Friday, March 28, 2025
Homeशब्दगंधआयपीएलचे नवे रंगढंग

आयपीएलचे नवे रंगढंग

मनोरंजनाचा तडका. यंदाचे आयपीएल अनेक अर्थांनी वेगळे असणार आहे. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच दहा संघ एकमेकांना भिडणार आहेत. काही संघांचे कर्णधार बदलले आहेत. त्यामुळे यंदाच्या आयपीएलबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

मार्च महिना सुरू झाला की क्रिकेट चाहत्यांना वेध लागतात ते आयपीएलचे. 2008 मध्ये पहिली आयपीएल पार पडल्यानंतर या स्पर्धेच्या लोकप्रियतेचा आलेख सतत चढाच राहिला आहे. या स्पर्धेत होणारी चौकार, षटकारांची बरसात, अखेरच्या षटकापर्यंत रंगणारे सामने, पराभवाच्या छायेत असणार्‍या संघाने अखरेच्या क्षणी मारलेली बाजी यामुळे प्रेक्षक आपसूकच या स्पर्धेकडे आकर्षित होतात. आयपीएल सुरू झाल्यानंतरचा दीड महिना कसा संपतो, हे क्रिकेट चाहत्यांना कळतही नाही. या काळात अवघे क्रिकेटविश्व आयपीएलमय झालेले असते. आयपीएलच्या प्रत्येक हंगामात प्रेक्षकांना काही तरी वेगळेपण अनुभवायला मिळते. यंदा ही स्पर्धा भारतात रंगत आहे. करोनामुळे कोणताही गोंधळ होऊ नये आणि स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी पूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे. खेळाडूंना फार प्रवास करावा लागू नये, यासाठी सर्व साखळी सामने मुंबई, नवी मुंबई तसेच पुण्यातल्या मैदानात रंगणार आहेत. यासोबतच यंदाच्या आयपीएलमध्ये बरेच काही नवे पहायला मिळणार आहे. नव्या संघांच्या समावेशामुळे चुरस अधिक वाढणार आहे. अनेक संघांचे कर्णधार बदलले आहेत. खेळाडूंचे संघ बदलले आहेत. प्रायोजकांपासून नियमांपर्यंत यंदा बरेच काही बदलले आहे.

यंदा प्रथमच टाटा आयपीएलचे मुख्य प्रायोजक आहेत. 2022 आणि 2023 अशी दोन वर्षं आयपीएलच्या मुख्य प्रायोजकत्वाची जबाबदारी टाटांकडे असेल. त्यामुळे यंदाच्या आयपीएलचा उल्लेख ‘वीवो आयपीएल’ नाही तर ‘टाटा आयपीएल’ असा होईल. लखनऊ सुपर जाएंट्स आणि गुजरात टायटन्स या दोन नव्या संघांमुळे स्पर्धेतली चुरस चांगलीच वाढणार आहे. लखनऊ सुपर जाएंट्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी के. एल. राहुल तर गुजरात टायटन्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी हार्दिक पंड्याकडे असेल. त्यामुळे पंजाबकडून खेळणारा राहुल लखनऊकडून खेळेल तर मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू असणारा हार्दिक पंड्या गुजरातच्या जर्सीमध्ये दिसणार आहे. यंदाच्या आयपीएल सामन्यांच्या रचनेतही बदल झाल्याचे पहायला मिळतेय. मागील हंगामापर्यंत स्पर्धेतले आठ संघ एकमेकांविरुद्ध दोनदा खेळत असत. म्हणजे प्रत्येक संघ चौदा सामने खेळत असे. मात्र यंदा दहा संघ असल्यामुळे पाच संघांचे दोन गट करण्यात आले आहेत. दोन गटात विभागणी करण्यासाठी संघांचे क्रमांक ठरवण्यात आले. आयपीएलचा किताब पटकावणे तसेच अंतिम फेरीत पोहोचणे या बाबी ध्यानात घेऊन संघांना क्रमांक देण्यात आले. त्या आधारे मुंबई इंडियन्सला पहिला तर चेन्नई सुपर किंग्जला दुसरा क्रमांक देण्यात आला. या निकषांनुसार केकेआर तिसर्या तर सनरायझर्स हैदराबाद चौथ्या स्थानी राहिले. याच पद्धतीने अन्य संघांचे क्रमांक ठरवण्यात आले. 1,3,5 आणि 7 क्रमांक असणारे संघ अ गटात तर 2, 4,6, 8 क्रमांक असणारे संघ ब गटात अशी विभागणी करण्यात आली.

