गणेशवाडी |वार्ताहर| Ganeshwadi
नेवासा तालुक्यातील हनुमानवाडी येथे दोन गटांत झालेल्या मारहाणप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार दि. 5 सप्टेंबर रोजी फिर्यादी सुबोध सुरेश जाधव (वय 23 रा. हनुमानवाडी) हे मित्रास भेटण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी मोठा जमाव होता. त्यामध्ये एक जण मोठमोठ्याने आरडाओरडा करत होता. त्यास समजून सांगत असताना त्याठिकाणी असलेला राहुल राख म्हणाला की, तू या ठिकाणी दादागिरी करण्यास आला आहे का? नंतर फिर्यादी हे आपल्या घरी निघून गेल्यानंतर रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास दहा ते अकरा जण येऊन सुबोध सुरेश जाधव, शुभम पदमाकर घरकले, अतुल सुरेश जाधव यांना शिवीगाळ करत मारहाण करून जखमी केले.
त्या ठिकाणी असलेल्या दुचाकीचे देखील नुकसान केले. सोनई पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीवरून अभिजित सुभाष राख, राहुल सुभाष राख, अशोक, किसन राख, अर्जुन किसन राख, निलेश अशोक पोटे (सर्व राहणार हनुमानवाडी) व इतर अनोळखी पाच ते सहा जण यांच्याविरुद्ध बीएनएस चे कलम 118 (1), 115 (2), 189 (2), 191 (3), 190, 352, 351 (2), 351(3), 324 (4) (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार रवींद्र लबडे करत आहेत.
दुसर्या फिर्यादीमध्ये फिर्यादी सुभाष किसन राख यांची मुले, पुतण्या व एक शेजारी असे शरद भिमराव वाघ यास चक्कर आल्यामुळे त्यांच्या घराच्या पटांगणात बसले होते. त्यावेळी सुबोध सुरेश जाधव, सुरज सुधीर शेटे, अतुल सुरेश जाधव, रोहन वाघ असे त्यांचे गाडीमध्ये (एमएच 12 एचएन 2728) बसून आले. फिर्यादीची मुले व त्यांचे मित्र यांना वरातीमध्ये येण्यासाठी आग्रह करू लागले. त्यास त्यांनी नकार दिला असता फिर्यादीचे मुले व पुतण्या यांना बांबूच्या काठीने मारहाण करत त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन बळजबरीने तोडून नेली. तसेच त्यांचे शेजारी शरद व गौरव यांना मारहाण करत शिवीगाळ केली व जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. फिर्यादीवरून बीनएस चे 115 (2), 118 (1), 352, 351 (2) (3), 119 (1), 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक बाळासाहेब बाचकर करत आहेत.