पुणे(प्रतिनिधी)
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात ड्रग्जवरून एनसीबीकडून सुरु असलेला तपास हा केवळ चार व्यक्तींसाठी नको तर या प्रकरणाच्या मुळाशी जायला हवे असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. राज्यात आपण तंबाखू मुक्त अभियान राबवित आहोत. त्याप्रमाणे केंद्र सरकारने ड्रग्समुक्त अभियान राबविण्याची आवश्यकता आहे, असेही त्या म्हणाल्या.
शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना वर्गात अशा गोष्टींबद्दल मार्गदर्शन करण्याची खरी गरज आहे. या गोष्टी झाल्यास तरुण वर्ग ड्रग्ज सारख्या गोष्टींपासून दूर राहील. सध्या ड्रग्जप्रकरणी हाय प्रोफाईल तीन महिलांना चौकशीसाठी बोलावून, यामधून काहीही साध्य होणार नाही. याला मुळापासून उखडणे गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्या.
“मला, पती सदानंद सुळे, पवार साहेबांना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना नोटीस आली आहे. या नोटिसांना आम्ही सविस्तर उत्तर देऊ. ज्या दिवशी आम्हाला ही नोटीस आली त्याच दिवशी वर्षभरापूर्वीही एक नोटीस आली होती. जे संबध महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचे काम केले आहे आम्ही आमचे काम करू,” असे सुळे यावेळी म्हणाल्या.