Tuesday, January 6, 2026
Homeदेश विदेशEpstein Files शी संबंधित ६८ नवीन फोटो प्रसिद्ध! Bill Gates यांच्या फोटोंसह...

Epstein Files शी संबंधित ६८ नवीन फोटो प्रसिद्ध! Bill Gates यांच्या फोटोंसह अनेक दिग्गजांची गुपिते आली जगासमोर

दिल्ली । Delhi

अमेरिकेतील कुख्यात लैंगिक गुन्हेगार आणि मानवी तस्करीचा मुख्य सूत्रधार जेफ्री एपस्टीन याच्याशी संबंधित प्रकरणाने पुन्हा एकदा जागतिक स्तरावर मोठी खळबळ उडवून दिली आहे. अमेरिकेच्या हाऊस डेमोक्रॅट्सने गुरुवारी एपस्टीनच्या मालमत्तेतून जप्त केलेली ६८ नवीन छायाचित्रे अधिकृतपणे जारी केली आहेत. या फोटोंमध्ये जगातील अनेक अतिश्रीमंत, प्रभावशाली व्यक्ती आणि दिग्गज उद्योजक एपस्टीनसोबत दिसत असल्याने चर्चांना उधाण आले आहे. यामध्ये मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते वुडी ॲलन यांच्यासारख्या बड्या नावांचा समावेश आहे.

- Advertisement -

हाऊस ओव्हरसाइट कमिटीने प्रसिद्ध केलेल्या या नवीन फोटोंमध्ये केवळ मनोरंजन क्षेत्रातील व्यक्तीच नाहीत, तर तंत्रज्ञान आणि राजकीय विश्वातील चेहरेही समोर आले आहेत. यात बिल गेट्स, गुगलचे सह-संस्थापक सर्जी ब्रिन, प्रसिद्ध तत्वज्ञानी नोम चॉम्स्की, डोनाल्ड ट्रम्प यांचे माजी सल्लागार स्टीव्ह बॅनन आणि न्यूयॉर्क टाइम्सचे स्तंभलेखक डेव्हिड ब्रूक्स यांचा समावेश आहे. दरम्यान, डेमोक्रॅट्सनी ही छायाचित्रे जारी करताना एक महत्त्वाची स्पष्टोक्ती दिली आहे. या छायाचित्रांमध्ये दिसणे म्हणजे त्या व्यक्तीने काही बेकायदेशीर कृत्य केले आहे असा होत नाही. हे फोटो केवळ ओळखीचा भाग आहेत आणि कोणत्याही गुन्हेगारीचा हा थेट पुरावा मानता येणार नाही, असे समितीने म्हटले आहे.

YouTube video player

या नवीन माहितीमध्ये केवळ सेलिब्रिटींचे फोटोच नाहीत, तर एपस्टीनच्या घरातून इतरही अनेक संशयास्पद गोष्टी हस्तगत करण्यात आल्या आहेत. तपास यंत्रणांना रशिया, युक्रेन, दक्षिण आफ्रिका आणि लिथुआनिया यांसारख्या विविध देशांचे पासपोर्ट, व्हिसा आणि बनावट ओळखपत्रे सापडली आहेत. विशेष म्हणजे, एका महिलेच्या शरीरावर व्लादिमीर नाबोकोव्ह यांच्या ‘लोलिता’ या वादग्रस्त कादंबरीतील ओळी लिहिलेले फोटोही सापडले आहेत. ही कादंबरी अल्पवयीन मुलींबद्दलच्या विकृत ओढीवर आधारित असल्याने, या फोटोंमुळे एपस्टीनच्या विकृत कृत्यांवर शिक्कामोर्तब होत आहे. तसेच, एका अज्ञात व्यक्तीच्या चॅटचा स्क्रीनशॉटही समोर आला आहे, ज्यामध्ये मुलींची तस्करी आणि एका मुलीसाठी १ हजार डॉलरची किंमत मोजण्याबाबत संभाषण झाल्याचे स्पष्ट होत आहे.

हे फोटो अशा वेळी समोर आले आहेत जेव्हा अमेरिकन न्याय विभागाला एपस्टीन आणि त्याची सहकारी घिसलेन मॅक्सवेल यांच्याशी संबंधित सर्व गुप्त दस्तऐवज सार्वजनिक करणे कायद्याने अनिवार्य झाले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकत्याच एका विधेयकावर स्वाक्षरी केली असून, त्याद्वारे न्याय विभागाला शुक्रवारपर्यंत सर्व संबंधित फाईल्स उघड करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वी उघड झालेल्या माहितीमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि ब्रिटनचे प्रिन्स अँड्र्यू यांची नावे समोर आली होती. या प्रकरणामुळे प्रिन्स अँड्र्यू यांना आपली शाही पदके आणि लष्करी पदे गमवावी लागली होती. आता नव्या फायलींमुळे अनेक बड्या उद्योजक आणि राजकारण्यांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे.

कोण होता जेफ्री एपस्टीन?

जेफ्री एपस्टीन हा एक अब्जाधीश अमेरिकन फायनान्सर होता. तो त्याच्या अफाट संपत्तीपेक्षा जागतिक स्तरावरील प्रभावशाली व्यक्तींशी असलेल्या संबंधांसाठी ओळखला जात असे. २००५ मध्ये त्याच्यावर पहिल्यांदा एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप झाला होता, मात्र आपल्या प्रभावाचा वापर करून तो किरकोळ शिक्षेवर सुटला होता. पुढे २०१९ मध्ये मानवी तस्करीच्या गंभीर आरोपांखाली त्याला पुन्हा अटक करण्यात आली. मात्र, खटला सुरू असतानाच न्यूयॉर्कमधील तुरुंगात त्याचा रहस्यमयरीत्या मृत्यू झाला. प्रशासनाने ती आत्महत्या असल्याचे घोषित केले असले तरी, त्याच्या मृत्यूभोवतीचे गूढ अद्याप कायम आहे. त्याची सहकारी घिसलेन मॅक्सवेल सध्या अमेरिकेतील तुरुंगात २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा भोगत आहे.

या प्रकरणाच्या ताज्या खुलाशामुळे जागतिक स्तरावर पुन्हा एकदा ‘पॉवर आणि क्राईम’ यांच्यातील संबंधांवर चर्चा सुरू झाली आहे. आगामी काळात येणाऱ्या अधिकृत फायलींमुळे आणखी किती प्रभावशाली लोकांचे बुरखे फाटणार, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

रविंद्र

“माझ्या त्या वक्तव्याकडे…”; विलासरावांवरच्या ‘त्या’ वक्तव्यावर रविंद्र चव्हाणांची आज एका वाक्यात...

0
छ. संभाजीनगर | Chhatrapati Sambhajinagarमहाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूरमधून पुसल्या जातील, अशी भाषा करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना विलासरावांचा...