दिल्ली | Delhi
एकदिवसीय विश्वचषकातील सोळाव्या सामन्यात न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यात क्रिकेटचा थरार पाहायला मिळणार आहे. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, हा सामना दुपारी 2.00 वाजता सुरु होईल. या स्पर्धेत न्यूझीलंडच्या संघाने आतापर्यंत खेळल्या गेलेल्या तिन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. तर, अफगाणिस्तानने दोन पराभवांसह सुरुवात केली, पण मागील सामन्यात त्यांनी गतविजेता इंग्लंडला 69 धावांनी पराभूत केले.
न्यूझीलंड संघाच्या मागील सामन्यादरम्यान कर्णधार केन विलियम्सन (Kane Williamson) याच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे तो आगामी सामन्यातून बाहेर पडला आहे. त्यामुळे टॉम लॅथम (Tom Latham) पुन्हा एकदा संघाची धुरा सांभाळताना दिसेल. विश्वचषक आणि वनडे क्रिकेटच्या इतिहासात न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान संघ आतापर्यंत फक्त 2 वेळा आमने-सामने आले आहेत. यामध्ये दोनही वेळा न्यूझीलंड संघ विजयी झाला आहे. मात्र, गतविजेत्या इंग्लंडला पराभूत केल्यामुळे अफगाणिस्तानचाही आत्मविश्वास गगनाला भिडला आहे. अशात न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात अफगाणिस्तान संघ पुन्हा एकदा जागतिक क्रिकेटला हैराण करण्यासाठी सज्ज असेल.
चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमची खेळपट्टी संथ आणि फिरकी गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरत आहे. पहिल्या दोन्ही सामन्यात फिरकी गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला होता. तसेच, आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या संघाने सामना आपल्या नावावर केला आहे. दुसरीकडे, या मैदानाविषयी बोलायचं झालं, तर इथे आतापर्यंत 36 वनडे सामने खेळले गेले आहेत. यातील 17 सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने, तर 18 सामन्यात आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. येथे सर्वोच्च धावसंख्येचा सामना पाहायला मिळत नाही. वनडेत चेपॉक मैदानावरील सर्वोच्च धावसंख्या 224 आहे, तर दुसऱ्या डावातील सर्वोच्च धावसंख्या 206 आहे.