भारताचा ने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. जागतिक भालाफेक क्रमवारीत त्याने अव्वल स्थान पटकावले आहे. त्याने जगज्जेता अँडरसन पीटर्ससह अन्य चार खेळाडूंना मागे टाकले आहे. पानिपतमधील खंदेरा या छोट्याशा गावापासून सुरु झालेला त्याचा प्रवास युवा पिढीला प्रेरणादायी आहे. हा प्रवास चिकाटी, आत्मविश्वास, ध्येयनिश्चिती, ध्येयपूर्तीसाठी सातत्य, सराव, मानसिक कणखरता, शारीरिक तंदुरुस्तीसाठी मेहनत याचा चपखल नमुना आहे. या प्रवासात त्याला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. लठ्ठपणा, बास्केटबॉल खेळताना मनगटाला झालेली जखम, खांद्याला झालेली जबर दुखापत आणि करावी लागलेली शस्त्रक्रिया ही त्यापैकी काही संकटे! या संकटांवर त्याने यशस्वीपणे मात केली. निराशा येऊ दिली नाही. ‘स्पर्धेत सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेन. तंदुरुस्तीसाठी माझ्या क्षमतेपेक्षा जास्त प्रयत्न करेन’ अशा भावना त्याने माध्यमासमोर व्यक्त केल्या. युवापिढीला त्यातून बरेच काही शिकता येऊ शकेल. निराशा, आक्रमकता, ताणतणाव, चिंता, टोकाचे भावनिक चढउतार हे बहुसंख्य तरुणाईचे परवलीचे शब्द बनत आहेत, असे मानसतज्ज्ञ सांगतात. तथापि निश्चयाचे बळ एकवटले तर यावरही मात करता येऊ शकते हेच नीरजच्या खेळातून दिसते. नीरजच्या पराक्रमामुळे क्रिकेट व्यतिरिक्त अन्य खेळांकडे युवा पिढीचे लक्ष्य वेधू शकते. त्यात रुची वाढू शकते. त्याला प्रोत्साहन देणे सरकारची देखील जबाबदारी आहे. भारतीय कुस्तीपटूंचा वाद चर्चेत आहे. सुमारे एक महिन्यापासून त्यांचे दिल्लीत जंतरमंतरवर धरणे सुरु आहे. अनेक महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचा त्यांचा आरोप आहे. कुस्तीपटूंच्या वतीने सर्वोच्च न्यायालयातही अपील करण्यात आले आहे. यासंदर्भात वृत्त माध्यमात वेळोवेळी प्रसिद्ध होते. आरोप गंभीर आहे. यातील सत्य लोकांना कळायला हवे. ती देखील सरकारची जबाबदारी आहे. असे आरोप खेळाडूंच्या पालकांच्या आणि सामान्य माणसाच्या मनात शंका निर्माण करू शकतात. अनेक महिला खेळाडू मैदान गाजवून विक्रम रचत आहेत. तथापि मुलींचे खेळात भविष्य घडवणे आजही वाटते तितके सोपे नाही. लहानपणी मुली मनसोक्त खेळतात. तथापि त्या थोड्या मोठ्या झाल्या की त्यांच्या खेळण्यावर बंधने आणली जातात. मुलींनी खेळात भवितव्य घडवावे असे किती पालकांना वाटते? ‘खेळणे पोरींना शोभत नाही’ हेच अनेकींना ऐकावे लागते. मैदान गाठण्यासाठी त्यांना अनेक अडथळे पार करावे लागतात. हॉकीचे मैदान गाजवणार्या अनेक खेळाडू हे त्याचे उत्तम उदाहरण! अनेक आव्हाने पार करून अनेक मुली पालकांची मानसिकता बदलून मैदानावर खेळण्यात यशस्वी होतात, पण लैंगिक शोषणासारखे वाद पालकांना अस्वस्थ करतात. यातून खेळाडू होण्याचे स्वप्न पाहणार्या मुलींचे पाय खेचण्याचा धोका नाकारता येऊ शकेल का? असे होणे मुलींसाठी अन्याय नाही का? जेव्हा जेव्हा असे आरोप होतात, होतील तेव्हा त्यांच्या चौकशीत पारदर्शकता राखणे हे सरकारचे कर्तव्य आहे. अन्यथा साधे खेळणे देखील मुलींना अडथळ्यांची शर्यत ठरण्याची शक्यता आहे.