Wednesday, May 29, 2024
Homeनाशिकनिसाका कामगारांची प्रशासनाकडून मोठी कुचंबना; कामगार वाऱ्यावर सोडून निसाकाची परस्पर विल्हेवाट

निसाका कामगारांची प्रशासनाकडून मोठी कुचंबना; कामगार वाऱ्यावर सोडून निसाकाची परस्पर विल्हेवाट

पिंपळगाव बु | प्रतिनिधी

निफाड साखर कारखाना येथे केंद्र सरकारच्या वतीने उभ्या करण्यात येणाऱ्या ड्रायपोर्टसाठी आलेल्या १०८ कोटी रुपयांच्या रकमेतून निसाका कामगारांची थकीत देणी मिळावी, या मागणीसाठी निसाका कामगार १५ दिवसांपासून साखळी उपोषणास बसले आहेत. मात्र, नाशिक जिल्हा बँक व प्रशासनाने अद्याप कोणतीही दखल घेतली नाही. दोन दिवसांत याप्रश्नी निर्णय न घेतल्यास गनिमी काव्याने आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

- Advertisement -

शासनाचे प्रतिनिधी असलेले निफाडचे तहसीलदार यांना दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की, निफाड सहकारी साखर कारखाना सन २०१२ पासून बंद होता. पगार मजुरी, कामगार ठेवी, बोनस, उपदान (ग्रेच्युईटी) व अन्य मिळून कामगारांची ८९.४९ कोटी देणी १० वर्षापासून थकीत आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने त्यांच्या थकीत कर्ज वसुलीसाठी कारखान्याची स्थावर व जंगम मालमत्ता दि.२९/८/२०१६ रोजी सरफेशी कायदा २००२ अन्वये साम्यात घेतली आहे.

डिसेंबर २०२२ मध्ये नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कारखाना मे.बी.टी. कडलग कन्स्ट्रक्शन प्रा.लि. नाशिक यांना २५ वर्षाचे दिर्घ मुदतीने भाडेतत्वावर चालविण्यास देण्यात आलेला आहे. कामगारांचे देणीसह अन्य थकीत देणी अदा करण्याचे उत्तरदायित्व जिल्हा बँकेवरच आहे. परंतु भाडेतत्वाचा करार करतांना कामगार संघटनेबरोबर त्रिपक्षीय करार करणे कायद्याने बंधनकारक असतांना याबाबत कोणताही विचार न करता सुमारे १०७६ कामगारांना वाऱ्यावर सोडले आहे. येणाऱ्या भाडेपट्टयामधुन कामगार देणी अदा करणे कायद्याने बंधनकारक असतांना देण्याचे उत्तरदायित्व नाकारणे संतापजनक बाब आहे.

निफाड साखर कारखान्याचे १०५ एकर अतिरिक्त जमीन मल्टीमॉडेल लॉजिस्टीक हबसाठी जे.एन.पी.टी.मुंबई यांना जिल्हा बँक विक्री करणार आहे. या येणाऱ्या पैशातून कामगारांची थकीत देणी प्राधान्यक्रमाने अदा करणे आवश्यक आहे. परंतु जिल्हा बँक याबाबत कोणताही प्रतिसाद देत नाही. ३० ते ३५ वर्ष नोकऱ्या करून कामगारांना एक रूपायाची सुद्धा प्राप्ती न होता देशोधडीला लागला आहे.

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक ही सहकारी बँक असून राज्य शासनाचा अर्थ विभाग, सहकार विभाग तसेच नाबार्ड बँक व रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या नियंत्रणाखाली काम करते. नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक कामगार देणी अदा करणेबाबत टाळाटाळ करीत असल्याने महाराष्ट्र शासनाचे संबंधीत यंत्रणेसमोर याबाबत लक्षात आणुन देणे गरजेचे आहे.

यापूर्वी याबाबत कामगार आयुक्त, प्रादेशिक सहसंचालक (साखर), अ.नगर अवसायक निसाका व अन्य शासकीय यंत्रणा समवेत प्रत्यक्ष भेटी व पत्रव्यवहार अनेकदा केलेला आहे. परंतु याबाबत कोणतीच दखल घेतली जात नाही.

निसाका कामगारांचे साखळी उपोषण सोमवारी १५ व्या दिवशीही सुरूच असताना जिल्हा मध्यवर्ती बँक प्रशासन किंवा शासकीय यंत्रणेतर्फे मध्यस्थीचा कोणताही प्रयत्न झाला नाही. त्यामुळे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार कामगारांनी केला आहे. बुधवार दि.११ पर्यंत प्रतीक्षा करूनही कोणताही तोडगा न निघाल्यास आपल्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी वेगळ्या पद्धतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कामगार संघटनेतर्फे सोमवारी (दि.९) ऑक्टोबर रोजी देण्यात आला.

या साखळी उपोषणकर्त्या कामगारांच्या आंदोलनाला निफाड तालुका नाभिक महामंडळाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय सस्कर, तालुकाध्यक्ष डॉ.प्रकाश वाघ, समता परिषदेच्या तालुकाध्यक्षा मनीषा वाघ, कारसुळ ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र काजळे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या