भारतीय नियामक मंडळ आयोजित महिला प्रिमियर लीगच्या सामन्यांना मार्च महिन्यात सुरुवात होणार आहे. काल महिला आयपीएलचे लिलाव पार पडले. इथपर्यंत पोहचण्यासाठी भारतीय महिला क्रिकेटपटूंना प्रचंड संघर्ष करावा लागला. संघर्ष, लोकप्रियता आणि मानधन या मुद्यांवर त्यांना कायमच असमानतेचा सामना करावा लागला, लागत आहे. वास्तविक क्रिकेटवर भारतीयांचे नितांत प्रेम. सामना कोणताही असो, क्रिकेटप्रेमींच्या गर्दीने ओसंडून वाहाणारे मैदान व प्रेक्षकांचा मैदानात उतू जाणारा उत्साह हे नित्याचे चित्र! तितकी लोकप्रियता कदाचित अपवादाने सुद्धा महिला क्रिकेटच्या वाट्याला आली नसावी. उदाहरणार्थ, महिला टी ट्वेन्टी विश्वचषक स्पर्धेला 2009 मध्ये सुरुवात झाली. तेव्हा पहिल्या सत्राच्या अंतिम सामना पाहायला फक्त काहीशे प्रेक्षक उपस्थित होते, असे सांगितले जाते. टीव्हीवरही महिलांच्या क्रिकेट सामन्यांचे अभावाने प्रक्षेपण केले जायचे. 1976 साली भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिला सामना खेळला. त्यांना समान वेतन मिळण्यासाठी 2022 साल उजाडावे लागले. तोपर्यंत त्यांना मिळणारे मानधन पुरुष क्रिकेटपटूंच्या तुलनेत 80-90 टक्क्यांनी कमी होते. त्यांच्या खेळाला ग्लॅमर नव्हते. बहुधा त्यामुळेच की काय, पण महिला किक्रेटपटू होण्याचे स्वप्न बघणेसुद्धा दुर्मिळ होते. त्यासाठीच्या सोयी सुविधांचा तर प्रश्नच नव्हता. मुलींनी खेळात करियर करणे किती लोकांना मान्य असते? अशी महत्वाकांक्षा बाळगणार्या किती मुलींना त्यांचे पालक बिनशर्त पाठिंबा देतात? गल्लीबोळात तरी मुली क्रिकेट खेळताना दिसतात का? हौस म्हणूनच मुलींनी खेळावे, अशीच बहुसंख्य पालकांची अपेक्षा असते. खेळण्याचे मैदान गाठण्यासाठीच अनेकींना आजही संघर्ष करावा लागतो. मिताली राज, स्मृती मानधना, झुलन गोस्वामी, हरमनप्रित कौर, शेफाली वर्मा या आजच्या स्टार क्रिकेट खेळाडू आहेत, पण ‘मी कायमच संघर्ष एन्जॉय करत आले’ ही झुलन गोस्वामीने व्यक्त केलेली भावना प्रत्येकीच्या मनात आजही असेल. त्यांच्यासह तत्कालीन अनेक खेळाडुंना खेळण्यासाठी पदरमोड करावी लागली. मैदानावर जाण्यायेण्याचा आणि खाण्याचा खर्च करावा लागला. तथापि बदलांच्या वार्याने आता वेग पकडला आहे. आता महिलांचे आयपीएल सुरु होणार आहे. त्यासाठीचे लिलाव नुकतेच पार पडले. महिला प्रिमियर लिग प्रक्षेपणाचे हक्क नऊशे एकावन्न कोटींना विकले गेल्याचे मंडळाच्या पदाधिकार्यांनी जाहीर केले. महिला क्रिकेटपटू सातत्याने स्वत:ला सिद्ध करतच आल्या आहेत. पण आता त्याबरोबरीने त्यांनाही भरघोस मानधन मिळेल, लोकाश्रय लाभेल अशी आशा पल्लवित झाली आहे. वर उल्लेखित स्टार क्रिकेटपटूंमुळे मुलींची पावले मैदानाकडे पुन्हा वळू लागली आहेत. क्रिकेट खेळावे असे मुलींना वाटू लागले आहे. महिला प्रिमियर लिगने संधीची दारे उघडली आहेत. यामुळे क्रिकेटपटूंचे अर्थकारणही बदलेल. स्पर्धात्मक वातावरण तयार होईल. त्यामुळे क्रिकेट खेळणार्या मुलींची संख्या वाढेल, अशी आशा करु या.