नेवासा । प्रतिनिधी
नेवासा विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरलेल्या २४ पैकी १२ उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने १२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. महायुतीतील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विठ्ठलराव लंघे यांच्या विरोधात माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी उमेदवारी कायम ठेवली.
मुरकुटे यांच्या उमेदवारीचा सर्वाधिक फटका विठ्ठलराव लंघे यांना बसणार अशी चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार अब्दुल शेख यांनी अर्ज मागे घेण्यास काही मिनिटे शिल्लक असताना अचानक उमेदवारी अर्ज मागे घेतला. दरम्यान, मतदारसंघात १२ उमेदवार रिंगणात आहेत.
महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या उद्धव ठाकरे शिवसेनेचे शंकरराव गडाख, महायुतीचा घटक पक्ष शिंदे शिवसेनेचे विठ्ठलराव लंघे व प्रहार जनशक्ती पक्षाचे बाळासाहेब मुरकुटे अशी तिरंगी लढत होणार आहे. तर वंचितचे पोपट सरोदे, बसपाचे हरिभाऊ बहिरु चक्रनारायण हे प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवारही निडणुकीच्या मैदानात आहेत.
नेवासा विधानसभेसाठी २४ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. सोमवार दि. ४ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १२ उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने १२ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. माघारीनंतर नेत्यांमधील वाक्युद्धाला धार घेणार, याची चुणूक लंघे व मुरकुटेंनी एकमेकांवर सुरू केलेल्या टिकेवरून दिसून आली. ठाकरे गटाचे उमेदवार गडाख यांनी ६ महिन्यांपूर्वीच जनतेत जाण्याची मोहीम हाती घेतली आहे.
शिंदे गटाचे उमेद्वार विठ्ठलराव लंघे यांचा त्यांच्याच जिल्हा परिषद गटात संपर्क तुटल्याची चर्चा आहे. २००९ पासून त्यांचा तालुक्यात सार्वत्रिक संपर्क नाही. बेलपिंपळगाव गटात त्यांचे कोणतेही काम नाही. सातत्याने घुले यांच्या विरोधात आरोप करणाऱ्या लंघे यांनी कारखान्याच्याच मुद्यावर पडद्याआड घुले यांच्याशीच हातमिळवणी केल्याचे अनेकदा समोर आले आहे. त्यातूनच त्यांनी कारखान्याचा राजीनामा अनेकदा जाहीर करून देखील दिलेला नाही.
नेवासा तालुक्यात शंकरराव गडाख यांच्याशी विठ्ठल लंघे यांची पडद्याआड युती असल्याचा आरोप मुरकुटे गटाकडून होत आहे. याउलट बाळासाहेब मुरकुटे यांनी २०१४ ला गडाख यांचा पराभव केला होता. तसेच २०१९ च्या निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला. मुरकुटे यांचा तालुक्यात मोठा संपर्क असून लंघे यांच्यापेक्षा मुरकुटे हे जनतेच्या अधिक संपर्कात असल्याचे मागील दिसून आले आहे.
मुरकुटे आणि लंघे या दोघांनीही उमेदवारीसाठी सलग तीन महिने मुंबई वाऱ्या केल्या. राज्यातील महायुतीच्या नेत्यांना भेटताना दोघांनी एकाच वेळी भेटी घेतल्या. मात्र, शेवटच्या क्षणी विठ्ठलराव लंघे यांना उमेदवारी मिळताच बाळासाहेब मुरकुटे यांनी बंडाचे निशाण हाती घेतले. दुसरीकडे शंकरराव गडाख यांनी जवळपास सहा महिन्यांपासून तालुका पिंजून काढला.
त्यांच्या बैठकांना जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला. बाड्या वस्त्यांवर घोंगडी बैठका घेतल्या. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठे शक्तीप्रदर्शन केल्यानंतर गडाख यांनी सहा दिवसाच्या अंतराने दुसरा मेळावा घेतला आणि त्या मेळाव्याला देखील मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे १२ उमेदवार मैदानात असले तरी मतदारसंघातील ही तिरंगी लढत आतापासूनच गाजण्यास सुरूवात झाली आहे.
रिंगणातील उमेदवार व चिन्हे
शंकरराव यशवंतराव गडाख (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) मशाल, विठ्ठल वकिलराव लंघे (शिवसेना) धनुष्यबाण, बाळासाहेब उर्फ दादासाहेब दामोदर मुरकुटे (प्रहार जनशक्ती पक्ष) बॅट, हरिभाऊ बहिरु चक्रनारायण (बहुजन समाज पार्टी) हत्ती, पोपट रामभाऊ सरोदे (वंचीत बहुजन आघाडी)-गॅस सिलेंडर. अपक्ष ज्ञानदेव लक्ष्मण कांबळे (कपाट), मुकुंद तुकाराम अभंग (ग्रामोफोन), ज्ञानदेव कारभारी पाडळे (सफरचंद), वसंत पुंजाहारी कांगुणे (चिमणी), सचिन प्रभाकर दरंदले (फलंदाज), जगन्नाथ माधव कोरडे (बॅटरी टॉर्च), शरद बाबुराव माघाडे (ट्रम्पेट).
उमेदवारी मागे घेणारे अर्जदार
अब्दुल लालाभाई शेख (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), सुनीता शंकरराव गडाख (अपक्ष), आशाताई दादासाहेब मुरकुटे (अपक्ष), रत्नमाला विठ्ठलराव लंघे (अपक्ष), सचिन मदनलाल देसरडा (अपक्ष), ऋषिकेश वसंत शेटे (अपक्ष), शशिकांत भागवत मतकर (राष्ट्रीय समाज पक्ष), संतोष नानासाहेब काळे (अपक्ष), अॅड. अजित बबनराव काळे (अपक्ष), रविराज तुकाराम गडाख (अपक्ष), गोरक्षनाथ पंढरीनाथ कापसे (अपक्ष), रामदास रावसाहेब चव्हाण (अपक्ष).
उमेदवार मतदारसंघात सरसावले
बाळासाहेब मुरकुटे अपक्ष उमेदवारी करत असले तरी संपर्कामुळे जनतेत त्यांना प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. तर लंघे यांचा कुकाणा गट वगळता दुसऱ्या गटात संपर्क नसल्याची चर्चा आहे. तिरंगी लढत असली तरी कार्यकत्यांनी शांतपणे जनतेत जाऊन आपली भूमिका मांडावी, असा सल्ला आ. शंकरराव गडाख यांनी दिला आहे