अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये केंद्र शासनाने मोठ्या प्रमाणावर घरकुलास मान्यता दिली आहे. 2018 मध्ये आवास प्लस ऑनलाइन सर्वेक्षणमधील तयार करण्यात आलेल्या प्रतीक्षा यादीमध्ये समावेश नसलेल्या आणि यंत्रणेद्वारे अपात्र ठरलेल्या आणि सद्यस्थितीत पात्र असलेले कुटुंबाचे प्रधानमंत्री आवास योजना टप्पा क्रमांक दोन अंतर्गत सुधारीत सर्वेक्षण केले जाणार आहे. या सर्वेक्षणाची जबाबदारी संबंधीत गावातील ग्रामसेवकांवर सोपवण्यात आली असून पुढील तीन महिन्यांत नवीन पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेसाठी शासनाने 2012 मध्ये गावनिहाय आवास प्लस हे ऑनलाइन सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणाच्या आधारे शासनाने 2018 मध्ये घरकुलासाठी गावनिहाय लाभार्थ्यांची प्रतिक्षा यादी तयार करण्यात आली होती. या प्रतीक्षा यादीतून लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून घरकुलाचा लाभ टप्प्याटप्प्याने देण्यात येत होता. पहिला टप्प्यामध्ये प्रतिक्षा यादीतील लाभार्थी मार्च 2025 पर्यंत उद्दिष्ट पूर्ण केले जाणार आहे. त्याप्रमाणे लाभार्थ्यांचे रजिस्ट्रेशन करण्यात येऊन 15 हजार रुपये पहिला हप्ता खात्यामध्ये वर्ग करण्यात आला आहे. 2018 मध्ये झालेल्या आवास प्लस सर्वेक्षणच्या प्रतिक्षा यादीमध्ये अनेक पात्र कुटुंबाचा समावेश नसल्याने या कुटुंबांना घरकुलाचा लाभ द्यावा अशी मागणी मागील काही वर्षापासून लाभार्थी कुटुंबाकडून सातत्याने केली जात होती. आता शासनाने प्रधानमंत्री आवास घरकुल योजना टप्पा क्रमांक दोन अंतर्गत पात्र कुटुंबाची सर्वेक्षण मोहीम हाती घेतली आहे.
यादीची अकस्मात तपासणी
ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. 2024-25 ते 2028-2029 या पाच वर्षाच्या कालावधीसाठी प्रधानमंत्री आवास घरकुल योजना टप्पा दोन राबविला जाणार आहे. त्यासाठी घरकुल लाभार्थी निवडण्यासाठी सुधारित सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यामुळे प्रतीक्षा यादी समावेश नसलेल्या आणि पात्र कुटुंबातील लाभार्थ्यांना आता घरकुलाचा लाभ मिळण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे. पुढील तीन महिन्यांत हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तसेच तयारी होणार्या नवीन सर्वेक्षण यादीची रॅन्डम (अकस्मात) तपासणीचे काम मुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकारी यांना करावी लागणार आहे.