Sunday, September 8, 2024
Homeनगरनवीन संगमनेर मंडलात अनेक नोंदी प्रलंबित

नवीन संगमनेर मंडलात अनेक नोंदी प्रलंबित

संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner

संगमनेर तालुक्यातील संगमनेर खुर्द महसुली मंडल नव्याने स्थापन झालेले आहे. सरासरी राजकीयदृष्ट्या सर्वात मोठा व सदनशील मंडलामध्ये शासनाला महसूल गोळा करून देणारे प्रमुख आठ गावे या मंडलात सहभागी आहेत.

- Advertisement -

शासनाच्या धोरणानुसार नवीन स्थापित झालेल्या या महसुली मंडलामध्ये चंदनापुरी, सावरगांव तळ, निमज, देवगांव, हिवरगांव पावसा, रायतेवाडी, संगमनेर खुर्द, खांडगाव या गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. परंतु यामध्ये आठ गावांपैकी सात गावांना महिला तलाठी कार्यरत आहेत. तर निमज गावाला एक पुरुष तलाठी काम करत आहे. या आठ गावासाठी मंडलधिकारी (सर्कल) म्हणून महिलेची नियुक्ती झालेली आहे. यामुळे संबंधित गावांमध्ये काम करताना सर्व तलाठी कार्यालयामध्ये महिलाराज पाहावयास मिळत आहे.

काही ठिकाणी तर महिला तलाठी आपल्या मर्जीतल्या वेळेनुसार येतात व जातात यादरम्यान गाव पातळीवरती शेतकर्‍यांना सातबाराचे उतारे, नोंदी, पीकविमा, अशा दैनंदिन कामांकरिता महसूल विभागाशी ये-जा करावी लागते. परंतु, काही ठिकाणी आपल्या वेळेत महिला तलाठी आपल्या कार्यालयात उपस्थित असतात त्यामुळे अनेक शेतकर्‍यांना आपल्या कामाचे नुकसान करून तलाठी यांची वाट बघावी लागते. मात्र, महिला तलाठी असल्याने त्यांच्याशी आपण काय वाद घालणार? या भूमिकेने बरेच लोक वाद न घालताच जेवढं काम होईल, त्या कामात समाधान मानून निघून जातात. संगमनेर खुर्द येथील मंडलधिकारी यांनी पदभार घेऊन चार महिने होऊन गेले आहे. परंतु, त्यांनी पदभार घेतल्यापासून त्यांच्या विभागातील आठ गावे जोडलेल्या शेतकर्‍यांचे नियमित असलेल्या अनेक नोंदी प्रलंबित आहे.

शेतकरी हे दररोज तलाठी कार्यालयात खेटा घालत तलाठी यांना विनंती करतात. आमची नोंद करून टाका. मात्र तलाठी यांनी नोंद टाकली असता मंडलधिकारी यांच्याकडून कोणत्याच प्रकारचा त्या नोंदीला प्रतीसाद दिला जात नाही. शासनाच्या नियमानुसार नोंद टाकली तर पंधरा दिवसांनंतर ती नोंद मंजूर करावी लागते. या ठिकाणी महिना उलटून गेला तरी देखील अशा बर्‍याच नोंदी रखडल्या आहे. यामुळे या मंडळातील अनेक हातमजूर, शेतकरी, कष्टकरी, या त्रासाला सामोरे जात आहे संबंधित मंडलाधिकारी यांना शेतकर्‍यांनी फोन केला असता फोन न उचलणे, मी बाहेर आहे, माझ्याकडे खूप गावे आहे, मी नवीन आहे असे उत्तर देऊन वेळ मारून नेत आहे.

दरम्यान शेतकर्‍यांशी निगडित असलेले दैनंदिन कामकाजात शेतीच्या कामासाठी बँकेकडून कर्ज घेण्यासाठी त्यांना शेतीवर बँकेचा बोजा चढवणे, बोजा कमी करणे, वारस नोंद, रस्ता केस, गहाणखत, वारस अहवाल मान्यता लवकर व्हाव्यात, अशा दैनंदिन कामासाठी यांना मंडलाधिकारी यांच्याकडे नोंदणीसाठी जावे लागते. संबंधित तलाठी यांनी नोंदी टाकलेल्या आहेत. मात्र, मंडलाधिकारी यांनी संबंधित दिवसांचा कालावधी होऊन देखील नोंदी मंजूर केलेल्या नसून यामुळे या गावातील लोकांचा रोश अधिकच वाढत आहे.

हिवरगांव पावसा तलाठी कार्यालयाने मंजुरीसाठी पाठवलेल्या पेंडीग नोदी 7 असून नव्याने टाकलेला 17 नोंदी अशा नोंदी प्रलंबित आहे. तर चंदनापुरी तलाठी कार्यालयाने मंजुरीसाठी पाठवलेल्या 13 नोंदी पेंडिंग आहे. तर नव्याने टाकलेल्या 27 नोंदी पेडींग आहेत. इतर तलाठी कार्यालयांची अशीच परिस्थिती आहे. यामुळे गाव पातळीवर लोक तलाठी कार्यालयाच्या ठिकाणी नोंदीसाठी खेटा मारताना दिसतात. महसूलच्या भोंगळ कारभारामुळे शेतकरी हैराण झालेला असून या संगमनेर खुर्द गटातील शेतकरी व नागरिकांना न्याय मिळावा व अनुभवी मंडलाधिकारी या मंडळात मिळावा, अशी मागणी आता लोकांमधून होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या