सार्वमत
नवी दिल्ली – देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 21 दिवसांच्या (25 मार्च ते 14 एप्रिल) लॉकडाऊनची घोषणा केली होती. मात्र, हे लॉकडाऊन आता अधिक 19 दिवसांनी वाढवून 3 मेपर्यंत करण्यात आले आहे. यादरम्यान कोणकोणत्या सेवांवर बंदी आहे याची नवीन नियमावली गृहमंत्रालयाने बुधवारी जाहीर केली आहे. यामध्ये शेती आणि ग्रामीण भागांतील विशिष्ट उद्योगांसह काही सेवांना सवलत देण्यात आली आहे. तर, 13 सेवांवरील बंदी कायम ठेवण्यात आली आहे. वर्क फ्रॉम होमची सवलत वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
रुग्णालये, किराणा दुकान, शेती, ऑनलाईन शिक्षण आणि मासेमारी या सर्व सेवांना सवलती देण्यात आल्या आहेत. या सर्व सवलती ग्रामीण भागांत आणि हॉटस्पॉट्स नसलेल्या क्षेत्रांसाठी असतील. या सूचनांमध्ये ग्रामीण भागातील उद्योगांमध्ये काम करणार्या मजूरांना ये-जा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. सिंचन प्रकल्प किंवा नूतनीकरणयोग्य उर्जाशी जोडलेल्या ग्रामीण भागात बांधकाम उपक्रमांना सूट देण्यात आली आहे. मजुरीची उपलब्धता असल्यास स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने मुख्य भागात बांधकामांना परवानगी आहे.
20 एप्रिलनंतर हॉटस्पॉट आणि सील केलेल्या भागांसाठी गृहमंत्रालयाद्वारे एक वेगळी नियमावली जाहीर करण्यात येणार आहे. नव्या नियमावलीमध्ये देण्यात आलेल्या सवलती या हॉटस्पॉट आणि सील प्रदेशांना लागू होणार नाहीत. हे हॉटस्पॉट्स फक्त आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांद्वारेच राहतील.
महामार्गावरील ढाबे उघडणार
सर्व रेस्टॉरंट्स बंद राहतील, परंतु ट्रक चालकांच्या सोयीसाठी महामार्गावरील ढाबे उघडले जातील, ट्रक दुरुस्तीची दुकानेही खुली राहतील. असे नियमावलीत म्हटले आहे. दरम्यान लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात अनेक ट्रक चालक रस्त्यावरच अडकले आणि त्यांना खाण्यापिण्याच्या अडचणी आल्या.
या सेवा बंद राहणार, अंत्यसंस्कारात 20 लोकांनाच परवानगी
सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे, रेल्वे (प्रवासी वाहतुकीसाठी), बस, उपनगरातील मेट्रो, सर्व शैक्षणिक-प्रशिक्षण केंद्रे, औद्योगिक आणि व्यावसायिक प्रकल्प, हॉटेल, टॅक्सी, ऑटो रिक्षा, सायकल रिक्षा, कॅब, सिनेमा हॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, जिम, क्रीडा संकुल, पोहणे तलाव, बार, थिएटर, कोणताही कार्यक्रम, सर्व धार्मिक स्थाने, वैद्यकीय कारणांशिवाय व्यक्तींची आंतरजिल्हा आणि आंतरराज्यीय वाहतूक, सर्व शाळा, महाविद्यालये, प्रशिक्षण संस्था, मार्गदर्शक तत्त्वांनुसार परवानगी असलेल्या औद्योगिक आणि व्यावसायिक प्रकल्पांव्यतिरिक्त इतर सर्व उद्योगधंदे, या मार्गदर्शक तत्त्वांनुसार परवानगी असलेल्यांशिवाय, लग्न समारंभ असलेली मैदाने यांसारख्या गर्दी जमणार्या सर्व सेवा, राजकीय, क्रीडा, मनोरंजन संबंधित सर्व कार्यक्रम, सर्व धार्मिक स्थळे/ठिकाणे किंवा सार्वजनिक ठिकाणी आयोेजित पूजा किंवा अन्य कार्यक्रम, देशातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व ऑफिस बंद राहतील. याशिवाय कोणत्याही अंत्यसंस्कारात 20 हून अधिक लोकांना जाऊ दिले जाणार नाही. कोरोनाच्या हॉटस्पॉट क्षेत्रात कोणतीही सवलत दिली जाणार नाही. तसेच, कोणालाही बाहेर पडू दिले जाणार नाही. जीवनावश्यक वस्तूंची होम डिलीव्हरी केली जाईल.
20 एप्रिलनंतर काही भागात थोडी सवलत
ज्या भागात कोरोनाचे रुग्ण नाहीत, अशा ठिकाणी सवलत मिळू शकते. 20 एप्रिलपर्यंत त्याचा आढावा घेतला जाणार असून, या आढावानंतर काही भागात थोडी सवलत दिली जाईल. सवलत देण्यापूर्वी राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक तत्त्वाचे अनुसरण करण्यासाठी सर्व उपाय केले जातील, जेणेकरून कार्यालय, कार्यस्थळ, कारखाने किंवा संस्थांमध्ये सामाजिक अंतर कायम ठेवले जाईल.