Thursday, June 18, 2026
Homeमहाराष्ट्रNEET paper leak : नीट पेपर फुटी प्रकरणात पुण्यातून आणखी एक अटक;...

NEET paper leak : नीट पेपर फुटी प्रकरणात पुण्यातून आणखी एक अटक; गॉड नंबरने सेव्ह असलेल्या ‘तो’ अटकेत

पुणे । Pune

वैद्यकीय प्रवेश परीक्षा म्हणजेच ‘नीट’ (NEET) पेपर फुटी प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ माजवली असतानाच, आता या प्रकरणाचे ‘पुणे कनेक्शन’ अधिकच गडद होत चालले आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) या प्रकरणात पुण्यातून आणखी एका मोठ्या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. मनीषा हवालदार हिच्या पतीच्या मोबाईलमध्ये ‘गॉड’ (God) या नावाने सेव्ह असलेला व्यक्ती दुसरा कोणी नसून तेजस शाह असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, सीबीआयने त्याला अटक केली आहे. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, तेजस हर्षदकुमार शाह हा पुण्यातील ‘एपीएमए’ (APMA) कोचिंग संस्थेत भौतिकशास्त्र (Physics) विषयाचा शिक्षक म्हणून कार्यरत आहे. तेजसने भौतिकशास्त्राचे लीक झालेले प्रश्न आधीच मिळवले असल्याचा गंभीर आरोप सीबीआयने त्याच्यावर ठेवला आहे. यापूर्वी अटक करण्यात आलेली संशयित मनीषा हवालदार हिच्या पतीच्या मोबाईलची तपासणी करताना सीबीआयला काही धक्कादायक धागेदोरे सापडले होते. मोबाईलमध्ये ‘गॉड’ या नावाने सेव्ह असलेल्या नंबरसोबत अत्यंत संशयास्पद चॅट्स आढळून आल्या होत्या. सीबीआयने ‘सेलेब्राइट प्रीमियम’ (Cellebrite Premium) या प्रगत फॉरेन्सिक तंत्रज्ञानाचा वापर करून डिलीट झालेला डेटा आणि चॅट्स रिकव्हर केल्या. या आधुनिक तपास पद्धतीमुळेच ‘गॉड’च्या मुखवट्यामागील तेजस शाहचा खरा चेहरा समोर आला.

याआधी सीबीआयने २२ मे रोजी पुण्यातून फिजिक्स शिक्षिका मनीषा हवालदार हिला अटक केली होती. ‘नीट’ची प्रश्नपत्रिका मुख्य परीक्षा सुरू होण्यापूर्वीच काही ठराविक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्याचा आरोप तिच्यावर आहे. मनीषाच्या निवासस्थानी छापेमारी केली असता सीबीआयच्या हाती मोठे घबाड लागले. तिच्या घरातून मोबाईल, लॅपटॉप, हार्ड डिस्क, नीट प्रश्नपत्रिकांच्या काही प्रती, हस्तलिखित नोंदी आणि विद्यार्थ्यांशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. याशिवाय घरातून १ लाख १ हजार ९३० रुपयांची रोकडही हस्तगत करण्यात आली आहे.

नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयने आतापर्यंत देशभरातून १२ ते १३ जणांना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, एकट्या पुण्यातून आतापर्यंत चार बड्या नावांना अटक करण्यात आली आहे, ज्यामध्ये मनीषा हवालदार, मनीषा मांढरे, मनीषा वाघमारे, तेजस शाह यांचा समावेश आहे. या चौघांच्या अटकेमुळे पुण्यातील नामांकित कोचिंग क्लासेस आणि शिक्षकांचे या रॅकेटशी असलेले लागेबांधे समोर येत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची पाळेमुळे कुठेपर्यंत रुजली आहेत आणि या ‘मास्टरमाइंड’च्या मागे आणखी कोणते बडे चेहरे आहेत, याचा शोध सीबीआय घेत आहे. आता या प्रकरणात पुढे आणखी काय नवीन खुलासे होणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

ताज्या बातम्या

विधान परिषद निवडणुकीसाठी राज्यभरात ९९.०२ टक्के मतदान

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai बिनविरोध निवडणुकीमुळे चर्चेत असलेल्या विधान परिषदेच्या राज्यातील ११ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी गुरुवारी शांततेत मतदान पार पडले. सकाळी ८ ते सायंकाळी...