पुणे । Pune
लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लावणाऱ्या आणि देशभर खळबळबळ उडवून देणाऱ्या ‘नीट यूजी’ (NEET-UG) पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) आणखी एक मोठा आणि धक्कादायक खुलासा केला आहे. तपासाची चक्रे वेगाने फिरवत सीबीआयने या संपूर्ण रॅकेटमधील आणखी एका मुख्य मास्टरमाईंडला पुण्यातून बेड्या ठोकल्या आहेत. मनीषा संजय हवालदार असे अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलेचे नाव असून, तिच्यावर भौतिकशास्त्र (Physics) विषयाचे प्रश्न लीक केल्याचा गंभीर आरोप आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनीषा हवालदार ही पुण्यातील नामांकित ‘सेठ हिरालाल सर्फ प्रशाला’ येथे कार्यरत होती. धक्कादायक बाब म्हणजे, ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ने (NTA) तिची नीट परीक्षेच्या पेपर प्रक्रियेसाठी एक ‘विषय तज्ज्ञ’ म्हणून नियुक्ती केली होती. याच पदाचा गैरफायदा घेत तिची थेट भौतिकशास्त्राच्या प्रश्नपत्रिकांपर्यंत पोहोच झाली होती. यापूर्वी अटक करण्यात आलेली आरोपी मनीषा मांढरे हिच्यासोबत संगनमत करून मनीषा हवालदारने भौतिकशास्त्राचे काही महत्त्वाचे प्रश्न लीक केले होते. सीबीआयच्या तपासात हेच लीक झालेले प्रश्न मूळ नीट परीक्षेच्या पेपरमध्ये आल्याचे निष्पन्न झाले आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे ३ मे रोजी नीट यूजी परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, पेपरफुटीचे प्रकरण समोर आल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. सीबीआयने देशभरात सत्र सुरू ठेवत केलेली ही अकरावी अटक आहे. तपासादरम्यान सीबीआयने देशभरात विविध ठिकाणी छापे टाकून लॅपटॉप, मोबाईल फोन, बँक स्टेटमेंट्स आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. लाखो रुपये घेऊन विद्यार्थ्यांना विशेष कोचिंग क्लासेसमध्ये प्रश्न पुरवणाऱ्या दलालांचे नेटवर्क आता पूर्णपणे उद्ध्वस्त केले जात आहे.
या प्रकरणात आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर येथून ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींची सद्यस्थिती खालीलप्रमाणे:
महाराष्ट्रातील अटक आणि कारवाई:
- मनीषा हवालदार – सीबीआय कस्टडी (CBI)
- शिवराज मोटेगावकर – सीबीआय कोठडी
- प्रल्हाद कुलकर्णी – सीबीआय कोठडी
- मनीषा मांढरे – सीबीआय कोठडी
- मनीषा वाघमारे – सीबीआय कोठडी
- शुभम खैरनार – सीबीआय कोठडी
- धनंजय लोखंडे – न्यायालयीन कोठडी
इतर राज्यांतून झालेली अटक:
- दिनेश बिवाल – न्यायालयीन कोठडी
- मांगीलाल बिवाल – न्यायालयीन कोठडी
- विकास बिवाल – न्यायालयीन कोठडी
- यश यादव – न्यायालयीन कोठडी
पेपरफुटीमुळे ३ मे रोजी झालेली परीक्षा रद्द करण्यात आली असून, आता ही परीक्षा २१ जून रोजी पुनर्रचना करून घेतली जाणार आहे. सीबीआय या प्रकरणाच्या मूळ स्रोतापर्यंत पोहोचली असून, आगामी काळात आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




