Tuesday, October 22, 2024
Homeक्राईमदिवसा घर फोडून दीड लाखांचा ऐवज लांबविला

दिवसा घर फोडून दीड लाखांचा ऐवज लांबविला

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

नगर तालुक्यातील नेप्ती येथील एका व्यक्तीचे घर चोरट्यांनी दिवसा फोडले. घरातील सुमारे चार तोळ्यांचे सोन्याचे दागिने, 35 हजारांची रोकड असा एक लाख 46 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. सदरची घटना गुरूवारी (10 ऑक्टोबर) दुपारी तीन ते सायंकाळी सहाच्या दरम्यान घडली असून शनिवारी (12 ऑक्टोबर) दुपारी नगर तालुका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

ज्ञानेश्वर दत्तात्रय मोरे (वय 36) यांनी फिर्याद दिली आहे. ते स्कूल बसवर ड्रायव्हर आहेत. ते गुरूवारी दुपारी तीनच्या सुमारास मुलांची शाळा सुटल्याने त्यांना घेण्यासाठी स्कूल बस घेऊन शाळेत गेले होते. त्यांची आई व पत्नी कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेरगावी गेल्या होत्या. ज्ञानेश्वर सायंकाळी सहाच्या सुमारास घरी आले असता त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी घरात पाहणी केली असता सर्व सामानांची उचकापाचक झाल्याचे दिसून आले.

त्यांनी सोन्याचे दागिने व रोकड पाहिली असता घरात ठेवलेले 13 ग्रॅमचे नेकलेस, सहा ग्रॅमच्या तीन नथ, चार ग्रॅमच्या दोन कानातील रिंगा, तीन ग्रॅमची कानातील बाळी, पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी, सहा ग्रॅमची पिळ्याची अंगठी व 35 हजारांची रोकड चोरीला गेल्याचे लक्ष्यात आले. त्यांनी नगर तालुका पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे. गुन्हा दाखल केला असून अधिक तपास महिला पोलीस अंमलदार रेपाळे करत आहेत.

साकत खुर्दमधून सोयाबीनची चोरी
नगर तालुक्यातील साकत खुर्द शिवारातील कार्ले वस्तीवरून अज्ञात चोरट्यांनी शेतकर्‍याच्या 46 हजार रुपये किंमतीच्या 23 गोण्या सोयबीन चोरून नेले. सदरची घटना गुरूवारी (10 ऑक्टोबर) सायंकाळी सहा ते शुक्रवारी (11 ऑक्टोबर) सकाळी 10 वाजेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी शुक्रवारी सायंकाळी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतीश भानुदास कार्ले (वय 41 रा. कार्ले वस्ती, साकत) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी सोयाबीन तयार करून शेतातील जनावरांच्या गोठ्यात गोणीत भरून ठेवले होते. तेथून 23 गोण्या चोरीला गेल्या असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या