Sunday, November 24, 2024
Homeअग्रलेखशेजारधर्माचा ऱ्हास परडणारा नाही

शेजारधर्माचा ऱ्हास परडणारा नाही

भारतीय संस्कृतीत शेजारधर्म खूप महत्वाचा मानला आहे. शहरात गल्ल्या, वाडे आणि चाळ संस्कृतीने शेजारधर्माचा सुवर्णकाळ अनुभवला. काही ठिकाणी आजही ते वातावरण आढळते. ग्रामीण भागात शेजारधर्म आजही काही ठिकाणी अस्तित्व टिकवून असावा. ‘शेजारी खरा पहारेकरी’ ही कल्पना पोलीस यंत्रणेला त्यातूनच सुचली असू शकेल.

शहरी भागात फ्लॅट संस्कृती वाढत गेली. तेव्हा घरांबरोबर माणसांची मनेही छोटी होत गेल्याचे बॊलले जाऊ लागले. सुरुवातीच्या काळात जाणते त्यावर मते व्यक्त करत. तथापि हा बदलही समाजाने हळूहळू स्वीकारला. पण आता त्याबरोबरच माणुसकी आणि आपुलकीचा गळाही काही माणसे घोटत आहेत ते जास्त चिंताजनक आहे. मुंबईच्या जोगेश्वरी परिसरात एक आई तिच्या आठ वर्षांच्या मुलीला विश्वासाने शेजारी ठेऊन कामाला जायची. शेजाऱ्याने त्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन त्या मुलीवर बलात्कार केला. मुलीने आईला सांगितल्यावर ही घटना उघडकीस आली. हा प्रकार भयंकर आहे. अशा घटना अपवादाने घडतात असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणे समाजाला नाही.

- Advertisement -

ही घटना अमानुष आहे. अशा घटनांमधील दोषींना शासन व्हायलाच हवे. तथापि अशा घटना परस्पर विश्वासाचा गळा घोटतात, त्याचे काय? वाढत्या संपन्नतेबरोबर सामाजिक मूल्ये मात्र घसरणीला लागली असावीत का? आपुलकी, माणुसकी, शेजारधर्माला माणसे पारखी होऊ लागली असतील तर ते जास्त धोकादायक नाही का? पूर्वी माणसे मनाने एकमेकांच्या जवळ होती. कोणत्याही वेळी माणसे हक्काने एकमेकांच्या घराचे दार ठोठवायची. मुले तर त्यांच्यापेक्षा इतरांच्या घरीच जास्त रमायची. परिसरातील ज्येष्ठ व्यक्तींचे लक्ष असायचे. वस्तू उसन्या देणे हा हक्क मानला जायचा.

घरांना क्वचितच कुलुपे लागत. लागली तरी चावी शेजारी ठेवणे हा रिवाजच होता. यामुळे माणसे एकमेकांशी घट्ट जोडली जायची. तोच वारसा त्यांची मुले पुढे चालवायची. बदल हा काळाचा स्थायीभाव हे खरे. पण त्याबरोबर माणसे मुल्याना तिलांजली देऊ लागणे आणि ते गैर नाही असे वाटणे जास्त धोकादायक नाही का? काळाबरोबर घरे, कुटुंबे छोटी होणे अपरिहार्य मानले तरी वातावरण पूर्वीसारखे ठेवले जाऊ शकत नाही असे माणसांना का वाटत असावे? स्वतःपुरते पाहण्याची वृत्ती सामान्य वाटणे चिंताजनक आहे.

शेजारी कोण राहाते हे माणसांना माहित नसते. एखाद्याच्या घरी कोणाचा मृत्यू झाला तरी कळत नाही. मृतदेहाची दुर्गंधी सुटल्यानंतर माणसे पोलिसाना कळवण्याचे कर्तव्य पार पाडतात. पण असे का घडले याच्या मुळाशी किती जण जातात? अशी वेळ कोणावरही येऊ शकते याची भीती का वाटत नसावी? हा बदल गुन्हेगारीला पोषक ठरतो हे लक्षात का येत नसावे? जाणत्यांनी यात लक्ष घालणे गरजेचे आहे. त्यांनी सुजाण लोकांना एकत्रित आणून उपाय शोधायला हवेत. सामाजिक मूल्यांचा ऱ्हास अंतिमतः समाजाच्या हिताचा नाही याची जाणीव आतातरी लोकांना होईल का?

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या