Monday, September 28, 2026
HomeनगरCrime News : नेवासा फाटा येथील तीन हॉटेल-लॉजवर पोलिसांचा छापा; ११ महिलांची...

Crime News : नेवासा फाटा येथील तीन हॉटेल-लॉजवर पोलिसांचा छापा; ११ महिलांची सुटका, १० जणांवर ‘पिटा’ अंतर्गत गुन्हा दाखल

नेवासा (तालुका प्रतिनिधी)

रस्त्यावरील वर्दळ आणि प्रवाशांची सोय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेवासा फाटा परिसरातील काळ्या धंद्यांचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. हॉटेल आणि लॉजच्या नावाखाली सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी ‘सर्जिकल स्ट्राईक’ करत मोठी कारवाई केली. तिरंगा, मित्रप्रेम आणि नामगंगा या तीन नामांकित लॉजवर टाकलेल्या छाप्यात ११ पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, मालक, मॅनेजर आणि ग्राहकांसह १० जणांविरुद्ध ‘पिटा’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

नेवासा फाटा येथील काही लॉजमध्ये महिलांकडून बळजबरीने देहविक्रीचा व्यवसाय करून घेतला जात असल्याची गुप्त माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांना मिळाली होती. माहितीची गांभीर्य लक्षात घेऊन अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे व उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव आणि नेवासा पोलिसांचे एक विशेष संयुक्त पथक तयार करण्यात आले.

पोलिसांनी अतिशय नियोजनबद्ध रीतीने या मोहिमेची आखणी केली. खात्री करण्यासाठी पोलिसांनी तीन डमी ग्राहक तयार केले आणि त्यांच्याकडे ५०० रुपयांच्या चिन्हांकित नोटा देऊन त्यांना तिरंगा, मित्रप्रेम आणि नामगंगा लॉजवर पाठवले. डमी ग्राहकांनी इशारा करताच सज्ज असलेल्या पोलीस पथकाने एकाच वेळी तिन्ही ठिकाणी धाडी टाकल्या. या धाडसी कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

या छाप्यात धक्कादायक वास्तव समोर आले आहे. केवळ स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हॉटेल मालक आणि मॅनेजर गरिबीचा फायदा घेऊन महिलांना पैशाचे आमिष दाखवत होते आणि त्यांच्याकडून बळजबरीने वेश्याव्यवसाय करून घेत होते. पोलिसांनी घटनास्थळावरून आक्षेपार्ह साहित्य आणि डमी ग्राहकांना दिलेल्या नोटा जप्त केल्या आहेत. सुटका करण्यात आलेल्या ११ पीडित महिलांना सुरक्षितपणे नेवासा पोलीस ठाण्यात हलवण्यात आले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी हॉटेल मालक प्रकाश शेंडगे, सचिन कोळेकर, अजय कोळेकर यांच्यासह मॅनेजर इक्बाल मंडाल (कल्याण), सुरेश कांबळे आणि अजित बर्डे यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. तसेच या अनैतिक व्यवसायाला खतपाणी घालणारे ग्राहक अमोल पारखे, दीपक शिंदे, प्रणव नजन आणि दीपक वांदेकर यांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

भारतीय न्याय संहिता आणि अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा (PITA) नुसार या सर्वांवर कडक कारवाई करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सागर ढिकले या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या कारवाईत पो.नि. संतोष मुटकुळे, सपोनि रामहरी खेडकर, अमोल पवार आणि त्यांच्या पथकाने मोलाची कामगिरी बजावली. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे नेवासा तालुक्यातील अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

ताज्या बातम्या

NDCC News : निफाड कारखान्याच्या वसुलीवरून गदारोळ; जिल्हा बँक सर्वसाधारण सभेत...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Nashik District Bank) ७२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ऐनवेळच्या विषयात निफाड सहकारी साखर कारखान्याची थकबाकी...