- Advertisement -

गुजरात आणि लखनऊ हे नवे संघ असल्यामुळे त्यांना क्रमांक देण्यात आले नाहीत. लखनऊला अ तर गुजरातला ब गटात समाविष्ट करण्यात आले. प्रत्येक गटातले संघ आपल्या गटातल्या संघांसोबत प्रत्येकी दोन सामने खेळतील. तसेच दुसर्‍या गटातल्या समान क्रमांक असणार्‍या संघासोबत त्यांना दोन सामने खेळावे लागतील. उदाहरणार्थ मुंबई इंडियन्स आपल्या गटात पहिल्या क्रमांकावर आहे तर दुसर्‍या गटात चेन्नई सुपर किंग्ज पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे मुंबईला ब गटातल्या चेन्नईसोबत दोन सामने खेळावे लागतील. यासोबतच दुसर्‍या गटातल्या उर्वरित संघांसोबत प्रत्येकी एक सामना खेळावा लागेल. वेगळ्या रचनेमुळे यंदाच्या स्पर्धेतली रंगत अधिक वाढणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये प्रत्येक सामन्यात संघाला दोन डीआरएस घेण्याची संधी मिळेल. याआधी फक्त एक डीआरएस घेण्याची परवानगी होती. म्हणजेच एका सामन्यात दोन संघांना मिळून चार डीआरएस घेता येतील. मध्यंतरी मेलबर्न क्रिकेट क्लबने क्रिकेटच्या नियमांमध्ये काही बदल सुचवले होते. हे बदल यावर्षी ऑक्टोबरपासून लागू होणार असले तरी आयपीएलच्या पंधराव्या हंगामात झेलाशी संंबंधित नियम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजेच चेंडू टोलावल्यानंतर फलंदाजाने बाजू बदलल्या तरी नवा फलंदाज स्ट्राईक घेईल. यंदा बायो बबलबाबत बीसीसीआयने खूप सक्ती केलेली आहे. गेल्या वर्षी कोरोना विषाणूने बायो बबल भेदून आयपीएलमध्ये घुसखोरी केली होती. जुन्या अनुभवातून धडा घेऊन बीसीसीआय शहाणे झाले आहे.

यंदा बायो बबलच्या नियमांचं उल्लंघन करणार्‍या खेळाडूला सात दिवस विलगीकरणात रहावे लागणार आहे. म्हणजेच संबंधित खेळाडू सात दिवस स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही. तसेच या काळात त्या खेळाडूच्या संघाचा सामना असेल तर त्यांचे 100 टक्के मानधन कापले जाईल. म्हणजेच बायो बबल भेदणार्‍या खेळाडूला दुहेरी फटका बसेल. खेळाडूने पुन्हा बायो बबल भेदण्याची हिंमत केली तर त्याला विलगीकरणासोबतच एका सामन्यात न खेळण्याची शिक्षा दिली जाईल. तिसर्‍यांदा बायो बबल भेदल्यास खेळाडूला स्पर्धेत खेळता येणार नाही तसेच संबंधित संघाला त्या खेळाडूऐवजी बदली खेळाडूही घेता येणार नाही. अशा कडक नियमांमुळे कोणताही खेळाडू बायो बबल भेदण्याची हिंमत करू शकणार नाही, असे बीसीसीआयला वाटते. आपणही तशी अपेक्षा करायला हरकत नाही. यंदा विराट कोहली आयपीएलमध्ये कर्णधाराची भूमिका वठवणार नाही. यंदा बंगळूरूचे कर्णधारपद फाफ ड्यू प्लेसिसला देणार आहे. त्यामुळे विराट एक खेळाडू म्हणून खेळणार आहे. कर्णधारपदाचे ओझे नसल्यामुळे विराटची बॅट तळपेल, अशी चाहत्यांची अपेक्षा आहे. यावेळी रवी शास्त्री यांच्या समालोचनाची जादू प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. ते पुन्हा एकदा समालोचकाच्या खुर्चीत बसणार आहेत. तसेच यंदाच्या लिलावात सुरेश रैनाला कोणीही खरेदी केले नव्हते. त्यामुळे तोही आयपीएलमध्ये समालोचन करताना दिसणार आहे.

आयपीएलचे प्रसारण करणारी ‘डिस्ने हॉटस्टार’ ही ओटीटी वाहिनीही चांगलीच मालामाल होणार आहे. या वाहिनीने 13 प्रायोजकांसोबत करार केले आहेत. गेल्या वर्षीपर्यंत जाहिरातीचे स्पॉट बुकिंग करणार्‍या काही कंपन्यांनी यंदा प्रायोजकत्त्वाची जबाबदारी स्वीकारली आहे. आयपीएलची वाढती लोकप्रियता तसेच टीव्ही आणि ओटीटीच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्तरातल्या आणि वयोगटातल्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची मिळणारी संधी यामुळे जाहिरातदार आयपीएलकडे आकर्षित होत आहेत.

आयपीएलचे यंदाचे बदललेले स्वरुप तसेच स्पर्धा अधिक वलयांकित आणि आकर्षक करण्याच्या दृष्टीने सुरू असणारे प्रयत्न बघता हा हंगाम लोकप्रियतेचे आणि प्रेक्षकसंख्येचे अनेक विक्रम मोडेल, अशी अपेक्षा व्यक्त होते आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दै. ‘देशदूत’ आयोजित ‘पंचवटी अनेक्स प्रॉपर्टी एक्स्पोला’ शानदार सुरुवात

0
नाशिक । प्रतिनिधी Nashik उत्तम दर्जा, सुयोग्य स्थान, भरपूर सुविधा आणि वाजवी मूल्य या चतु:सूत्रीचा संगम साधलेल्या गृहप्रकल्पांचा अंतर्भाव असलेल्या 'देशदूत' आयोजित 'पंचवटी अनेक्स (जत्रा...