसस्थानकांसाठी ते मार्गदर्शक ठरू शकेल. एसटी सेवकांची मानसिकताही त्यात महत्वाची भूमिका बजावू शकेल.

स्वच्छ बसस्थानके ही प्रवाशांची अपेक्षा रास्तच! त्याची पूर्तता प्रवाशांवरसुद्धा अवलंबून आहे. सार्वजनिक सुविधांचा किती लोक जबाबदारीने वापर करतात? किती प्रवासी त्यांनी निर्माण केलेला कचरा योग्य ठिकाणी नेऊन टाकतात? बहुसंख्य प्रवासी जागेवरच कचरा टाकून मार्गस्थ होतात. स्वच्छतागृहांत पाण्याचा वापर करीत नाहीत. खाद्यपदार्थ टाकून देतात. त्याचीही दुर्गंधी सुटते. एकेकाळी एसटी जीवनवाहिनी मानली जायची. आता प्रवासी एसटीचे जीवनदाते आहेत. त्यांना आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळ नवनव्या योजना जाहीर करते. महिलांना प्रवासी भाड्यात पन्नास टक्के सवलत ही अलीकडची योजना! त्या बरोबरीने स्वच्छ आणि सुरक्षित बसस्थानके हीसुद्धा प्रवाशांची गरज आहे. त्यासाठी एसटी महामंडळाने कायमस्वरूपी उपाय योजले पाहिजेत. याप्रश्नी राज्य सरकारने लक्ष पुरवण्याची आवश्यकता आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या