Saturday, May 4, 2024
Homeनंदुरबारमृत झालेल्या मोकाट गायींवर केले जातात अंत्यसंस्कार

मृत झालेल्या मोकाट गायींवर केले जातात अंत्यसंस्कार

सोमावल, ता.तळोदा | वार्ताहर – SOMAVAL

शहरात अनेक दिवसापासून मालकांकडून वार्‍यावर सोडलेल्या (Cow) गायींचे मृत्यूसत्र सुरू आहे. परंतु याबाबत मालक व पालिका प्रशासन (Municipal administration) अनभीज्ञ आहे. असे असले तरी शहरातील गौमाता सेवक ग्रुपच्या वतीने मृत्यू पावलेल्या गायींची विधिवत अंत्यविधी करण्यात येत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने मोकाट व भटक्या गुरांचा प्रश्न तात्काळ सोडवावा अशी मागणी सर्व सामान्य नागरिकांकडून होत आहे.

- Advertisement -

शहरात बेवारस भटक्या गुरांचा प्रश्न अनेक दिवसांपासून आहे. हे भटकी गुरे अगदी शहराच्या बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर त्रासदायक ठरत आहेत. अनेक वेळेस त्यांच्यामुळे वाहतुकीचा खोळंबा निर्माण होतो. परंतु या गुरांचे मालक कधीही पुढे येवून त्यांचा बंदोबस्त करीत नाहीत.

त्यामुळे हे पशु मोकाट होवून भटके बनतात. यांचा उदरनिर्वाह शहरातील नागरिकांनी टाकलेल्या शिळया अन्नावर होत असतो. काही वेळेस तर हे गुरे प्लास्टिक, कागद खावून व उष्मघाताने आजारी पडतात.

परंतु त्यांच्या तब्बेतीची काळजी घेणारा कोणीही वाली नसल्याने ते मृत्युमुखी पडतात. ही जनावरे शहरातील गल्लीत व बाजारपेठेत किंवा अन्य भागात तशीच पडून राहतात. अशावेळी पालिकेने त्यांची जवाबदारी स्विकारुन यांची विल्हेवाट लावणे गरजेचे असतांना पालिका प्रशासन यावर ठोस भूमिका घेत नाही.

त्यामुळे गौमाता सेवक ग्रुपचे सदस्य रोहित सूर्यवंशी, कालू पाडवी, सौरव कलाल, राहुल गोसावी, राज शर्मा, प्रवीण चौधरी, लखन इंगळे व वैभव कर्णकार आदी पुढे येवुन मृत पावलेल्या गायींचे विधीवत अंत्यसंस्कार करतात. हा ग्रुपमधील सदस्य मृत पावलेल्या गायींना जेसीबीद्वारे उचलून त्यांना शहराबाहेरील पडित जमिनीत पुरण्याचे काम करतात.

हे करत असतांना त्यांना बराच खर्चही येतो. मृत गायींना उचलण्यासाठी जेसीबीवर त्यांना खर्च करावा लागतो. हा खर्च भागविण्यासाठी ते ग्रुपच्या सदस्यांमधून पदरमोड करुन वर्गणी गोळा करतात. त्यामुळे गौमाता सेवक ग्रुपचे कौतुक समाजातून होत आहे.

काही वेळेस समाजसेवक पुढे येवून मदत करतात. या ग्रुपला आर्थिक व शारीरिक सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. गौमाता सेवक ग्रुपचे कार्य निश्चितच आदर्शवत आहे. समाजातील राजकीय व सामाजिक हातभार लागला तर हे कार्य अधिक व्यापक करता येवून आजारी गायी व पशूंची शुश्रूषा सुद्धा करता येणे शक्य होईल असे या ग्रुप मधील सदस्यांचे म्हणणे आहे.

पालिकेकडून मोकाट गुरांच्या बंदोबस्तासाठी कोंडवाडा चालविण्यात येत होता. परंतु अनेक वर्षापासून पालिकेकडून कोंडवाडा बंद करण्यात आला आहे. तेव्हापासून शहरात मोकाट गुरा-ढोरांचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील पशुपालक-मालक जोपर्यंत गुरं-ढोरांपासून फायदा मिळतो म्हणजेच गायी दूध देतात तोपर्यंत त्यांचा सांभाळ करतात.

त्यानंतर गायीना मोकाट सोडून देतात. अश्या मोकाट पशूंची संख्या शहरात मोठी आहे. हे मोकाट, भटके व अनाथ गुरे शहरात भटकंती करून मिळेल ते खात असतात. काही वेळेस तर मूळ मालकाला आपली गुरे कुठे आहेत हे सुद्धा माहीत नसते.

महिनो महिने आपल्या गुरांचा शोध सुद्धा मालक घेत नाहीत त्यामुळे मोकाट गुरांबरोबरच त्यांचा मृत्यू चा प्रश्न ऐरणीवर आला आहे .

शहरातील गौमाता सेवक ग्रुप हा गायीचे मृत्यू झाल्यानंतर त्यांचा अंतिम क्रियाकर्म करणारा ग्रुप आहे. परंतु याबरोबरच गाभण गायी जेव्हा बछड्याला जन्म देते तेव्हा हा ग्रुप पुढे येऊन गाईंचे बाळंतपण सुखरूप व्हावे यासाठी प्रयत्न करतात.

शहरात काही दिवसातच खान्देशी गल्ली १, कोठार रस्त्यावर १, कॉलेज जवळ २, मच्छीबाजार २, काकाशेठ गल्लीच्या मागील बाजूस १, कल्पना टाकी परिसर १, खर्डी नदी २, शेठ के.डी हायस्कुल परिसर २, दामोदर नगर १ व तळोदा बायपास परिसरात ५ गायी अश्या विविध परिसरात गायी मृत पावल्या होत्या. या सर्व गायींचे अंतिम विधी गौमाता सेवक ग्रुपच्या वतीने करण्यात आला आहे .

- Advertisment -

ताज्या बातम्या