बेंगळुरू | Bangalore
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. हा सामना न्यूझीलंडने ८ विकेट्सनी जिंकला. न्यूझीलंड संघाने ३६ वर्षांनंतर भारतात कसोटी सामना जिंकत इतिहास घडवला आहे.
न्यूझीलंडने यापूर्वी १९८८ साली मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर टेस्टमध्ये अखेरच्या वेळी १३६ रन्सने विजय मिळवला होता. त्यामुळे आजचा हा विजय न्यूझीलंडसाठी खास ठरला आहे. एकूणच, न्यूझीलंडचा हा भारतीय भूमीवरील तिसरा कसोटी विजय ठरला. या विजयामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये देखील न्यूझीलंडने झेप घेतली आहे.
बंगळुरू येथील भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे खराब झाला, यामुळे टॉस सुद्धा होऊ शकला नाही. गुरुवारी दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र त्याचाही निर्णय टीम इंडियासाठी अयोग्य ठरला. कारण पहिल्याच इनिंगमध्ये न्यूझीलंडने टीम इंडियाला ४६ धावांवर ऑल आउट केले. टीम इंडिया प्रथमच भारतात झालेल्या टेस्ट सामन्यात इतक्या कमी धावांवर ऑल आउट झाली होती.
दुसऱ्या इनिंगमध्ये न्यूझीलंडच्या फलंदाजांनी टीम इंडियाचा गोलंदाजांना घाम फोडला. न्यूझीलंडकडून रचिन रवींद्रने १३४ तर देवोन कॉनवे याने ९१ धावा केल्या. तर टीम साऊथ (६५) सह इतर फलंदाजांच्या खेळीमुळे न्यूझीलंडने तब्बल ४०२ धावांचा डोंगर उभा केला. यात न्यूझीलंडने ३५६ धावांची आघाडी घेतली होती.
तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी टीम इंडियाने न्यूझीलंडची ही आघाडी मोडण्यासाठी मजबूत फलंदाजी केली आणि ते यात यशस्वी सुद्धा ठरले. यात टीम इंडियाकडून रोहित शर्माने ५२, विराट कोहलीने ७०, सरफराज खानने १५०, ऋषभ पंतने ९९ तर यशस्वी जयस्वालने ३५ धावा करून न्यूझीलंडची आघाडी मोडीत काढली आणि न्यूझीलंडला विजयासाठी १०७ धावांचे आव्हान दिले.