शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
साईनगरीत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लाखों साईभक्तांनी (Sai Devotee) 31 डिसेंबरच्या रात्री ठीक 12 वाजेच्या ठोक्याला मंदिर व मंदिर परिसरात साईनामाचा जयघोष करत 2026 या नववर्षाचे स्वागत (New Year) साईबाबांच्या नामस्मरणाने व फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद उत्सवाने साजरे केले.
31 डिसेंबर सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व 1 जानेवारी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी प्रत्येक वर्षी शिर्डीत जगभरातून लाखो साई भक्त शिर्डीत (Shirdi) नवीन वर्षाची सुरुवात साईबाबांच्या आशीर्वाद व्हावी व आपल्या कुटुंबांवर साईबाबांची कृपा राहावी ही भावना मनाची बाळगून 31 डिसेंबरच्या रात्री 12 वाजेच्या ठोक्याला साईनाथ महाराज की जय असा जयघोष करत नववर्षाचे स्वागत करून फटाक्यांची आतिषबाजी करतात. त्यामुळे प्रत्येक वर्षी साई समाधीचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी शिर्डीत बघायला मिळते. याही वर्षी भाविकांच्या गर्दीने साईनगरी फुलून गेली असल्याचे बघायला मिळाले.
शिर्डी महोत्सवाच्या निमित्ताने दानशूर साईभक्त बी. ए. बसवराज, बेंगळूरू यांच्या देणगीतून साईबाबा मंदिर व परिसरात अत्यंत आकर्षक व मनोवेधक फुलांची सजावट करण्यात आली आहे. तसेच दानशूर साईभक्त निलेश सुरेश नरोडे, मे. ओम साई इलेक्ट्रिकल्स अॅण्ड डेकोरेटर्स, शिंगवे यांच्या देणगीतून मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. बुधवार व गुरुवार भाविकांच्या गर्दीने शिर्डी व परिसरातील हॉटेल, लॉजिंग हाउसफुल झाल्याचे दिसून आले. फुलहार, प्रसाद, नोवेल्टी व इतर दुकानात देखील भाविकांनी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून आले. महाप्रसाद घेण्यासाठी साई भक्तांनी मोठी गर्दी केली होती. नगर-मनमाड महामार्गावर व लक्ष्मीनगर ते पिंपळवाडी रोड या दरम्यान नो व्हेईकल झोन करण्यात आला होता.
शिर्डीतील विविध रस्त्यांवर विविध राज्यातून येणार्या साईभक्तांच्या वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने काही वेळ शहरात वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. साईबाबा संस्थाने उभारलेल्या नवीन दर्शन रांगेतील 12 हॉल भाविकांच्या गर्दीने हाउसफुल झाल्याचे दिसले. जवळपास 4 ते 5 तास दर्शन रांगेतून येणार्या साई भक्तांना साई समाधीचे दर्शन घेण्यासाठी वेळ लागला. प्रति तासाला जवळपास सहा हजार भाविकांनी साई समाधीचे दर्शन घेतले असल्याची नोंद झाली. गुरुवारी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्यामुळे साई मंदिरात तसेच प्रसादलयात व वाहतूक शाखेला साई भक्तांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी मोठी कसरत करावी लागली.
साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकार गोरक्ष गाडीलकर, पोलीस उपाधीक्षक अमोल भारती व पोलीस निरीक्षक रंजीत गलांडे यांनी भाविकांची कुठलीही प्रकारची गैरसोय होऊ नये याकरिता साईबाबा संस्थानचे कर्मचारी तसेच पोलीस प्रशासन यांना वेळोवेळी संपर्क करून सीसीटीव्ही कॅमेरेद्वारे सर्व परिसरात लक्ष ठेवून होते. 31 डिसेंबर रोजी रात्री साई मंदिर खुले ठेवण्यात आल्याने भाविकांना साई समाधीचे दर्शन घेण्यासाठी गैरसोय झाली नसल्याचे दिसून आले. साई संस्थान प्रशासनाने विविध धार्मिक कार्यक्रमांचे नववर्षानिमित्त आयोजन केले होते. एकूणच 2026 या नवीन वर्षाचे भाविकांनी साई नामाचा जयघोष करत मोठ्या जल्लोषाने साजरे केले.




