Saturday, July 27, 2024
Homeनगरनेवाशात निर्माण झाला ‘खाकी’च्या सन्मानजनक अस्तित्वाचा प्रश्न

नेवाशात निर्माण झाला ‘खाकी’च्या सन्मानजनक अस्तित्वाचा प्रश्न

सलाबतपूर |वार्ताहर| Salabatpur

संतांच्या भूमित भ्रष्ट अधिकार्‍यांमुळे जनतेचा रक्षणकर्त्यावरचा विश्वास उडाला असून आता खाकीच्या सन्मानाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असून गेल्या दहा वर्षात डागाळलेली नेवासा पोलिसांची प्रतिमा भविष्यात स्वच्छ होईल का? असा प्रश्न सध्या तालुक्यातील जनतेत जोरदार चर्चीला जाऊ लागला आहे.

- Advertisement -

नेवासा हा देवदेवता तसेच संतांच्या पदपर्शाने पावन झालेला तालुका आहे. जेथून जगाला ज्ञानरुपी आमृत पाजले गेले ते नेवासा येथील ज्ञानेश्वरी ग्रंथात सांगितल्याप्रमाणे देवालय म्हणून उल्लेख असलेलं ज्ञानेश्वर मंदीर, भारतभर स्वच्छ व पवित्र मानलं जाणारं देवगड तर जगविख्यात असलेलं शनिदेवाचं शिंगणापूर अशी पवित्र देवस्थाने आहेत. त्यामुळे संतांची पावनभूमी अशी ओळख असलेला नेवासा तालुका सध्या खाकीतील शंकास्पद कारभारामुळे बदनाम होत आहे.

अलिकडच्या काळात नेवासा पोलीस ठाणे त्याच्या कारभारामुळे कायमच चर्चेचा विषय बनत असतं. या पोलीस ठाण्यात दहा वर्षात अनेक पोलीस अधिकारी आले व गेले मात्र त्यांना सन्मान टिकवता आला नाही. तालुक्यात या पोलीस अधिकार्‍यांमुळेच वाळूतस्करीने जोर धरला असून यातूनच गुन्हेगारी फोफावली गेली आहे. याचा सर्वसामान्यांना कायमच त्रास सहन करावा लागतो हेही आपण पाहिले आहे. त्याचबरोबर मटका मावा, जुगार, दारू यासाठी प्रसिद्ध असल्याचं अनेकदा बोललं जातं.

गेल्या दहा वर्षात नेवासा पोलीस अधिकार्‍याची खुर्ची दंड, चौकशी आणि निलंबनाच्या विळख्यात अडकली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. सर्वसामान्यांना न्याय देण्याच्या नावाखाली खाकी वर्दी दलालामार्फत सर्वसामान्य जनतेची लुट करतानाचे विदारक वास्तव समोर आले आहे. संपूर्ण जिल्ह्यात नेवासा पोलीसच भ्रष्टाचाराचे बळी ठरल्याचे चित्र समोर आहे. अलिकडच्या काळात तर अनेक अधिकारी व कर्मचार्‍यांचे कारनामे सोशल मिडियाच्या माध्यमातून ऑडिओ क्लिपमुळे प्रकाशझोतात आले असून त्यातील अर्थपूर्ण विषयाशी निगडीत संभाषणामुळे नेवासा तालुका अर्थिकदृष्या सोन्याचं अंडं देणारी कोंबडी आहे असा चंग बांधूनच अधिकारी इथे येतात की काय? प्रश्न उपस्थित होत आहे .

काल-परवा एक पोलीस अधिकारी व वाळूतस्कराच्या संभाषणाची ऑडीओ क्लिप व्हायरल झाली. त्यात अधिकारी सरळ सरळ अवैध व्यावसायिकांना दंडात्मक कारवाईपासून वाचवण्याचे भाष्य करताना दिसत आहे. मग संविधानाचे रखवालदार म्हणून घेणारी ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ म्हणणारी खाकी असा व्यवहार कसा करू शकते? की वरिष्ठांच्या वरदहस्तामुळे त्यांच्यात भ्रष्टाचाराचे भूत संचारते असा जनतेतून सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

सध्या नेवासा तालुक्यात अवैध व्यवसायांनी चांगलाच उच्छाद मांडल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. करोनाचा काळ सुरू असताना तसेच जिल्हाधिकार्‍यांनी निर्बंध लावले असताना सर्वच अवैध व्यवसाय जोमात सुरू होते व आहेत. पोलिसांच्या ‘अर्थपूर्ण’ संबंधाच्या जोरावर पोलिसांचा वरदहस्त असल्याने अनेक गावांमध्ये अवैध व्यावसायिकांनी आपली दहशत निर्माण केली आहे. पोलिसांचे हप्ते वेळेवर पोहच करणारे दलालही टामटुमीत जीवन जगताना दिसत आहेत. एकूणच काय भ्रष्ट अधिकारी व त्यांचे विश्वासू कर्मचार्‍यांचे अवैध व्यवसायाशी विनलं गेलेलं जाळं सोशल मिडियाच्या कृपेने चव्हाट्यावर आल्याने पोलीस खात्याविषयी नागरीकांमध्ये असलेली दहशत कायम राहिल काय? हा संशोधनाचा विषय बनला आहे.

अवैध व्यावसायाला थोपवण्यासाठी व तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी नेवाशाला सक्षम व खमक्या पोलीस अधिकार्‍याची गरज असल्याच बोललं जात आहे. भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकलेलं व चोहोबाजूने टिकेचे धनी झालेलं नेवासा पोलीस ठाणं आतातरी यातून धडा घेऊन अवैध व्यवसायाला आळा घालील काय? की ‘येरे माझ्या मागल्या’ची भूमिका ठेवत ‘पहिले पाढे पंचावन्न’चाच कारभार चालवतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या