नाशिक । प्रतिनिधी Nashik
डायल 112 प्रकल्पाअंतर्गत नाशिक ग्रामीण पोलीस दलाला मिलेल्या एकूण 27 नवीन दुचाकी वाहनांना पोलीस महासंचालक (दहशतवाद विरोधी पथक महाराष्ट्र राज्य) सदानंद दाते यांनी हिरवा झेंडा दाखवून ही वाहने नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिले.ही नवीन व सुसज्ज 27 दुचाकी वाहनांच्या उपलब्धतेमुळे नाशिक ग्रामीण पोलीसांना जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न हाताळण्यासोबतच तक्रारदारांचे कॉल स्वीकारून त्यावर शीघ्रतेने कारवाई करण्यासाठी मोठी मदत होणार आहे. तर डायल 112 वर येणार्या कॉलला लागणारा प्रतिसाद वेळ देखील कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.
नाशिक ग्रामीण पोलीस अंतर्गत एकूण 40 पोलीस स्टेशन, 8 उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालये, तर अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण व मालेगाव विभाग अशी एकूण 50 कार्यालये व इतर शाखा कार्यरत आहेत. सुमारे साडेतीन हजार पोलीस अंमलदार व पोलीस अधिकारी कार्यरत असलेले जिल्हा ग्रामीण पोलीस दल सुमारे 15,000 चौरस किलोमीटर परिसरातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळतो. राज्यातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत पोलीस मदत एकाच टोल फ्री क्रमांकावर उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा डायल 112 प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे.
या योजनेअंतर्गत नागरिकांनी केलेली तक्रार प्रायमरी कॉल सेंटर अथवा सेकंडरी कॉल सेंटर याव्दारे नाशिक ग्रामीणच्या मुख्य नियंत्रण कक्षात प्राप्त होते. तक्रार प्राप्त झाल्यानंतर ती शीघ्रतेने घटनास्थळापासून सर्वात जवळ असलेल्या वाहनास पुरविली जाते. कॉल करणार्या इसमाने मागितलेल्या मदतीनुसार असे वाहन तात्काळ घटनास्थळी रवाना होते व अडचणीत असलेल्या इसमास मदत पोहचविण्याचे काम करते. नाशिक ग्रामीण भागात सप्टेंबर 2019 पासून डायल 112 प्रकल्प कार्यान्वित झाला असून या प्रकल्पाअंतर्गत नागरिकांच्या तक्रारींची शीघ्रतेने दखल घेण्यासाठी या घटकास आणखी वाहनांची गरज होती.
ही बाब लक्षात घेवून पोलीस महासंचालक कार्यालयाकडून एकूण 12 होंडा शाईन दुचाकी वाहने व जिल्हा नियोजन समितीकडून एकूण 15 बजाज पल्सर दुचाकी वाहने नाशिक ग्रामीण पोलीस दलाला मिळाले आहे. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी केले. याप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक माधुरी केदार-कांगणे, पोलीस उपअधीक्षक मुख्यालय नितीनकुमार गोकावे, पोलीस निरीक्षक मोटर परिवहन विभाग पंकज पवार, पोलीस निरीक्षक बिनतारी संदेश विभाग गोकुळ पवार, तसेच ग्रामीण पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.